तरुण भारत

अखेर एसएसएलसी परीक्षेला मुहूर्त

प्रतिनिधी / बेळगाव :

हुरहुर, चिंता, धाकधूक अशा संमिश्र भावनांमध्ये तीन महिन्यांपासून एसएसएलसी परीक्षेची वाट पाहणाऱया परीक्षार्थींनी अखेर परीक्षेचे धनुष्य पेलले. कोरोनाची संकटछाया धूसर होत असताना कर्नाटक राज्य शिक्षण मंडळाने आयोजित केलेल्या 2019-2020 या शैक्षणिक वर्षातील एसएसएलसी परीक्षेला  अखेर गुरुवारपासून प्रारंभ झाला. परीक्षेची रंगीततालीम आणि कोरोना संसर्गात दक्षता म्हणून करण्यात आलेली जागृती यामुळे परीक्षेचा पहिला पेपर अचूक व्यवस्थेत सुरू झाला. अनेक चढउतारांना सामोरे जात परीक्षेचा मुहूर्त साधण्यात आला. सामाजिक अंतराचे भान, मास्कची सक्ती आणि सॅनिटायझर्सचा वापर या त्रिसूत्रीचे तंतोतंत पालन करतच विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले.

Advertisements

कोरोनाच्या संकटछायेत 27 मार्चपासून सुरू होणारी परीक्षा लॉकडाऊनमुळे लांबणीवर पडली होती. मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी परीक्षा मंडळाने अचूक व्यवस्थेत परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 25 जून रोजी द्वितीय भाषा विषयाच्या पेपरने परीक्षेला प्रारंभ झाला. गर्दी टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर 8.30 वाजता बोलविण्यात आले होते. 10.05 वाजता पहिली सूचक बेल झाली. त्यानंतर 10.15 वाजता प्रश्नपत्रिकेचे वितरण करण्यात आले. 10.30 ते 1.30 दरम्यान पेपर पार पडला. बुधवारीच परीक्षेची रंगीततालीम पार पडल्याने ना गोंधळ, ना गर्दी, ना गडबड नियोजित व्यवस्थेनुसारच विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रात प्रवेश केला. पालकांना परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यास मज्जाव असल्याने पालक विद्यार्थ्यांना केंद्राबाहेर सोडून माघारी परतले.

दक्षतेचे पाऊल

परीक्षा केंद्रावर प्रवेश करताच विद्यार्थ्यांना सॅनिटायझर्स व थर्मल स्क्रिनिंग करण्यात आले. यानंतर परीक्षा केंद्रांवर आखण्यात आलेल्या नकाशानुसार विद्यार्थी केंद्रात दाखल झाले. यावेळी त्यांना मास्कचे वितरण व आरोग्य तपासणी करण्यात आली. पुढे प्रवेशपत्र व बैठक क्रमांक पाहून मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी प्रत्येक केंद्रांवर माईकच्या माध्यमातून सामूहिक सूचना देण्यात आल्या. दूरवरुन आलेल्या विद्यार्थ्यांना डबा खाण्याची मुभा देण्यात आली होती. मात्र यावेळी विद्यार्थ्यांनी घोळका करुन बसू नये, परस्परांशी बोलू नये, हातात हात देऊन शुभेच्छा देऊ नयेत अशा सूचना करण्यात येत होत्या. यामुळे कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी घेण्यात आलेली दक्षता विद्यार्थ्यांच्या दृष्टीने लाभदायक ठरणार आहे.

विद्यार्थ्यांबरोबरच व्यवस्थापनाची परीक्षा

प्रत्येक परीक्षा केंद्रांवर सीसीटिव्हीची सक्ती करण्यात आली असल्याने परीक्षेच्या दरम्यान कोणताही गैरप्रकार घडणार नाही यासाठी अधिक कटाक्षाने लक्ष देण्यात आले होते. परीक्षकांना सकाळी 7.30 वाजता बोलविण्यात आले होते. शिक्षकांनी केंद्रांत प्रवेश केल्यानंतर मास्क, हँडग्लोज तसेच सॅनिटायझर्स देण्यात आले. शिवाय आरोग्य तपासणी करण्यात आली. परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांबरोबरच परीक्षकांना, पर्यवेक्षकांना मोबाईल बंदी असून त्यानुसार मोबाईल कस्टडीसाठी नियुक्ती करण्यात आलेल्या अधिकाऱयांकडे मोबाईल जमा करण्यात आले. परीक्षा केंद्र आवारात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शिवाय कोरोनाच्या संकटात विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या सूचनांचे पालन व्यवस्थापनाने देखील करणे सक्तीचे असल्याने विद्यार्थ्यांबरोबरच व्यवस्थापनाची देखील परीक्षा असल्याचे चित्र परीक्षा केंद्रावर दिसून आले.

Related Stories

मार्गशीर्ष व्रताची श्रद्धेने सांगता

Patil_p

तंबाखू उत्पादकांच्या डोक्मयावर कर्जाचे ओझे

Patil_p

दि.आदर्श मल्टिपर्पज सोसायटीचा वर्धापन दिन साजरा

Amit Kulkarni

एसीबीच्या जाळय़ात धर्मादाय खात्याचे तहसीलदार

Patil_p

बस्तवाड-धामणे रस्ता तातडीने दुरुस्त करा

Amit Kulkarni

बुधवारी जिल्हय़ात 116 जण कोरोना पॉझिटिव्ह

Amit Kulkarni
error: Content is protected !!