तरुण भारत

रशिया, ब्राझीलमधील संकट कायम

रशियात दिवसभरात 6,736 नवे कोरोनारुग्ण : जगात 2.12 लाख बाधितांची भर : द. आशियात चिंताजनक

जगभरात कोरोना विषाणूची 1 कोटी 14 लाख 24 हजार जणांना लागण झाली आहे. यातील 64 लाख 58 हजार 859 बाधितांना संसर्गापासून मुक्तता मिळाली आहे. तर 5 लाख 34 हजार 159 बाधितांचा मृत्यू ओढवला आहे. रशियात मागील 24 तासांमध्ये 6,736 नवे रुग्ण सापडले आहेत. देशातील बाधितांचे एकूण प्रमाण 6 लाख 81 हजार 251 झाले आहे. तर जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगभरात 24 तासांमध्ये 2 लाख 12 हजार 326 रुग्ण आढळून आले आहेत. अमेरिकेत सर्वाधिक 53 हजार 213 आणि ब्राझीलमध्ये 48 हजार 105 नवे रुग्ण सापडले आहेत. दक्षिण आशियात मागील 24 तासांमध्ये 27,947 बाधित सापडले असून 534 जणांचा मृत्यू झाला आहे.

Advertisements

मेक्सिको : बळी वाढले

मेक्सिकोमध्ये कोरोनाबळींचा आकडा 30 हजारांपेक्षा अधिक झाला आहे. बळींप्रकरणी मेक्सिको जगातील पाचव्या क्रमांकाचा पीडित देश ठरला आहे. दिवसभरात मेक्सिकोमध्ये 6,914 नवे रुग्ण सापडले असून 523 जणांना जीव गमवावा लागला आहे. देशात आतापर्यंत 2,52,165 बाधित आढळले असून यातील 1,52,309 जणांना संसर्गापासून मुक्तता मिळाली आहे.

ब्रिटनमध्ये पब, बार खुले

ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये 4 जुलै रोजी अनेक महिन्यांनी बार आणि पब खुले झाल्यावर दिसून आलेले चित्र मजेशीर आणि चकीत करणारे आहे. कोरोना संकटामुळे कित्येक महिने बाहेर पडू न शकलेल्या लोकांना पब, बार आणि रेस्टॉरंटमध्ये स्वतःवर नियंत्रण राखता आले नाही. पब सुरू होताच हजारोंच्या संख्येत लोक मद्यप्राशनासाठी तुटून पडले. हिंसक घटनांमुळे पोलिसांना अनेक ठिकाणी कारवाई करावी लागली आहे. लंडन, ब्लॅकपूल आणि न्यूकॅसलमध्ये मद्यपींच्या गैरवर्तनामुळे पब बंद करावे लागले आहेत. तर 4 जणांना याप्रकरणी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

ब्राझील : 1,091 मृत्यू

ब्राझीलमध्ये 24 तासांमध्ये कोरोना महामारीमुळे 1,091 रुग्णांचा मृत्यू ओढवला आहे. देशात आतापर्यंत 64,365 बाधितांना जीव गमवावा लागला आहे. एक दिवसापूर्वी तेथे 42,223 नवे रुग्ण सापडले होते आणि 1,290 जणांचा मृत्यू झाला होता. ब्राझील कोरोनाग्रस्त आणि बळींप्रकरणी अमेरिकेनंतरचा दुसरा पीडित देश ठरला आहे.

टेक्सास : रुग्णांमध्ये भर

अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनी टेक्सास प्रांतात 8,258 नवे रुग्ण सापडले आहेत तर 33 जण महामारीमुळे दगावले आहेत. प्रांतात आतापर्यंत 1.91 लाख जणांना कोरोना संसर्ग झाला असून 2,608 जणांना जीव गमवावा लागला आहे. प्रांतातील 97 हजार बाधितांनी आतापर्यंत संसर्गावर मात केली आहे. तर फ्लोरिडात दिवसभरात 11,445 नवे रुग्ण आढळले आहेत.

हुबेईत स्थिती सुधारली

चीनच्या हुबेई प्रांतात एकही नवा रुग्ण सापडला नसल्याची माहिती नॅशनल हेल्थ कमिशनने दिली आहे. प्रांतात सध्या 3 लक्षणेरहित रुग्ण असून 121 जणांवर उपचार केले जात आहेत. हुबेईत 68,135 बाधित सापडले असून 63,623 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. प्रांतात आतापर्यंत 4,512 जणांचा मृत्यू झाला आहे.

एचसीक्यूची चाचणी बंद

रुग्णालयात दाखल बाधितांच्या उपचारात हिवतापविरोधी औषध हायड्रॉक्सी क्लोरोक्विन प्रभावी असणे किंवा नसण्यासंबंधी सुरू असलेली चाचणी बंद करत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. तसेच डब्ल्यूएचओने एड्सच्या उपचाराकरता वापरले जाणारे औषध लोपिनाविर/रिटोनाविरची चाचणीही बंद केली आहे. चाचणीची देखरेख करणाऱया समितीची शिफारस मान्य केल्याचे डब्ल्यूएचओकडून म्हटले गेले आहे.

 एचसीक्यू आणि लोपिनाविर/रिटोनाविरच्या वापरामुळे कोरोनारुग्णांच्या मृत्यूदरात कुठलीच घट झालेली नाही किंवा किरकोळ घट झाल्याचे अंतरिम निष्कर्ष दर्शवित असल्याचे डब्ल्यूएचओने म्हटले आहे.

इस्रायल : 29 हजार रुग्ण

इस्रायलमध्ये दिवसभरात 977 नवे रुग्ण सापडले आहेत. देशातील बाधितांचे प्रमाण आता 29 हजारांपेक्षा अधिक झाले आहे. तर बळींचा आकडा 330 वर पोहोचला आहे. इस्रायलमध्ये आतापर्यंत 17 हजार 773 बाधितांनी संसर्गापासून मुक्तता मिळविली आहे. देशाचे सीमा पोलीस प्रमुख याकुव शब्ताई यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

टाळेबंदीचे 100 दिवस

दक्षिण आफ्रिकेत टाळेबंदी लागू होऊन 100 दिवस पूर्ण झाले आहेत. देशात 27 मार्च रोजी टाळेबंदी लागू करण्यात आली होती. तेथे 1 मेपासून निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. निर्बंध शिथिल झाल्यावर देशातील रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. दक्षिण आफ्रिकेत मागील 24 तासांमध्ये 10,853 नव्या रुग्णांची भर पडली आहे. देशातील बाधितांचा आकडा आता 1,87,977 झाला असून 3026 जणांना जीव गमवावा लागला आहे.

Related Stories

अमेरिकेत 22 ऑक्टोबर रोजी दुसरा अध्यक्षीय वादविवाद

Patil_p

फ्रान्स : 52 हजार रुग्ण

Patil_p

चीनमध्ये महापूर;140 जणांचा मृत्यू

datta jadhav

400 वर्षे जुन्या बेटावर वास्तव्य करता येणार

Patil_p

मंदिरासाठी इटालियन व्यक्तीची धडपड

Patil_p

ऑस्ट्रेलिया : कोरोना लस दिल्यानंतर 216 स्वयंसेवक HIV पॉझिटिव्ह

datta jadhav
error: Content is protected !!