तरुण भारत

शौर्य चमकणार, विस्तारवादाचा अस्त!

पंतप्रधान मोदींचा चीनला इशारा : भारतीय जवानांचे वाढवले मनोबल : लेह-लडाखला अचानक भेट

लेह / वृत्तसंस्था

Advertisements

भारतीय जवानांच्या पराक्रमाची गाथा संपूर्ण जगाने अनुभवलेली आहे. जवानांची ही शौर्यगाथाच भविष्यात चमकणार असून विस्तारवादाचा अस्त होणार असल्याचा सूचक इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी चीनला अप्रत्यक्षपणे दिला. पंतप्रधानांनी शुक्रवारी अचानक लडाख येथील निमू भागाचा दौरा केला. या भेटीवेळी त्यांनी तेथे तैनात सैनिकांची भेट घेतली. त्यानंतर पंतप्रधानांनी जवानांशी संवाद साधत त्यांचे मनोबलही वाढवले.

गेल्या काही काळात विस्तारवादानेच मानवतेचा विनाश केला आहे. आता विस्तारवादाचे युग संपले असून जग विकासाकडे वाटचाल करत आहे, असे वक्तव्य पंतप्रधानांनी लेहमधील जवानांना संबोधित करताना स्पष्ट केले. जगाच्या विकासासाठी शांतता आवश्यक आहे. विस्तारवादी भूमिका घेणाऱया शक्तींना आवर घालणे आवश्यक असून आता संपूर्ण जग विस्तारवादाविरोधात एकवटू शकते, असेही त्यांनी नमूद करत चीनच्या धोरणाविरोधात लडाखच्या भूमीतून ‘डरकाळी’ फोडली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी सीडीएस बिपिन रावत आणि लष्करप्रमुख एम. एम. नरवणे यांच्यासमवेत लडाख येथील निमू भागात दाखल झाले होते. त्यांच्या या अचानक झालेल्या दौऱयाने चीनसह सर्वांच्याच भुवया उंचावल्या. गलवान खोऱयात चीन आणि भारताच्या सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीनंतर देशभरात चीनविरोधात एक रोष निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. चीनसह सर्वांसाठीच हा आश्चर्याचा धक्का मानला जात आहे. पंतप्रधान मोदींच्या या लेह-लडाख दौऱयाची कुठलीही पूर्वकल्पना प्रसारमाध्यमांना देण्यात आली नव्हती.

जवानांची थोपटली पाठ

तुमचे शौर्य, भारतमातेच्या रक्षणासाठी तुम्ही करत असलेले समर्पण हे अतुलनीय आहे. तुम्ही ज्याठिकाणी आज सेवा बजावत भारतमातेची ढाल बनून उभे आहात त्याची तुलना जगातल्या कशाचीच होऊ शकत नाही. तुमचे साहस, तुमचे शौर्य हिमालयातील पर्वतरांगांपेक्षा मोठे असल्याचे सांगत पंतप्रधानांनी जवानांची पाठ थोपटली. तुमची सेवा आणि इच्छाशक्ती महाकाय आहे. त्याचेच प्रतिबिंब माझ्या भाषणात शब्दरुपाने उतरत असल्याचे सांगत त्यांनी जवानांचे मनोबल वाढवले.

जखमी जवानांचीही विचारपूस

गलवान खोऱयात झालेल्या संघर्षात 20 जवान हुतात्मा झाले होते. या जवानांना पंतप्रधानांनी श्रद्धांजली वाहिली. तसेच जखमी जवानांची विचारपूस करण्यासाठी ते थेट रुग्णालयातही पोहोचले. यावेळी त्यांनी मोकळेपणाने उपचार घेणाऱया जवानांशी संवाद साधला. संपूर्ण देशाला तुमच्या शौर्याबाबत प्रचंड अभिमान आहे. तुम्ही इथे आहात त्यामुळे तुमच्याबाबत प्रत्येक भारतीयांच्या मनात एक अढळ विश्वास असल्याचेही मोदी म्हणाले.

चीनची नरमाईची भूमिका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱयानंतर चीनने नरमाईची भूमिका घेतलेली दिसते. ‘भारत आणि चीन यांच्यामध्ये संवाद सुरु आहे. लष्करी तसेच राजकीय चर्चेच्या माध्यमातून या भागातील तणाव कमी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अशावेळी कोणत्याही पक्षाने या प्रदेशामधील तणाव वाढवणारे पाऊल उचलू नये,’ असे मत चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी व्यक्त केले आहे.

…………..

दौऱयामागील उद्देश…

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनात असलेल्या जवानांचे मनोबल उंचावण्याबरोबरच तिथली परिस्थिती समजून घेणे, हा या दौऱयामागचा मुख्य उद्देश होता. तसेच पूर्व लडाखमध्ये पँगाँगसह गलवान खोऱयावर दावा सांगणाऱया चीनसाठी सुद्धा हा एक सूचक इशारा समजला जात आहे.

पंतप्रधानांच्या भेटीचे ठिकाण… निमू !

@ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम भेट दिलेले लेहमधील निमू हे ठिकाण समुद्रसपाटीपासून 11 हजार फूट उंचीवर आहे.

@ हा प्रदेश युद्धाच्या दृष्टीने अत्यंत खडतर असून तेथे तैनात जवानांना दररोज नवनव्या आव्हानांचा सामना करावा लागतो.

@ लेहमधून कारगीलमध्ये जाताना निमूचा प्रदेश लागतो. अक्साई चीन आणि पीओकेच्या दृष्टीने निमू भारतासाठी महत्वाचे आहे.

@ निमू सिंधु नदीच्या किनाऱयावर आहे. हा सर्व परिसर पर्वतरांगांनी वेढलेला आहे. येथून सिंधु नदी पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाते.

@ निमू हा खूप दुर्गम भाग आहे. येथील आलची गावात निमू-बाजगो हायड्रोइलेक्ट्रिक प्रकल्प उभारण्यात आला आहे.

Related Stories

तेलंगणामध्ये 19 जूनपर्यंत लॉकडाऊन कायम; काही निर्बंधांमध्ये सूट

Rohan_P

कोरोनाचा फटका : 22 मार्चपर्यंत शाळा, महाविद्यालये बंद

tarunbharat

पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली उद्या जागतिक गुंतवणूकदारांची आभासी गोलमेज परिषद

Rohan_P

”योगी सरकारच्या ढिसाळ नियोजनामुळे जनतेवर संकटांचा डोंगर”

Abhijeet Shinde

चेन्नईत दीड कोटीचे सोने जप्त

Patil_p

जम्मू काश्मीर : बस स्टँडवर ग्रेनेड स्फोट, 7 जखमी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!