तरुण भारत

पोलीस मुख्यालयात कोरोना, भाजप आमदारालाही बाधा

मुख्यालयातील दोन पोलिस पॉझिटिव्ह, एक पीर्ण येथील तर दुसरा साखळीतील

प्रतिनिधी/ पणजी

Advertisements

राजधानी पणजीतील पोलीस मुख्यालयातील दोन पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याचे काल मंगळवारी उघड झाले आहे. त्यामुळे पोलीस मुख्यालयातील सुमारे 200 कर्मचारी अडचणीत आले आहेत. दुसऱया बाजूने भाजपचा सासष्टी तालुक्यातील एक आमदारही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे.  झुवारीनगर, मोती डोंगर हे भाग कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केले आहेत, तर सांखळीत भंडारवाडा आणि देसाईनगर हे भाग मायक्रो कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केले आहेत.

काल मंगळवारी 64 नवीन कोरोना पॉझिटिव्ह सापडले, तर 72 रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यातील एकूण सक्रीय रुग्णांची संख्या 716 वर पोहोचली आहे.

 साखळीतील रुग्णसंख्या पोहोचली 27 वर    

सांखळीतील रुग्णांची संख्या वाढत आहे. एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 27 एवढी झाली आहे. रस्ता वाहतूक, रेल्वे आणि विमानातून गोव्यात दाखल झालेल्या रुग्णांची संख्या 107 वर पोहोचली आहे. मांगोरहिलमधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 255 झाली आहे. मांगोरहिलशी संबंधित रुग्णांचा आकडा 217 वर पोहोचला आहे. कुडत्नारी येथील कोरोना पॉझिटिव्ह संख्या 21 वर पोहोचली आहे. आंबेलीशी संबधित रुग्णांचा आकडा 23 वर पोहोचला आहे. मडगावची रुग्णसंख्या 12, केपे, 6, लोटली 11, नावेली 2 तर गंगानगर म्हापसा येथील आकडा 6 वर पोहोचला आहे.

पिर्ण येथील पहिला रुग्ण पोलीस

मुख्यमंत्र्यांच्या सांखळी मतदारसंघात सांखळी येथे कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असून तो 27 वर पोहोचला आहे. डिचोली 4, काणकोण 6, नानोस्ळा 1, पर्वरी 2 तर कुंडई, पिलार, वेर्णा, सांगे व म्हापसा येथे नव्याने रुग्ण सापडले आहेत. वास्कोतील रुग्णसंख्या वाढत आहे. सडा वास्को येथील रुग्णसंख्या 62 वर पोहोचली आहे. बायणा 41, न्यु वाडे 29, झुवारीनगर 24 तर चिंबल येथे 27 व मोर्ले सत्तरीतील रुग्णसंख्या 22 वर पोहोचली आहे. पिर्ण भागात पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला आहे.

लोकांमध्ये धास्ती, लॉकडाऊनची मागणी

कोरोनाबाधितांचा आकडा वाढू लागल्याने राज्याच्या विविध भागामध्ये धास्ती निर्माण झाली आहे. लोक लॉकडाऊनची मागणी करीत आहेत. प्रतिनिधीही लॉकडाऊनसाठी शिफारस करीत आहेत, मात्र सरकारमधील मंत्रीही आता व्यावसायिक भाषा बोलत असून बारसह पर्यटनही सुरू व्हायला हवे अशी मागणी करीत आहे. अर्थव्यवस्थेकडे सरकार आणि मंत्री लक्ष ठेऊन आहेत, तर दुसऱया बाजूने कोरोना वाढत चालला आहे. त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे.

दोन पॉझिटिव्ह सापडल्याने पोलीस मुख्यालयात धावाधाव

पोलीस मुख्यालयातील दोन पोलीस पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाल्याने मुख्यालयात धावाधाव सुरू झाली आहे. अनेक पोलीस कर्मचाऱयांची चाचणी घेण्यात आली असून अहवाल येईपर्यंत घरात क्वारंटाईन राहण्याची तयारी दर्शविली आहे. दोन पैकी एक हा सांखळीतील मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील आहे. 24 जूनपर्यंत तो कामावर होता. ज्या दुसऱया कर्मचाऱयाला कोरोनाची बाधा झाली आहे त्याने दोन दिवसांअगोदर आपल्या मित्रांना वाढदिवसानिमित्त पार्टी दिली होती. त्यामुळे त्याच्या मित्रांचाही गोंधळ उडाला आहे. दरम्यान मुख्यालयाच्या इमारतीचे अग्निशामक दलातर्फे सॅनिटायझेशन करण्यात आले आहे.

कोविड हॉस्पिटलमध्ये पाचजण ‘आयसीयु’त

मडगावच्या कोविड हॉस्पिटलमध्ये सद्या पाच जणांवर अतिदक्षता (आयसीयु) विभागात उपचार सुरू आहेत. त्यात माजी आरोग्यमंत्र्याचा समावेश आहे. काल मंगळवारी कोविड हॉस्पिटलमध्यून दहा जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तर दिवसभरात दोन नवीन रूग्णांची भरती झाली. त्यात कोविड हॉस्पिटलच्या एका नर्सचा समावेश आहे.

