तरुण भारत

चीनशी युद्धाचा धोका, अमेरिका-ब्रिटन सजग

जपानपासून पश्चिम आशियापर्यंत हजारो सैनिक तैनात : सुएज कालव्यानजीक ब्रिटनचे कमांडो नियुक्त : आशिया-प्रशांतवर लक्ष केंद्रीत

वृत्तसंस्था / वॉशिंग्टन, लंडन

भारतासमवेत आशियात शेजारी देशांसोबत चीनची वाढती अरेरावी पाहता अमेरिकेने ड्रगनचा सामना करण्यासाठी कंबर कसली आहे. अमेरिकेने स्वतःच्या हजारो सैनिकांना जपानपासून ऑस्ट्रेलिया तसेच पूर्ण आशियात तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत-प्रशांत भागात शीतयुद्धानंतरचे हे सर्वात महत्त्वाचे भूराजनयिक आव्हान असल्याचे डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचे मानणे आहे. सैनिकांना तैनात केल्यावर अमेरिकेचे सैन्य स्वतःचे जागतिक प्रभुत्व पुन्हा प्रस्थापित करू शकणार आहे. तर ब्रिटननेही हजारो कमांडो सुएज कालव्यानजीक तैनात करण्याचे पाऊल उचलले आहे.

अमेरिका जर्मनीत तैनात स्वतःच्या हजारो सैनिकांना आशियात हलविणार आहे. हे सैनिक अमेरिकेच्या ग्वाम, हवाई, अलास्का, जपान आणि ऑस्ट्रेलियातील सैन्यतळांवर तैनात केले जातील.

चीन निशाण्यावर

2000 च्या दशकात अमेरिकेचे लक्ष पूर्णपणे दहशतवादावर केंद्रीत होते आणि त्याने इराक तसेच अफगाणिस्तानात युद्धही पुकारले होते. चीन आणि रशियासारख्या महासत्तांसोबत प्रतिस्पर्धा करण्यासाठी अमेरिकेच्या सैन्याला निश्चितपणे महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये पूर्वीच्या तुलनेत अधिक वेगाने सैन्य तैनात करावे लागणार असल्याचे अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओ ब्रायन यांनी म्हटले आहे.

अमेरिकेची व्यूहनीती बदलली

अमेरिकेच्या सैन्याचे लक्ष आता युरोप आणि पश्चिम आशियावरून हटून आशिया-प्रशांतवर केंद्रीत झाले आहे. अमेरिकेच्या सैन्याने भूयुद्धाऐवजी सागरी आणि आकाशातील युद्धाच्या दृष्टीने तयारी चालविली आहे. दक्षिण चीन समुद्र, पूर्व चीन समुद्र किंवा हिंदी महासागरात युद्ध लढण्याची वेळ आल्यास क्षमता प्रभावी असणे आवश्यक आहे.

ब्रिटनही सतर्क

चीनच्या धोक्याला सामोरे जाण्यासाठी ब्रिटनही स्वतःचे सैनिक आशियात पाठवत आहे. आशियाई सहकारी देशांसोबत घनिष्ठ संबंध राखून, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करत आणि सुएज कालव्यानजीक अधिक सैनिक तैनात करून चीनच्या कारवाया रोखता  येतील असे ब्रिटनचे मानणे आहे. कोरोना विषाणूच्या खात्म्यानंतर जगात आर्थिक संकट, वाद आणि संघर्ष वाढणार असल्याचा इशारा ब्रिटनचे संरक्षणमंत्री बेन वालेस यांनी दिला आहे. ब्रिटनने तैवानसोबत संबंध दृढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

चीनच्या हालचाली

चीनला रोखण्याचे लक्ष्य प्राप्त करण्यासाठी अमेरिका जर्मनीतील 9500 सैनिकांना भारत-प्रशांत क्षेत्रात तैनात करणार आहे. तर चीन सातत्याने स्वतःच्या सैन्यावर भरभक्कम खर्च करत आहे. एका अनुमानानुसार चीन रशियाच्या तुलनेत तीनपट अधिक निधी संरक्षणावर खर्च करत आहे. अमेरिकेच्या युद्धनौका आणि लढाऊ विमानांना स्वतःच्या नजीक येऊ न देण्याची चीनची व्यूहनीती आहे. याच कारणामुळे चीन स्वतःची क्षेपणास्त्र क्षमता वाढविण्यासह रडारयंत्रणा अत्याधुनिक करू पाहत आहे.

Related Stories

हज यात्रेकरूंसाठी सौदी अरेबियाचे नवे नियम

datta jadhav

देशात गेल्या 24 तासात 549 रुग्णांची भर 

prashant_c

हिमाचल प्रदेशात 25 टक्के बस भाडे वाढविण्यास मंजुरी

pradnya p

इंडोनेशियात ज्वालामुखी जागृत

Patil_p

चीनच्या पोटदुखीचे कारण झाले उघड

Patil_p

दिलासादायक : देशात कोरोना रुग्ण कमी होण्याचे प्रमाण 25 टक्के

pradnya p
error: Content is protected !!