तरुण भारत

फोंडा शहर लॉकडाऊनचा तुर्त विचार नाही !

मात्र नागरिकांनी खबरदारी घ्यावी : फोंडा पालिकेतर्फे विविध उपाययोजनांवर चर्चा

प्रतिनिधी / फोंडा

Advertisements

राज्यात कोरोनाबाधीत रुग्णाची संख्या वाढत असल्याने फोंडा पालिकेने खबरदारीच्या उपाययोजना म्हणून काही ठोस पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. फोंडा शहर लॉकडाऊन करण्याचा पालिकेचा अद्याप कुठलाच निर्णय झालेला नसून त्यासंबंधी केवळ अफवा उठत आहेत. सध्याच्या स्थितीत गाफील न राहता खबरदारी म्हणून प्रत्येक नगरसेवकाला आपआपल्या प्रभागात अधिक दक्षता घ्यावी लागेल.

पालिका मंडळाच्या सोमवारी झालेल्या विशेष बैठकीत काही ठोस उपाययोजनांवर चर्चा झाली. नगराध्यक्ष व्यंकटेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला फोंडय़ाचे आमदार रवी नाईक, मुख्याधिकारी केदार नाईक व इतर नगरसेवक उपस्थित होते. एखाद्या रहिवासी संकुलात किंवा लोकवस्तीमध्ये संशयास्पद रुग्ण आढळून आल्यास नागरिकांनी तातडीने संबंधीत नगरसेवक किंवा पालिकेशी संपर्क साधावा. पालिकेने त्यासाठी आपली यंत्रणा सज्ज ठेवली आहे. होम कोरंटाईन केलेली एखादी व्यक्ती बाहेर फिरत असल्याचे आढळून आल्यास त्याची थेट कारंटाईन सेंटरमध्ये रवानगी करण्यावाचून अन्य पर्याय राहणार नाही. सार्वजनिक ठिकाणी वावरताना नागरिकांनी फेसमास्कचा वापर सक्तीने करावा. सामाजिक अंतर कटाक्षाने पाळावे. दुकानदार, हॉटेलमालक व इतर आस्थापन चालकांनी विविध भागातून येणाऱया आपल्या कामगारांच्या आरोग्याकडे लक्ष ठेवावे, असे आवाहन फोंडा पालिकेतर्फे करण्यात आले आहे.

प्रतिकारशक्ती वाढविणारी औषधे पुरविणार

कोरोनावर सध्यातरी औषध नसल्याने प्रतिकारशक्ती वाढवणारी औषधेच त्यावर उपाय आहे. त्यामुळे आरोग्य खात्यामार्फत मोफत पुरविली जाणारी ही औषधे प्रत्येक नगरसेवकामार्फत सर्व प्रभागातील रहिवासी तसेच दुकानदारांना वितरीत करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. सध्या मार्केटमधील अंतर्गत रस्त्यावर अस्ताव्यस्त भरणारा मासळी बाजार, भाजी मार्केटच्या पाठीमागे असलेल्या अप्रोच रोडवर सामाजिक अंतर राखून भरवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.  वारखंडे, खडपाबांध व इतर प्रभागामध्ये लोकांना सोयिस्कर ठरणाऱया मासळी विक्रेत्यांना तेथून हलविण्याचा विचार नाही. अप्रोच रोडवर नवीन विक्रेत्यांनाही रोजगाराची संधी दिली जाणार आहे, असे व्यंकटेश नाईक यांनी सांगितले.

 सरकारी कर्मचाऱयांची नियुक्त त्यांच्याच तालुक्यात करा ः रवी नाईक

बसमधील गर्दीचा प्रवास टाळण्यासाठी व विविध भागात फैलावत चालेल्या कोरोनाच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी सरकारी कर्मचाऱयांना ते राहत असलेल्या तालुक्याच्या ठिकाणीच कामावर नियुक्त करण्याची गरज आहे. ज्यामुळे संसर्गाचा धोका टळेल व हे कर्मचारी वेळेत कामावरही पोचतील. सद्य स्थितीत नागरिकांनी प्रत्येक गोष्टीसाठी सरकारवर अवलंबून न राहता स्वतः खबरदारी घेणे तेवढेच आवश्यक आहे. सरकारला लॉकडाऊन करण्याची आवश्यकता भासल्यास या काळात खरेदीसाठी प्रत्येक कुटुंबाला खरेदीसाठी एकच परवाना देऊन बाजारातील गर्दी टाळता येईल, अशी सूचना आमदार रवी नाईक यांनी केली.

Related Stories

साळगावकरची वास्को क्लबवर चार गोलांनी मात

Amit Kulkarni

ताळगाव श्री सातेरी देवीचा 8 पासून वर्धापन सोहळा

Patil_p

बोरीत स्वेच्छा लॉकडाऊनला पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद

Patil_p

डिचोली बाजारात ग्राहकांच्या सोयीसाठी चोख बंदोबस्त

Patil_p

अंकोला येथील अपघातात फातोर्डा येथील युवक जागीच ठार

Patil_p

आमदार सोपटेंनी राजीनामा देऊन आपल्याविरोधात निवडून दाखवावे

Omkar B
error: Content is protected !!