तरुण भारत

संजीवनी बंद केल्यास हजारो कुटुंबांवर उपासमारीची पाळी

वाडे – कुर्डीतील ऊस उत्पादकांच्या सभेत भीती व्यक्त

प्रतिनिधी/ सांगे

Advertisements

संजीवनी कारखाना चालविणे अशक्मय असल्याचे स्पष्ट संकेत कारखाना प्रशासकांनी दिल्याने ऊस उत्पादकांत खळबळ माजली असून या पार्श्वभूमीवर वाडे-कुर्डी येथे शनिवारी या भागातील ऊस उत्पादक शेतकऱयांच्या झालेल्या सभेत कारखाना बंद केल्यास हजारो कुटुंबांवर उपासमारीची पाळी येण्याची भीती व्यक्त करण्यात आली.

सांगेतील वाडे-कुर्डी भागात सर्वाधिक ऊस शेती आहे. त्यामुळे येथील शेतकरी भीतीच्या छायेखाली आले आहेत. त्यावेळी बोलताना चंदन उनंदकर यांनी संजीवनी डबघाईस येण्यास शेतकरी नव्हे तर सरकार जबाबदार असल्याची टीका केली. यंदा प्रतिटन ऊसावर 9 हजार रुपये खर्च करण्यात आले. ही रक्कम कितीतरी कोटींच्या घरात जाते. तेच पैसे कारखाना चालू करण्यास वापरता आले असते. पण सरकारने तसे केले नाही, असे ते म्हणाले.

आधी प्रश्नांची उत्तरे सविस्तर द्यावीत

यापूर्वी सहकारमंत्री गोविंद गावडे यांनी वाडे येथे येऊन कारखाना कोणत्याही स्थितीत बंद होणार नाही असे आश्वासन दिले होते. कृषिमंत्री चंद्रकांत कवळेकर यांनीही तसेच स्पष्ट केले होते. मुख्यमंत्री देखील सुरुवातीला कारखाना बंद करण्याच्या विचारात नव्हते. पण आता कारखाना बंद करण्याचा विचार पुढे येत आहे. यावरून मंत्र्यांमध्ये एकमत नसल्याचे स्पष्ट होते, असे उनंदकर पुढे म्हणाले.

अनेक घटक अडचणीत येणार

कारखाना बंद पडल्यास ऊस उत्पादकांबरोबरच कामगार, ट्रक, ट्रक्टरमालक, मजूर, तसेच संलग्न अनेक घटक अडचणीत येणार आहेत. सरकार येथील ऊस खानापूरला पाठवू शकते, तर आपला एकमेव कारखाना का चालवू शकत नाही? असा सवाल नेत्रावळीचे पंच अभिजित देसाई यांनी केला. या भागातील खाणी आधीच बंद पडल्या आहेत, आता ऊसाचे पीक देखील हातातून जाणार, अशी भीती देसाई यांनी व्यक्त केली.

सहकारमंत्र्यांनी ऊस उत्पादन का घटले याची कारणे शोधून काढावीत, अशी मागणी वाडेचे सरपंच दामान्सियो बार्रेटो यांनी केली. शेतकऱयांचे हित डोळय़ांसमोर ठेवून सरकारने तोडगा काढावा, असे त्यांनी सूचविले.

संजीवनी संबंधी सध्या सरकारमध्ये एकवाक्यता नाही. मुख्यमंत्री, खासदार, मंत्री हे सर्वजण वेगवेगळी वक्तव्ये करून शेतकऱयांची केवळ दिशाभूल करत आहेत.  एकंदर पाहता धड काहीच नाही. एकटा एक सांगतो, तर दुसरा वेगळेच बोलतो. त्यामुळे कुणावर विश्वास ठेवावा, असा सवाल नेत्रावळीचे प्रगतशील शेतकरी हर्षद प्रभुदेसाई यांनी उपस्थित केला.

…तर संजीवनीच्या आवारात उपोषण

शेतकऱयांना रडवत ठेवून चालणार नाही. योग्य तोडगा न निघाल्यास संजीवनीच्या आवारात उपोषणाला बसणार हे देखील कारखान्याच्या प्रशासकांना सांगितलेले आहे. त्याकरिता सर्वांचे सहकार्य गरजेचे आहे, असे प्रभुदेसाई यांनी पुढे सांगितले.

वाडेचे उपसरपंच कुष्टा गावकर यांच्या पुढाकाराने ही सभा घेण्यात आली. सुमारे शंभर शेतकऱयांची उपस्थिती होती. यावेळी सोशल डिस्टन्सिंग व कोरोनाबाबतच्या अन्य खबरदारींचे चोख पालन करण्यात आले. नेत्रावळीचे पंच प्रकाश भगत, पंच जुझेफिना फर्नांडिस, संयोगिता गावकर, संजोग पै, कुर्डी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेचे अध्यक्ष फ्रान्सिस मास्कारेन्हस तसेच बोस्त्यांव, सिमॉईश आदी शेतकरी हजर होते.

Related Stories

भारतीय लष्कराच्या सामर्थ्याचा आविष्कार

Patil_p

राज्यपाल राजेंद्र आर्लेकर पहिल्या गोवा भेटीवर

Patil_p

राज्यात सत्तेवर असलेले भाजप सरकार असंवेदनशील

Omkar B

पेडणे येथील गोमंतक मराठी संमेलन लांबणीवर

Amit Kulkarni

कचऱयासाठी मनपाला अत्याधुनिक वाहने प्राप्त

Patil_p

राज्यात विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता

GAURESH SATTARKAR
error: Content is protected !!