तरुण भारत

रशियात 7 हजारांहून अधिक नवे रुग्ण

ग्वाटेमालामध्ये आरोग्यमंत्र्यांची हकालपट्टी : जगभरात 87,86,931 कोरोनाबाधित : 4,63,153 जणांचा मृत्यू

जगभरात कोरोना महामारीमुळे आतापर्यंत 4 लाख 63 हजार 156 जणांना जीव गमवावा लागला आहे. तर बाधितांचे प्रमाण 87 लाख 86 हजार 931 वर पोहोचले आहे. या महामारीवर आतापर्यंत 46 लाख 47 हजार 152 जणांनी मात केली आहे. रशियात मागील 24 तासांमध्ये 7,889 नवे रुग्ण सापडले आहेत. तेथील बाधितांचे एकूण प्रमाण 5,76,952 झाले आहे. नव्या रुग्णांपैकी 2,579 जणांमध्ये संसर्गाची कुठलीच लक्षणे दिसून आलेली नाहीत. तसेच मॉस्कोमध्ये 1,057 नवे बाधित सापडले आहेत. देशात आतापर्यंत 8,002 जणांना जीव गमवावा लागला आहे. ग्वाटेमालामध्ये रुग्ण वाढत असतानाच अध्यक्ष एलेजेंड्रो गियामट्टे यांनी आरोग्यमंत्री ह्यूगो मोनरे यांना हटविले आहे. त्यांच्याजागी आता माजी आरोग्य उपमंत्री एमेलिया फ्लोरस यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. मागील काही काळापासून विरोधी पक्ष संसर्ग रोखण्यास अपयशी ठरल्याचा आरोप मोनरे यांच्यावर करत होते.

Advertisements

कॅलिफोर्नियात संकट

अमेरिकेच्या कॅलिफोर्निया प्रांतात मागील 24 तासांमध्ये 4 हजार 317 नवे बाधित सापडले आहेत. कोरोना संसर्ग फैलावल्यावर प्रथमच इतक्या अधिक संख्येत प्रांतात रुग्ण सापडले आहेत. कॅलिफोर्नियामध्ये दिवसभरात 70 जण  कोरोनामुळे दगावले आहेत. तर ह्युस्टनमध्ये 50 पेक्षा अधिक पोलीस कर्मचाऱयांना संसर्ग झाला आहे. देशात कृष्णवर्णीयांच्या समर्थनार्थ होत असलेल्या निदर्शनांमुळे बाधितांचे प्रमाण वाढत असल्याचे ह्युस्टन पोलीस प्रमुख आर्ट ऐसेवेडो यांनी सांगितले आहे.

व्हिक्टोरियात टाळेबंदी

ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया प्रांतात नवे रुग्ण सापडल्याने 12 जुलैपर्यंत टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. मागील 24 तासांमध्ये 25 बाधित आढळून आल्यावर व्हिक्टोरियाचे प्रीमियर डॅनियल ऍन्ड्रय़ूज यांनी याची घोषणा केली आहे. प्रांतातील स्थिती गंभीर झाल्याचे तज्ञ सांगत आहेत. रविवार मध्यरात्रीपासून नवे नियम लागू होतील. कुठल्याही घरात 5 पेक्षा अधिक पाहुण्यांना एकत्र येता येणार नाही. तसेच रेस्टॉरंट आणि कॅफेमध्ये 50 ऐवजी 20 जणांनाच प्रवेश मिळणार आहे.

54 हजार नवे रुग्ण

ब्राझीलमध्ये बाधितांचे प्रमाण 10 लाखांपेक्षा अधिक झाले आहे. मागील 24 तासांमध्ये 54 हजार 771 नवे रुग्ण आढळून आले आहेत. हा आकडा जगातील कुठल्याही देशात एका दिवसात आढळलेल्या रुग्णांपेक्षा अधिक आहे. तर दिवसभरात 1,206 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत 49,090 जणांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू ओढवला आहे. संसर्ग रोखण्यास सरकारला आलेल्या अपयशामुळे  नागरिक नाराज आहेत. देशात अनेक ठिकाणी यावरून निदर्शनेही करण्यात आली आहेत.

बळींचा आकडा वाढला

इराणमध्ये बळींचे एकूण प्रमाण आता 9,507 झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. इराणमध्ये 2,02,584 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. महामारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी इराण सरकार नवे कृतिदल स्थापन करणार आहे. हे कृतिदल हॉटस्पॉट तसेच कोरोना क्लस्टरमध्ये नजर ठेवणार आहे.

5,030 नवे रुग्ण

मेक्सिकोत कोरोनामुळे आतापर्यंत 20,394 जणांचा मृत्यू ओढवला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिवसभरात 5,030 नवे रुग्ण सापडल्याची पुष्टी दिली आहे. तसेच मागील 24 तासांत देशात 647 जणांना जीव गमवावा लागला आहे. मेक्सिकोमध्ये आतापर्यंत 1,70,485 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.

बीजिंग : विमानोड्डाणे रद्द

चीनची राजधानी बीजिंगमध्ये दिवसभरात शेकडो विमानोड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. मागील 6 दिवसांमध्ये शहरात 137 कोरोना रुग्ण सापडले आहेत. शहरात पुन्हा संसर्ग फैलावण्याचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अनेक निर्बंध लागू केले आहेत. बीजिंगच्या 16 पैकी 9 जिल्हय़ांमध्ये रुग्णांचे प्रमाण वाढले आहे.

300 जण विलगीकरणात

जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये 57 नवे रुग्ण आढळून आल्याने 300 जणांना गृह विलगीकरणाचे पालन करण्यास सांगण्यात आले आहे. 7 इमारतींमध्ये बाधित आढळल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. देशात 8 हजार 960 जणांचा कोरोनामुळे मृत्यू ओढवला असून 1 लाख 90 हजार 660 बाधित आढळून आले आहेत.

Related Stories

दक्षिण कोरिया दक्ष

Patil_p

कोरोना झाल्यास घाबरू नका !

Patil_p

युएईत विदेशी पर्यटकांना प्रवेश मिळणार

Patil_p

ब्राझीलमध्ये 49 लाख रुग्ण कोरोनामुक्त

datta jadhav

आणीबाणी हटविली

Patil_p

कोरोना विषाणू नष्ट करणारी लस तयार

Patil_p
error: Content is protected !!