तरुण भारत

पेट्रोल-डिझेल दर वाढता वाढता वाढे

सलग अकराव्या दिवशी दरवाढ : पेट्रोल 85 तर डिझेल 75 रुपये प्रतिलिटरच्या घरात

मुंबई / वृत्तसंस्था

भारतातील तेल कंपन्यांनी सलग अकराव्या दिवशी पेट्रोल, डिझेलचे भाव वाढवले. बुधवारी पेट्रोलमध्ये 55 पैसे आणि डिझेलमध्ये 69 पैसे वाढ केली. त्यामुळे पेट्रोलच्या किंमती देशातील वेगवेगळय़ा शहरांमध्ये 78 ते 85 रुपये प्रतिलिटर आणि डिझेलच्या किमती 70 ते 75 रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचल्या आहेत झाल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती 40 डॉलर प्रतिबॅरलपर्यंत खाली आल्या असताना इतर देशांच्या तुलनेत भारतात पेट्रोल, डिझेलच्या किमती अवाढव्य वाढवल्या आहेत.

कच्च्या तेलाची किंमत कमी असतानाही तेल कंपन्या पेट्रोल-डिझेलचे भाव वाढवतच आहेत. बुधवारी मुंबईत पेट्रोल 84.15 रुपयांवर पोहोचले असून डिझेल 74.32 रुपये झाले आहे. पुण्यामध्ये पेट्रोल 84.46 रुपये प्रतिलिटर झाले आहे. तर दिल्लीत पेट्रोल 77.28 रुपयांवर गेले असून डिझेल 75.79 रुपयांच्या वर पोहोचले आहे. कोलकातामध्ये पेट्रोल दर 79.08 वर आहे तर डिझेलचा दर 71 रुपयांपेक्षा जास्त आहे.

महागाईचा आगडोंब उसळण्याची चिन्हे

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे जीवनावेश्यक वस्तूंसह प्रवासही महाग होण्याची चिन्हे व्यक्त केली जात आहेत. गेल्या 2 महिन्यांचा तोटा भरुन काढण्यासाठी तेल वितरक कंपन्यांनी आता इंधन दरवाढीचा सपाटा लावला आहे. या दरवाढीमुळे सिलिंडर, भाजीपाल्याचे दरही वाढू लागले आहेत. त्यातच आता अन्य वस्तूही महाग होऊ शकतात. दररोज होणाऱया इंधन भाववाढीमुळे नागरिकांच्या खिशावर ताण येऊ शकतो. आधीच कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊनच्या परिणामांमुळे हतबल झालेल्या सर्वसामान्य जनतेला इंधन दरवाढीमुळे मोठा फटका बसत आहे.

दरवाढीतील सातत्यामुळे वाहनधारक हतबल

दरदिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल करण्याची प्रक्रिया तब्बल 82 दिवस स्थगित होती. ती प्रक्रिया सार्वजनिक इंधन कंपन्यांनी 7 जूनपासून सुरू केली. तेव्हापासून दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत. इंधनांच्या किमती दररोज बदलण्याची प्रक्रिया सर्वप्रथम मे 2017 मध्ये हाती घेण्यात आली. तेव्हापासून डिझेलची 93 पैसे दरवाढ उच्चांकी ठरली आहे. सध्याची दरवाढ संपूर्ण देशासाठी लागू आहे. मात्र, स्थानिक विक्री कर किंवा मूल्यवर्धित कराच्या (व्हॅट) भिन्न आकारणीमुळे राज्या-राज्यांत इंधन दर वेगवेगळे आहेत.

विमान इंधनातही वाढ

दरम्यान, एव्हिएशन टर्बाईन फ्युएल (एटीएफ) म्हणजेच विमान इंधनही 16.30 टक्क्यांनी महागले. विमान इंधनाचा दर प्रतिकिलो लिटर 5 हजार 494 रुपयांनी वाढला. त्यामुळे दिल्लीत विमान इंधनाचा दर आता किलो लिटरमागे 39 हजार रुपयांपेक्षा अधिक झाला आहे. चालू महिन्यात दुसऱयांदा विमान इंधन महागले आहे. याआधी 1 जूनला त्या इंधनाच्या दरात विक्रमी 56.50 टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती. त्यावेळी ती दरवाढ किलो लिटरमागे 12 हजार 126 रुपये इतकी होती. विमान इंधनाच्या किमतीचा आढावा दर पंधरवडय़ाने घेतला जातो.

Related Stories

श्रीनगर येथील डेनेज वाहिनीचे काम निकृष्ट दर्जाचे

Omkar B

मंडोळी हायस्कूलमध्ये अटल टिंकरिंग लॅबचे उद्घाटन

Amit Kulkarni

प्रथमेश पाटील याला रक्षा राज्यमंत्री पदक बहाल

Amit Kulkarni

यूपी : पंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर

datta jadhav

कृषी उत्पादित मालावर निर्बंध लादू नका

Patil_p

उत्तराखंडात मागील 24 तासात ‘या’ वर्षातील सर्वाधिक रुग्णांची नोंद

pradnya p
error: Content is protected !!