तरुण भारत

‘गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज’चा प्रस्ताव लवकरच कॅबिनेटसमोर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या सूचना : सिंधुदुर्गच्या आरोग्य सेवेला प्राधान्य देणार : वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. लहानेंची माहिती

चंद्रशेखर देसाई / कणकवली:

Advertisements

सिंधुदुर्ग जिल्हय़ातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषणा केल्यानंतर प्रशासकीय पातळीवरील कामाला वेग आला आहे. जिल्हय़ातील या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा प्रस्ताव कॅबिनेटसमोर आणण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. प्रस्ताव मंजुरीनंतर मेडिकल कॉलेजच्या निर्मितीसाठीची पुढील कार्यवाही सुरू होईल, असे वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले. यासंदर्भात आमदार वैभव नाईक यांनी डॉ. लहाने यांच्यासोबत दूरध्वनीवरून चर्चा केली. यावेळी त्यांनी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या पुढील प्रगतीबाबतची माहिती देतानाच आपण सिंधुदुर्गमध्ये यापूर्वी अनेकदा आलेलो आहे. सिंधुदुर्गच्या आरोग्य सेवेला प्राधान्य देण्याचे काम निश्चितच होईल, असे सांगितले.

जिल्हय़ातील वैद्यकीय सेवेच्या कमतरतेचा विचार करता हे वैद्यकीय महाविद्यालय लवकरात लवकर होण्यासंदर्भात खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यामार्फत आपला सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले.

बॅकलॉग असूनही कोकण मागे

उपलब्ध माहितीनुसार, कोकणमध्ये सिंधुदुर्गसाठीचे वैद्यकीय महाविद्यालय काही वर्षांपूर्वी मंजूर होते. नंतरच्या काळात कोल्हापूर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झाले. कोकणात ठाण्यापासून सिंधुदुर्गपर्यंत आज एकही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नाही. त्यानंतर बॅकलॉगनुसार सिंधुदुर्गसाठी वैद्यकीय महाविद्यालय मंजुरीची कार्यवाही होत असतानाच यादीत त्यानंतर असलेल्या काही जिल्हय़ांमध्ये वैद्यकीय महाविद्यालये होऊन कार्यान्वितही झाली. सिंधुदुर्गमध्ये हे महाविद्यालय होण्याच्या अनुषंगाने राजकीय शक्ती कमी पडल्याने याबाबत पुढे काहीच कार्यवाही झालेली नव्हती.

मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर गती

जिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होण्यासाठी यापूर्वी कोल्हापूर महाविद्यालयाच्या डिनच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून   प्रस्तावही सादर झाला होता. त्यानंतर मात्र, वैद्यकीय महाविद्यालयाचे घोंगडे भिजत पडले होते. दरम्यान, अलिकडेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्गमध्ये वैद्यकीय महाविद्यालय होणार असल्याबाबतची घोषणा केल्यानंतर या शासकीय महाविद्यालय होण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे.

डॉ. लहानेंशी आमदार नाईकांची चर्चा

वैद्यकीय महाविद्यालयांचा प्रस्ताव व त्याअनुषंगाने कार्यवाहीसाठी वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. लहाने यांच्यावर प्रमुख जबाबदारी आहे. आमदार नाईक यांनी डॉ. लहाने यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सिंधुदुर्गसाठीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव तातडीने तयार होऊन शासनाकडे सादर केल्याचे स्पष्ट केले. प्रस्ताव कॅबिनेटसमोर ठेवण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत, असेही डॉ. लहाने म्हणाले. जिल्हय़ात यापूर्वी आपण अनेकदा आलेलो आहे. येथील आरोग्य सुविधांबाबत आपल्याला माहिती आहे. त्यामुळे येथील आरोग्य सुविधांना गती देण्याचे काम शासनस्तरावरून होण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचेही डॉ. लहाने यांनी स्पष्ट केले.

आरोग्य सुविधांसाठी प्रयत्नशील-नाईक

जिल्हय़ात लवकरात लवकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, यासाठी खासदार राऊत, पालकमंत्री सामंत, माजी पालकमंत्री, आमदार केसरकर यांच्यासह आपणही सातत्याने प्रयत्नशील आहे. या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा सुरू आहे. जिल्हय़ातील जनतेला चांगल्या आरोग्य सेवा सुविधा मिळाव्यात, यासाठीच आमचा हा प्रयत्न आहे. जिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी पुढील काळात हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होईल, असा विश्वासही नाईक यांनी व्यक्त केला.

Related Stories

एलईडी मासेमारी बंदीचा कायदा लवकरच

Patil_p

खेडमध्ये फ्लॅटला लागलेल्या आगीत दोन लाखांचे नुकसान

Patil_p

गस्तीनौका लवकरच मत्स्य विभागाच्या ताब्यात

Patil_p

डिगस शाळेत भरला ‘भाजी बाजार’

NIKHIL_N

माजगाव वासियांच्यावतीने अनुराग सावळचा गौरव

Ganeshprasad Gogate

परंपरेला फाटा देत लाल, काळ्य़ा भाताची लागवड

Patil_p
error: Content is protected !!