तरुण भारत

कोरोना महामारी आणि तरुण पिढी

अलीकडेच सुशांतसिंग राजपूत या एका गुणी व तरुण सिनेकलाकाराने आत्महत्या केली. त्यापूर्वी त्याचीच एक माजी सहकारी हिनेही उंच इमारतीवरून उडी टाकून आत्महत्या केली होती. या कलाकारांच्या आत्महत्येनंतर लगेच आत्महत्या या विषयावर अनेक लेख सोशल मीडियावर येऊ लागले. मला त्या कलाकाराने आत्महत्या केली की आणखी काही? आत्महत्याच असेल तर ती का केली? ती थांबवता आली असती का इत्यादीबद्दल बोलायचे नाही पण सध्याच्या परिस्थितीमध्ये या सर्वांवरच प्रामुख्याने तरुण पिढीला येणाऱया नैराश्याबद्दल थोडे लिहावेसे वाटले. कोरोनाच्या संकटामुळे जागतिक अर्थव्यवस्था तसेच समाज व्यवस्थाही कोलमडण्याच्या मार्गावर आहे. या सगळय़ाचा एक मोठा परिणाम आजच्या तरुण पिढीच्या मनावर होत आहे. तरुण पिढीच्या मनात आपल्या भविष्याबद्दल अनेक शंका उपस्थित होत आहेत. तसेच त्यांना भविष्य अंधकारमय वाटू लागले आहे. तरुण पिढीमध्ये अगदी शालेय विद्यार्थ्यांपासून ते 30-35 वयाच्या नवीनच स्थिरस्थावर होऊ लागलेल्या तरुणांचा समावेशही होताना दिसतो. काही उदाहरणे बघूया.

1. आत्ता दहावी-बारावीत गेलेल्या विद्यार्थ्यांना आपल्या महत्त्वाच्या वर्षाचे पाच सहा महिने फुकट गेल्याची भीती वाटत आहे. 2. बारावी आणि पदवी पूर्ण करून विविध परीक्षा देऊ इच्छिणाऱया विद्यार्थ्यांना परीक्षा होतील की नाही, झाल्या तर पुढे महाविद्यालये सुरू होतील की नाही अशी भीती वाटत आहे. 3. सरकारने सर्व विद्यार्थ्यांना, अगदी शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांनासुद्धा उत्तीर्ण म्हणून घोषित केले आहे, पण त्यांना ही चिंता आहे की आपल्याला परीक्षा न देता मिळालेल्या उत्तीर्णच्या शिक्क्याचा दुष्परिणाम नोकरी मिळवताना होऊ शकतो. 4. बऱयाच विद्यार्थ्यांना त्यांच्या परदेशी उच्च शिक्षण घेण्याच्या स्वप्नांवर पाणी फिरण्याची वेळ आली आहे का असा प्रश्न पडला आहे. 5. नवीनच नोकरी-व्यवसाय सुरू केलेल्या तरुणांना येऊ घातलेल्या मंदीच्या परिणामाचा विचार अस्वस्थ करतो आहे.

Advertisements

अशा हजारो प्रकारच्या चिंतांनी विविध वयोगटातील पिढीला, प्रामुख्याने तरुण पिढीला ग्रासले आहे. या संकटाच्या काळात ह्या पिढीला आधाराची गरज आहे त्यांचे मनोबल वाढवण्याची नितांत आवश्यकता आहे. त्यांनी कोरोनासारख्या एखाद्या महामारीने हादरून जाण्याची काहीच आवश्यकता नाही. या जगाने आत्तापर्यंत अनेक संकटांना समर्थपणे तोंड दिलेले आहे. प्लेगची साथ, अनेक प्रकारचे फ्लू, पहिले व दुसरे महायुद्ध, भारताच्या स्वातंत्र्य लढय़ाचा काळ, त्यानंतर फाळणीचा काळ इ. यात सर्वात मोठे उदाहरण द्यायचे झाले तर जपानचे देता येईल. दुसऱया महायुद्धात 1945 मध्ये झालेल्या अणुबाँबच्या स्फोटानंतर जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांचा संपूर्ण नायनाट झाला होता आणि जपान कित्येक वर्षे मागे गेला पण जपानने त्यानंतरदेखील फिनिक्स पक्षासारखी किंबहुना त्याहूनही उंच भरारी घेतलेली आपल्याला माहीत आहे. तसेच प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शून्यातून वर आलेल्या अनेक थोर आणि यशस्वी व्यक्तींबद्दलही आपण जाणतोच.

