तरुण भारत

झुआरीनगरातील कंटेनमेंट झोनभोवती पोलीस सुरक्षा अधिक कडक करणार

प्रतिनिधी/ वास्को

झुआरीनगरातील कंटेनमेंट झोनभोवती आता कडक पहारा ठेवण्यात येणार आहे. काही लोक आडमार्गाने या वस्तीतून बाहेर पडत असल्याचे नजरेस आल्याने आता निर्बंध कडक करण्यात येणार आहेत. या वस्तीतील नागरिकांसाठी जीवनावश्यक वस्तू पुरवण्याची आणि त्यांच्यासाठी शौचालयांची सुविधाही उपलब्ध करण्याचा निर्णय सोमवारी स्थानिक आमदार एलिना साल्ढाना यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

Advertisements

झुआरीनगरातील कंटेनमेंट झोनमध्ये कोरोना बाधीतांची संख्या दिवसेदिवस वाढतच आहे. या वस्तीत नागरिकांच्या तपासणीसाठी त्यांचे स्वॅब गोळा करण्याची प्रक्रियाही चालूच आहे. त्यामुळे कोरोना बाधीतांच्या संख्येत अधिकच भर पडण्याची शक्यता आहे. या कंटेनमेंट झोनमधील परिस्थिती गंभीर असली तरी कोरोनाच्या भितीबरोबरच  स्थानिक कुटुंबांना दैनंदिन जीवनावश्यक गरजा व आर्थिक समस्येचीही चिंता भेडसावत आहे. त्यामुळेच रविवारी दुपारी या वस्तीतील नागरिकांनी रस्त्यावर उतरून आपल्या समस्या शासकीय अधिकाऱयांसमोर मांडल्या होत्या. त्याची दखल स्थानिक आमदार आणि शासकीय अधिकाऱयांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांच्या समस्यांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी सोमवारी संध्याकाळी कुठ्ठाळीच्या आमदार एलिना साल्ढाना यांच्या उपस्थितीत उपासनगर येथील त्यांच्याच कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीला पोलीस अधीक्षक पंकजकुमार सिंग, मुरगावचे उपजिल्हाधिकारी सचिन देसाई, सांकवाळ पंचायतीचे पंच सदस्य रमाकांत नाईक, तुळशिदास नाईक, कविता कमल, नारायण नाईक, गोविंद लमाणी व इतर सदस्य उपस्थित होते.

या बैठकीत प्रथम पंच सदस्यांनी कंटेनमेंट झोनमधील लोकांच्या समस्या मांडल्या. तसेच अन्य ज्या काही उपाययोजना झोनमध्ये व्हायला हव्यात अशा गोष्टीही त्यांनी आमदार व शासकीय अधिकाऱयांच्या नजरेस आणून दिल्या. त्यानंतर या समस्या व उपाययोजनांविषयी चर्चा झाली. कंटेनमेंट झोनभोवती विशेषता चौपदरी महामार्गाच्या बाजुने कडक पोलीस बंदोबस्त नसल्याने या वस्तीतील काही लोक त्या बाजुने वस्तीतून बाहेर पडत असतात. त्यामुळे त्या बाजुने अधिक कडक बंदोबस्त ठेवण्याचा तसेच वस्तीभोवती अन्य काही आवश्यक ठिकाणीही कडे उभे करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. कंटेनमेंट झोनच्या नियमांचे उल्लंघन करू पाहणाऱया व्यक्तींविरूध्द कडक कारवाई करण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला. या वस्तीत शौचालयांची कमतरता असल्याने त्यांच्या तात्पुरत्या सोयीसाठी फिरती शौचालये या वस्ती उपलब्ध करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठय़ाचा महत्वाचा प्रश्न उपस्थित होताच या वस्तीतील सर्व किराणा दुकाने खुली ठेवण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. तसेच जीवनावश्यक माल घेऊन बाहेर येणाऱया वाहनांना कंटेनमेंट झोनमध्ये प्रवेश देण्याचे यावेळी ठरले. गरज भासल्यास लहान मुलांना पोलीयो डोस पाजण्याची सुविधाही उपलब्ध करण्यात येणार आहे.

आमदार एलिना साल्ढाना यांनी यावेळी बोलताना सकाळी कंटेनमेंट झोनसंबंधी सचिवालयात मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीचीही माहिती यावेळी उपस्थितांना दिली.

दरम्यान, झुआरीनगरात सोमवारी संध्याकाळपर्यंत कोरोना बाधीतांची संख्या 98 झाली होती. हेडलॅण्ड सडय़ावर 70 तर बायणात कोरोना बांधीतांची संख्या 72 झालेली आहे. नवेवाडेत सोमवारी संध्याकाळपर्यंत कोरोना बाधीतांची संख्या 60 झाली होती. तर खारवीवाडा भागात कोरोना बाधीतांची संख्या 31 झाली आहे. या भागातील तिघांना आतापर्यंत मृत्यू आलेला आहे.

Related Stories

सांगे पालिकेच्या प्रभाग 1 मधून रूमाल्डो फर्नांडिस यांचा अर्ज

Amit Kulkarni

गोमंतकीयांचा जीव धोक्यात घालून सनबर्न नकोच

Patil_p

नागेश संस्थानच्या कार्याची आमदार ढवळीकरांकडून प्रशंसा

Omkar B

केपे विभागीय कृषी कार्यालयाकडून झेंडू लागवडीला चालना

Omkar B

कोरोना रुग्णांची घेतली जातेय योग्य काळजी

Patil_p

‘त्या’ तरूणांच्या कौशल्यामुळेच बुडणाऱया इसमाला जिवनदान

Amit Kulkarni
error: Content is protected !!