तरुण भारत

मृतदेहासोबत तब्बल पाच दिवस

जामसंडे गणेशनगरातील धक्कादायक घटना : पत्नी, मुलगा मनोरुग्ण : मुलीने सोडले होते गावी

प्रतिनिधी / देवगड:

Advertisements

जामसंडे गणेशनगर येथे मुंबईहून आलेल्या व होम क्वारंटाईन असलेल्या भास्कर रामचंद्र दहिबावकर (89) यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरात मंगळवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास कुजलेल्या स्थितीत आढळून आला. त्यांची पत्नी व मुलगा मनोरुग्ण असल्याने गेले पाच दिवस त्यांनी मृतदेह घरातच ठेवला. दुर्गंधीमुळे शेजाऱयांनी तक्रार केल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

घटनास्थळावरून व पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 जून रोजी दहिबावकर यांची मुलगी श्रीमती कुंदा हिने वडील भास्कर दहिबावकर, आई व भाऊ यांना मुंबईहून जामसंडे गणेशनगर येथे घरी आणून सोडले व ती पुन्हा त्याच दिवशी मुंबईकडे रवाना झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे तिघेही होम क्वारंटाईन होते. मात्र, याची माहिती नगर पंचायत व आरोग्य विभागाला नव्हती. मंगळवारी सकाळपासून दहिबावकर यांच्या घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने शेजारील लोकांनी मंगळवारी सायंकाळी स्थानिक नगरसेविका सौ. हर्षा ठाकूर यांना कळविले. सौ. ठाकूर या वस्तुस्थिती पाहण्यासाठी दहिबावकर यांच्या घरी गेल्या असता मुलगा राजेंद्रने त्यांना गेटवरच रोखले. त्यांना घरात यायचे नाही, असे सांगितले. त्यानंतर नगरसेविका ठाकूर यांनी देवगड पोलीस व नगर पंचायतीला माहिती दिली. तर तेथील महेश तेरवणकर यांनी पोलीस ठाण्यात जात रितसर खबर दिली. त्यानंतर देवगडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातिवले, हवालदार एस. डी. कांबळे, फकरुद्दीन आगा, कॉन्स्टेबल गणेश चव्हाण, प्रवीण त्रिंबके हे घटनास्थळी दाखल झाले.

पीपीई किट घालून घरात प्रवेश

रात्रीची वेळ असतानाही दहिबावकर यांच्या घरात अंधार होता. त्यामुळे घरात काहीच दिसत नव्हते. मोठय़ा प्रमाणात दुर्गंधी पसरल्याने घरात जाणेही अशक्य होते. दहिबावकर कुटुंबीय हे मुंबईहून आलेले असल्याने घरात पीपीई किटशिवाय जाणे शक्य नसल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक कातिवले यांनी नगर पंचायतीच्या कर्मचाऱयांना बोलावले. त्यानंतर नगर पंचायत कर्मचाऱयांनी पीपीई किट परिधान करून घरात प्रवेश केला.

पाच दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याची शक्यता

घराचा दरवाजा उघडल्यानंतर दारासमोरच भास्कर दहिबावकर यांचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत पडलेला होता. मृतदेहानजीकच्या सोफ्यावर त्यांची मनोरुग्ण पत्नी बसली होती. देवगड ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. संजय विटकर यांनी मृतदेहाची पाहणी करून पाच दिवसांपूर्वी भास्कर यांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता व्यक्त केली. त्यानंतर न. पं. कर्मचारी मंदार घाडी, राजदीप कदम, मंगेश देवगडकर व इंद्रजीत बांदकर यांनी पीपीई किट परिधान करून मृतदेह घराबाहेर काढला. यावेळी उपनगराध्यक्ष उमेश कणेरकर, नगरसेवक नीरज घाडी, योगेश चांदोसकर हे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.

