तरुण भारत

इस्लामपुरातील ‘आज्या मेहरबान’ टोळीला मोक्का

प्रतिनिधी / इस्लामपूर

इस्लामपूर, मिरज ग्रामीण, तसेच सांगली जिल्हयातील बहुतांशी भागात वर्चस्व टिकवण्यासाठी खुनासह अन्य गुन्हे करणाऱ्या येथील ‘आज्या मेहरबान’ टोळीवर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई करण्यात आली. यामध्ये एका अल्पवयीनासह सात जणांचा समावेश आहे. सध्या संतोष कदम खून प्रकरणी हे सर्व आरोपी लॉकअप मध्ये आहेत. इस्लामपूर पोलीस ठाणे हद्दीतील हा सहावा ‘मोक्का’ लागला असून त्याचा तपास जिल्हा पोलीस प्रमुखांनी पोलीस उपाधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्याकडे सोपवला आहे. संघटित गुन्हे करणाऱया अन्य टोळयांचे धाबे दणाणले आहेत.

Advertisements

अजित पाटील (२८,रा.पाटील भजनी मंडपामागे, इस्लामपूर), सूरज उर्फ पांडय़ा जाधव (२६,रा.तानाजी चौक इस्लामपूर), प्रतीक उर्फ पिल्या पाटील (19,रा.तिरंगा चौक इस्लामपूर), ऋषिकेश भंडारे(१६ वर्षे ९ महिने, रा.कापूसखेड नाका इस्लामपूर), कपिल पवार (२६, रा. उरुण इस्लामपूर), सचिन कोळेकर (३३,रा.निनाईनगर इस्लामपूर), संतोष कोळेकर (३२, रा.इस्लामपूर) अशी या कारवाईतील आरोपींची नावे आहेत.

या टोळीने खून, खुनाचा प्रयत्न, सावकारी, जबरी चोरी करताना जखमी करणे, खंडणी, अपहरण, विनयभंग, बेकायदेशीर जमाव जमवणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, अतिक्रमण करणे, जिल्हाधिकारी यांचे आदेशाचा भंग करणे, शिवीगाळ, दमदाटी यांसह कोरोना विषाणूचा संसर्ग वाढवण्याची कृती करुन धोकादायक रित्या वावरणे, असे गंभीर गुन्हे केले आहेत. यामधील काही गुन्हे इस्लामपूर तर काही गुन्हे मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल आहेत.

दरम्यान वर्चस्व वादातून रविवार, २८ जून रोजी रात्री येथील गुंड संतोष कदम याच्याशी आज्या पाटील याची बाचाबाची झाली. त्यानंतर रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास निनाईनगर येथून कदम याला घराबाहेर बोलावून घेऊन पाटील याच्यासह यातील काही आरोपींनी चाकू व लाथाबुक्यांनी मारहाण करुन त्याचा खून केला. या खून प्रकरणात रघू कोळेकर, व कपिल पवार हे कटात सहभागी होते. तांत्रिक तपासातून ते पुढे आले. पोलिसांनी या सर्वांना अटक केली असून त्यांना न्यायालयाने दि. ८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

आरोपी

या टोळीचा वाढता उच्छाद लक्षात घेऊन पोलीस उपाधिक्षक कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कायदा कलम ५१ (ख), सह कोव्हिड १९ नियम ११ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १४२, या गुन्हय़ासह महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी अधिनियम अन्वये वाढीव कलमे लावण्याबाबतचा प्रस्ताव तयार केला. हा प्रस्ताव जिल्हा पोलीस प्रमुख सुहेल शर्मा यांच्याकडे सादर केला होता. या प्रस्तावाचे अवलोकन करुन तो कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांच्याकडे पाठवला होता. त्यास मंजुरी देण्यात आली. त्याच बरोबर या गुन्हय़ाचा तपास पोलीस उपाधीक्षक पिंगळे यांच्याकडे देण्यात आला आहे.

या कारवाईत पोलीस प्रमुखांसह अप्पर पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे, पोलीस निरीक्षक देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेशप्रसाद भरते, शरद जाधव, संदीप सावंत, सचिन सुतार यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे कर्मचारी सिध्दाप्पा रुपनर, शशिकांत जाधव, दीपक गट्टे यांनी भाग घेतला. कदम याच्या खूनानंतर अवघ्या आठवडा भरात मोक्काचा प्रस्ताव पाठवून त्यास मंजुरी मिळाल्याने ‘आज्या मेहरबान’ टोळीला चांगलाच दणका बसला आहे. त्याच बरोबर अजून काही उरल्या-सुरल्या संघटित गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

सहावा मोक्का
इस्लामपूर उपविभागाकडे पोलीस उपधीक्षक म्हणून कृष्णात पिंगळे बदलून आल्यानंतर त्यांनी संघटीत गुन्हेगारी मोडून काढण्याचा चंग बांधला आहे. आज अखेर सोन्या शिंदे, अनमोल मदने, कपिल पवार यांच्यासह एका पारधी टोळीला ‘मोक्का’ लावला आहे. पहिल्या कारवाईतून कप्या पवार स्थगिती मिळवून बाहेर होता. पण या खुनानंतर तो ‘मोक्का’मध्ये अडकला. ही इस्लामपूर व आष्टा शहरातील सहावी कारवाई आहे.

पोलीस उपधीक्षक कृष्णात पिंगळे

वेगवेगळय़ा टोळय़ांचे प्रवाह
यावेळच्या टोळीला ‘आज्या मेहरबान’ टोळीचा धागा असला तरी यामध्ये वेगवेगळया टोळय़ांचे कंगोरे आहेत. रघू कोळेकर व कप्या पवार या दोघांचे वेगळे अस्तित्व होते. पण संतोष कदम याच्या खुनात हे सर्वजण एका वेळी अलगद अडकले. त्यामुळे या कारवाईतून किमान तीन ते चार टोळय़ांना हादरा बसला आहे.

Related Stories

साताऱयात दुकानदाराचा निघृण खून

Patil_p

महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला; 8.8 अंशावर घसरले तापमान

Rohan_P

सांगली शहरातील वाहतूक कोंडीचे चक्रव्यूह भेदले

Abhijeet Shinde

काळम्मावाडी धरणात ८४ टक्के पाणीसाठा

Abhijeet Shinde

राज्य मार्ग दुरुस्तीत पाईपलाईन फुटली, ग्रामस्थांवर पावसाचे पाणी पिण्याची वेळ

Abhijeet Shinde

राजकीय, सामाजिक मेळावे, यात्रांवर बंदी

Patil_p
error: Content is protected !!