तरुण भारत

ब्राझीलमध्ये कोरोना संसर्ग नियंत्रणाबाहेर

चीनमध्ये दिवसभरात 21 नवे बाधित : जगभरात आतापर्यंत 99,31,514 जणांना कोरोना विषाणूची लागण

जगभरात कोरोना विषाणूची बाधा आतापर्यंत 99 लाख 31 हजार 514 जणांना झाली आहे. यातील 53 लाख 79 हजार 874 बाधितांना महामारीतून मुक्तता प्राप्त झाली आहे.तर शनिवार किंवा रविवारी रुग्णसंख्या 1 कोटीवर जाणार आहे. कोरोना संसर्गावर बऱयापैकी नियंत्रण मिळविल्याचा दावा करणाऱया चीनमध्ये पुन्हा एकदा रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. शनिवारी प्रसिद्ध आकडेवारीनुसार मागील 24 तासांमध्ये 21 नवे बाधित सापडले आहेत. तर दुसरीकडे ब्राझीलमध्ये एका दिवसात 45 हजारांपेक्षा अधिक रुग्ण सापडले आहेत. ब्राझीलमध्ये प्रतिदिन 40 हजारांपेक्षा रुग्ण सापडू लागल्याने आरोग्य व्यवस्थेची स्थिती अत्यंत दयनीय ठरत चालली आहे.

इस्रायल-युएईत करार

कोरोना महामारीला एकत्रितपणे सामोरे जाण्याची योजना इस्रायल आणि संयुक्त अरब अमिरातने आखली आहे. दोन्ही देशांदरम्यान याकरता भागीदारी करण्यात आल्याची माहिती इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी दिली आहे. इस्रायल आणि संयुक्त अरब अमिरातमधील ही भागीदारी चकित करणारी आहे. इस्रायलमध्ये 21,597 कोरोनाबाधित असून 308 जणांचा मृत्यू झाला आहे. तर संयुक्त अरब अमिरातमध्ये 46,563 जणांना संसर्ग झाला आहे.

मुलांमध्ये मृत्यूचा धोका खूपच कमी

मुलांमध्ये कोरोना संसर्ग होत असला तरीही मृत्यूचा धोका अत्यंत कमी आहे. बहुतांश मुलांमध्ये संसर्गानंतर सौम्य लक्षणे दिसून येत असल्याचा दावा ब्रिटन, युरोप, स्पेन आणि ऑस्ट्रियाच्या संशोधकांनी केला आहे. 3 ते 18 वर्षांच्या 585 कोरोनाबाधितांवर संशोधन केले आहे. युरोपमध्ये हे संशोधन करण्यात आले आहे. संशोधनात 62 टक्के रुग्णांनाच रुग्णालयातच दाखल करावे लागल्याचे दिसून आले. तर केवळ 8 टक्के मुलांना अतिदक्षता विभागात ठेवावे लागले होते.

ब्राझीलमध्ये महासंकट

ब्राझीलमध्ये दिवसभरात 46 हजार 860 रुग्ण सापडले आहेत. कोरोना संकट आवरता न आल्याने बोल्सोनारो सरकारवर दबाव वाढू लागला आहे. सरकारने मुखपट्टा वापरणे अनिवार्य केले असले तरीही समूह संसर्ग रोखण्याचे उपाय योजिलेले नाहीत. संसर्ग रोखण्यासाठी कठोर पावले न उचलल्यास याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतो, असा इशारा अहवालात देण्यात आला आहे.

संसर्ग गतिमान

अनेक उपाययोजना करूनही सौदी अरेबियात कोरोना संसर्ग वेगाने फैलावत आहे. निर्बंध शिथिल करण्यात आल्यापासून राजधानी रियाध आणि परिसरातील भागांमध्ये संसर्ग वेगाने फैलावला आहे. वाढता संसर्ग पाहून निर्बंध लादण्यात आले असले तरीही तोपर्यंत नुकसान झाले आहे. मागील 24 तासांमध्ये 3,938 नवे रुग्ण सापडले आहेत.

चीन : देशांतर्गत संसर्ग

चीनमध्ये आता सापडू लागलेले रुग्ण हे देशांतर्गत संसर्गाशी संबंधित आहेत. चीनमध्ये देशांतर्गत संसर्गाची प्रकरणे वाढल्याने तेथील संसर्गावर नियंत्रण मिळविल्याचा दावा योग्य नसल्याचे संकेत प्राप्त होत आहेत. नव्या 21 पैकी 17 रुग्ण राजधानी बीजिंगमधील आहेत. राजधानीतील घाऊक बाजारपेठ सुरू करण्यासंबंधी कुठलाच विचार करण्यात आलेला नसल्याचे बीजिंगच्या प्रशासनाने सांगितले आहे.

पॅलेस्टाईन : 207 नवे रुग्ण

पॅलेस्टाईनमध्ये मागील 24 तासांत 207 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. तेथे आतापर्यंत 1,795 रुग्ण सापडले आहेत. 5 मार्चनंतर एका दिवसात आढळलेला बाधितांचा हा आकडा सर्वाधिक आहे. हेब्रोन जिल्हय़ात सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. एकूण 620 बाधित आतापर्यंत बरे झाले असून 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्यमंत्री माइ अल कैला यांनी दिली आहे.

अमेरिका : 16 प्रांतांमध्ये संसर्ग

अमेरिकेत 40 हजार 870 नवे रुग्ण सापडले आहेत. देशातील 50 पैकी 16 प्रांतांमध्ये स्थिती सर्वात खराब आहे. कृष्णवर्णीय नागरिक जॉर्ज फ्लॉयड याच्या मृत्यूनंतर झालेल्या निदर्शनांमुळे संसर्गाचा वेगाने फैलाव झाल्याचे मानले जात आहे. फ्लोरिडा आणि टेनेसीमध्ये संसर्गाचा वेग उर्वरित प्रांतांच्या तुलनेत अधिक आहे. काही प्रांतांमध्ये संसर्गावर नियंत्रण मिळविण्यास अधिक यश मिळालेले नसल्याचे कोरोना विषयक कृतिदलाचे सदस्य डॉ. अँथनी फौसी यांनी सांगितले आहे.

Related Stories

झिंकची कमतरता असल्यास मृत्यूचा धोका अधिक

Patil_p

चंद्रावर चीनने फडकविला झेंडा

Patil_p

कोरोनाच्या भीतीने लोकांना समजाविले सकस आहाराचे महत्त्व

Patil_p

जपानमध्ये ‘टॉयलेट चोर’ जेरबंद

Patil_p

आणीबाणी हटविली

Patil_p

पक्ष्यांसारखी बोली, घरटय़ासमान घर

Patil_p
error: Content is protected !!