नगर पंचायतीने केले अंत्यसंस्कार

मुलगा मनोरुग्ण असल्याने पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यास कोणीही नव्हते. त्यांची मुलगी कुंदा व लहान मुलगा महेंद्र यांना घटनेची माहिती देण्यात आली. मुलगी कुंदाने मृतदेह कुजलेला असल्याने न. पं. ला अंत्यसंस्कार करण्याची परवानगी दिली. त्यानंतर उपनगराध्यक्ष कणेरकर व अन्य नगरसेवकांच्या सहकार्याने देवगड येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

मुंबईत कंटाळल्याने आईवडिलांना गावी आणले

बुधवारी गणेशनगर येथे आलेली मुलगी कुंदा यांनी माहिती देताना सांगितले, माझा भाऊ राजेंद्र हा मनोरुग्ण व विक्षिप्त आहे. त्यामुळे वडील व मनोरुग्ण आईला असलदे-कणकवली येथील वृद्धाश्रमात ठेवले होते. तेथे वडिलांचे मन रमले नाही म्हणून त्यांना पुन्हा घरी आणले. त्यानंतर राजेंद्र हा मुंबईमध्ये एका आश्रमात होता. तेथून तो गावी येऊन आई-वडिलांसोबत राहत होता. आई-वडिलांसाठी शेजारी जेवणाचा डबा सांगून ठेवलेला होता. मात्र, त्या डबेवाल्यांशीदेखील राजेंद्रने भांडण केले. तो त्यांचे डबे फेकून देत असे. त्यामुळे आई-वडिलांसह राजेंद्रला चार महिन्यांपूर्वी लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी मी मुंबईला घेऊन गेले.

दरम्यानच्या काळात ते तिघेही माझ्या मुंबईतील 10ƒ10 च्या खोलीमध्ये राहण्यास कंटाळले. त्यांनी गावी जाण्याचा हट्ट केला. त्यामुळे 11 जूनला त्यांना मी गावी आणून सोडले. येथे आल्यानंतर क्वारंटाईनचे 14 दिवस होण्यापूर्वी ही घटना घडली असल्याचे तिने सांगितले.

घरासह गणेशनगर परिसर सॅनिटाईज

दरम्यान, बुधवारी दुपारी त्यांची मुलगी कुंदा व मुलगा महेंद्र हे मुंबईहून जामसंडे-गणेशनगर येथे दाखल आले. नगर पंचायतीने नगरसेविका ठाकूर यांच्या विनंतीनुसार त्यांचे घर व गणेशनगर परिसर सॅनिटाईज केला. त्यानंतरच त्यांना घरामध्ये प्रवेश देण्यात आला.

मृतदेहासोबत आईला बसवून दरवाजाला कडी

वडिलांच्या मृत्यूनंतर राजेंद्रने मृतदेहामुळे येणारी दुर्गंधी घराबाहेर जाऊ नये, यासाठी मृतदेहावर चादरी पांघरून ठेवल्या होत्या. मृतदेहासोबत आईला घरात ठेवून बाहेरून दरवाजाला कडी लावून ठेवली होती. स्वत: घराच्या बाजूला असलेल्या शेडमध्ये राहत होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक कातिवले यांनी त्याला दम दिल्यानंतर त्याने घराचा दरवाजा उघडला.

Related Stories

राणेंच्या नवीन घोषणांना आमच्या शुभेच्छा!

NIKHIL_N

आजपासून आठवडाभर ‘कडक’ लॉकडाऊन

Patil_p

रत्नागिरीत लॅबसाठी शिफारस, सिंधुदुर्गने काय घोडे मारलेय?

NIKHIL_N

कणकवलीतील बंदला संमिश्र प्रतिसाद आजपासून नियम पाळत दुकाने सुरू ठेवणार

NIKHIL_N

आठही तालुक्यांत कोविड केअर सेंटर

NIKHIL_N

मसुरेतील पोलीस कर्मचारी बनले ग्रामस्थांसाठी देवदूत

NIKHIL_N
error: Content is protected !!