आपल्या आयुष्यातला सहा महिने, फारतर वर्षभराचा हा संकटाचा काळ एकदा उलटून गेला की आपणही अशीच उंच भरारी घेणार आहोत. जेव्हा आपण उंच उडी किंवा लांब उडीच्या स्पर्धेत भाग घेतो तेव्हा आपण काही अंतर आधी मागे जातो आणि मग पळत येऊन उडी मारतो तेव्हा ती छान बसते. जर दिलेल्या रेषेवरूनच आपण उडी मारायचा प्रयत्न केला तर आपण तिथल्या तिथे धप्पकन पडतो. त्याच प्रकारे या सहा महिन्यांच्या काळात आपण थोडे मागे गेलो असलो तरी आता जोराने, नव्या जोमाने धावत येऊन उत्तुंग भरारी नक्कीच घेणार आहोत. मागे
व्हॉट्सऍापवर एक विनोद वाचला होता की ‘नशीब, कोरोना 2020 मध्ये आला, 2000 मध्ये आला असता तर दिवसभर नोकिया 3310 वर आपण साप मारत बसलो असतो’. एक विनोद म्हणून वाचला तरी त्यात तथ्य नक्कीच आहे खरोखरच आपण खूप भाग्यवान आहोत की 2020 पर्यंत टेक्नॉलॉजी एवढी प्रगत झालेली आहे की जरी शाळा-कॉलेज लवकर सुरू झाली नाहीत, ऑफिसेस कारखाने इत्यादी पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाहीत तरी घरी बसून इंटरनेटच्या माध्यमातून अनेक गोष्टी आपण शिकू शकत आहोत, ‘वर्क फ्रॉम होम’ करू शकत आहोत, घरबसल्या अनेक व्यवसायपण सुरू करू शकतो आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचे ऍडव्हर्टायझिंग आणि मार्केटिंगपण करू शकत आहोत.  या काळात चिंता करत बसण्यापेक्षा आपल्याला मिळालेलीही एक संधी समजून वेगवेगळय़ा क्षेत्रांचा विचार करावा, वेगवेगळय़ा गोष्टींवर तरुणांनी अभ्यास करावा, आत्मचिंतन करावे, आत्मपरीक्षण करावे. आत्तापर्यंत शाळा-कॉलेज, अभ्यास अशा विविध गोष्टींमध्ये आपण चरख्यात अडकल्याप्रमाणे अडकलेलो होतो. चरखा नेईल त्या दिशेने ओढले जात होतो. आता सर्व व्यवहार थंडावल्यामुळे आपणास या रॅट रेसमधून डोके वर काढून स्वतःबद्दल जाणून घ्यायची एक चांगली संधी मिळालेली आहे. त्या संधीचे सोने करूया. आपला जीवनाकडे तसेच जगाकडे बघायचा दृष्टिकोन काय आहे त्याचा विचार करूया. आपल्यामध्ये दडून बसलेल्या अनेक कला, आवडी एक्सप्लोअर करूया.

आत्तापर्यंत एकच ध्येय घेऊन आपण जगत होतो. पण या अफाट विश्वात विविध क्षेत्रे आहेत. अनेक उत्तमोत्तम संधी आहेत त्यांचाही विचार करूया. कोरोनाचे हे संकट टळल्यावर सर्व गोष्टी पुन्हा नव्याने, जोमाने व अजून अधिक वेगाने नक्कीच सुरू होणार आहेत त्याचा विश्वास बाळगुया आणि कुठेही खचून जाऊ नका. आयुष्यात केवळ धन, पैसा, प्रसिद्धी यांचा फारसा उपयोग नसतो हे या लॉकडाउनच्या काळात बऱयाच अंशी आपल्याला समजले आहे. तेव्हा सर्वात पहिल्यांदा आनंदी राहण्याचा आणि आपले मन शांत ठेवायचा प्रयत्न करूया.

पालकांनी आणि घरातील वडीलधाऱयांनी या काळात आपल्या मुलांच्या मानसिक गरजेकडे आवर्जून लक्ष देणे आवश्यक आहे. त्यांच्याशी सतत संवाद साधत राहायला हवा. गरज पडल्यास विविध मोटिवेशनल स्पीकर, सायकॅट्रिस्ट इत्यादींची मदत घेण्यात कसलीच लाज बाळगू नका. सोशल मीडियावरपण सध्या अनेक मोटिवेशनल व्हीडिओज, अनेक ऑनलाईन कोर्सेस उपलब्ध आहेत त्यांची मदत घ्या. माईंडफुलनेस हा अजून एक मेडिटेशनचाच प्रकार खूप उपयोगी पडतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मीडियावरील घाबरून टाकणाऱया बातम्या आणि व्हीडिओज स्वतःही बघू नका आणि दुसऱयालाही पाठवू नका. हा काळ कठीण असला तरी असल्या कोणत्याही संकटामुळे जग थांबत नसते आणि जगणेही थांबत नसते. निसर्ग आपली परीक्षा घेतो आहे. त्या परीक्षेमध्ये आपल्या सर्वांनाच उत्तम गुणांनी उत्तीर्ण व्हायचे आहे.

डॉ. शुभांगी जोशी, मालवण

Related Stories

वॉव

Patil_p

गोविंदा आला रे

Patil_p

प्राणिक हीलिंग उपचार पद्धतीबद्दलचे शंकानिरसन

Patil_p

विशेष मुलांचा सामाजिक स्वीकार

Patil_p

सद्गुरु हा चिंतेचा नाश करून चैतन्याचे शाश्वत दान देतो

Patil_p

पिंगलेचे मनोगत

Patil_p
error: Content is protected !!