कोविड हॉस्पिटलात आतापर्यंत तिघांना मृत्यू आला असून त्यात दोन पुरूष व एका महिलेचा समावेश होता. ती सर्वजण वयस्क होते तसेच त्यांना इतर आजार होते. त्याचबरोबर तीन मुलांचा जन्म या हॉस्पिटलात झालेला आहे. कोविड हॉस्पिटलातून अनेक रूग्ण बरे झाले असून अनेकांनी डिस्चार्ज घेतला आहे. सद्या या ठिकाणी वयस्क रूग्ण दाखल होण्याचे प्रमाण जास्त आहे.  

भाजपचा एक आमदार पॉझिटिव्ह

मुरगांव पालिकेचे नगराध्यक्ष तसेच इतर काही नगरसेवक कोरोना संक्रमित झाले असतानाच आता आमदारही कोरोना पॉझिटिव्ह होऊ लागले असून सासष्टीतील भाजपचा एक आमदार कोरोना पॉझिटिव्ह निघाला आहे. या आमदाराला ताप येत होता म्हणून त्याची चाचणी घेतली असतो तो पॉझिटिव्ह आढळून आला आहे.

सासष्टीत भाजपचे एकूण तीन आमदार आहेत, त्यातील एक मंत्री आहे. सद्या ज्या आमदाराला कोरोनाची बाधा झालेली आहे त्या आमदाराच्या जवळच्या मतदारसंघात सद्या कोरोनाची प्रकरणे वाढलेली आहेत. आतापर्यंत त्या ठिकाणी 15 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

गोव्यात एखादा आमदार कोरोना पॉझिटिव्ह होण्याची ही पहिलीच घटना असून एका माजी मंत्र्यावर सद्या कोविड हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. ‘कांय भिवपाचे ना’ असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणत असतानाच आता खुद्द भाजपचाच आमदार पॉझिटिव्ह निघाल्याने तो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

फातर्पा येथे कोविड-19 चे 9 नवीन रुग्ण मिळाले असून आधीचे 2 मिळून एकूण संख्या 11 वर पोहोचली आहे. फातर्पा पंचायत क्षेत्रात दोन रुग्ण सापडल्यानंतर बोमडामळ व आंब्यामळ येथील एकूण 94 जणांची चाचणी घेण्यात आली होती. त्यात मंगळवारी सायंकाळपर्यंत 9 जणांचा निकाल पॉझिटिव्ह आला आहे. यासंदर्भात फातर्पाचे उपसरपंच बाप्तिस्त फर्नांडिस यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही दुजोरा दिला.

 सदर 9 जणांना हलविण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आज बुधवारी आणखी लोकांच्या चाचण्या घेण्यात येणार असून रुग्णांची संख्या वाढल्याने सध्या फातर्पा परिसरात भीती वाढली आहे. यापूर्वी फातर्पा पंचायत क्षेत्रात दोघांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले होते. सदर दोन विवाहित महिला बहिणी असून त्यापैकी एक आंब्यामळ, तर एक बोमडामळ येथे राहते. त्या आंबेली येथे जाऊन आल्याचे समोर आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, या दोन्ही महिला आठ दिवसांपूर्वी आंबेली येथे एका लग्नकार्यात सहभागी झाल्या होत्या. तसेच अन्य महिलांसमवेत त्या शेतातील पेरणीच्या कामाला जात होत्या. त्यामुळे इतरांना बाधा पोहोचली. त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती तसेच या महिला राहत असलेल्या वाडय़ांवरील लोकांची तपासणी सोमवारी करण्यात आली होती.

दोन कोरोनाबाधित सापडल्यानंतर फातर्पा पंचायत परिसरात स्वेच्छा लॉकडाऊनची हाक देण्यात आली होती. हा लॉकडाऊन रविवार 28 पासून सुरू झालेला असून तो एक आठवडाभर म्हणजे 5 जुलैपर्यंत चालणार आहे. दरम्यान, उपसरपंच फर्नांडिस यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज बुधवारी सकाळी जिल्हाधिकारी फातर्पा भागास भेट देणार आहे.

Related Stories

खोर्ली येथे शॉक लागून युवक ठार

Omkar B

सोनसडय़ावरील कचरा समस्या उग्र

Patil_p

शैक्षणिक धोरणासाठी तीन उपसमित्या

Patil_p

आआयटी प्रकल्प इतरत्र नेणे शक्य

Omkar B

जीवरक्षकांचा मोर्चा आझाद मैदानावर अडविला

Patil_p

अतिक्रमणविरोधी कारवाईनिषेधार्थ पणजी मार्केट बंद

Patil_p
error: Content is protected !!