तरुण भारत

माजी आरोग्यमंत्री डॉ. सुरेश आमोणकर यांचे निधन

प्रतिनिधी/ मडगाव

गोव्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ. सुरेश कुसो आमोणकर (65 वर्षे) यांचे काल सोमवारी रात्री 7.45 वा. मडगावच्या कोविड हॉस्पिटलमध्ये निधन झाले. डॉ. आमोणकर यांना कोविडचा संसर्ग झाल्याने 22 जून रोजी रात्री मडगावच्या कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांची प्रकृती खालावलेलीच होती. गोव्यातील कोरोनाचा आठवा बळी हे आमोणकर ठरले आहेत.

Advertisements

डॉ. आमोणकर यांच्या पश्च्यात पत्नी श्रीमती योजना तसेच दोन कन्या : स्नेहा (विवाहित) व युती (अविवाहित) असा परिवार आहे. यांना मूत्रपिंडाचा आजार होता. त्यात कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्याची प्रकृती अधिक खालावली होती. मडगावच्या कोविड हॉस्पिटलमध्ये त्यांना डायलेसिस देण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्या प्रकृतीत किंचित सुधार झाला होता. त्याच दिवशी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांच्याशी संपर्क साधून आरोग्याची विचारपूस केली होती. कोविड हॉस्पिटलात दाखल केल्याच्या तिसऱया दिवशी त्यांनी घरचे माशांचे हुमण खाण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याप्रमाणे, मडगावच्याच एका जवळच्या व्यक्तीने त्यांना माशांचे हुमण पुरविले होते.

आजारी असूनही कोरोनाशी दिली झुंज

डॉ. आमोणकर हे 14 दिवस कोविड हॉस्पिटलमध्ये होते. त्यातील जवळपास दहा दिवस ते अतिदक्षता विभागातच होते. अतिदक्षता विभागात सर्वाधिक दिवस घालविणारे तेच ठरले. गेल्या दोन-तीन दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. तरी सुद्धा कोविड हॉस्पिटलातील डॉक्टर एक अंधुक आशा बाळगून होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी तसेच ते निगेटिव्ह निघावे आणि तसे झाल्यास त्यांना गोमेकॉत पाठविण्यासंदर्भातील विचारविनिमय देखील झाला होता. मात्र, काल कोरोनाच्या विरोधातील लढाईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

डॉ. एडविन गोम्स यांनी 98 दिवसाच्या कोविड हॉस्पिटलातील सेवेतून तीन आठवठय़ासाठी ब्रेक घेतल्यानंतर तिघांचा बळी गेला आहे. त्यात कुडतरीतील एक महिला, वास्कोतील नगरसेवक पास्कॉल डिसोझा व काल सोमवारी डॉ. सुरेश आमोणकर यांचा समावेश होत आहे.

डॉ. आमोणकर हे प्रामाणिकपणाने जगले

आपले निकटचे मित्र, माजी आरोग्यमंत्री डॉ. सुरेश आमोनकर यांच्या दुर्दैवी निधनाने आपल्याला धक्का बसला आहे. आपले त्यांच्याशी जवळचे नाते होते. डॉ. आमोणकर आपल्या वैयक्तिक, व्यावसायिक, राजकीय आणि सामाजिक कारकीर्दीत प्रामाणिकपणाने जगले असे विरोधीपक्षनेते दिगंबर कामत यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.  माजी मुख्यमंत्री फ्रान्सिस्को सार्दिन यांच्या सरकारमध्ये ते आपले मंत्रीमंडळातील सहकारी होते. ते नेहमी साधेपणाने जगले आणि आपल्या मतदारसंघ आणि गोवा राज्यातील लोकांना आपली उत्तम सेवा देण्यासाठी प्रयत्नशील राहिले. गोव्याच्या उन्नतीसाठी त्यांनी योगदान दिले. आपण त्यांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त करतो. त्याचा आत्म्यास शांती लाभो असे श्री. कामत म्हणाले.

प्रदेश भाजपचे माजी अध्यक्ष तथा माजी आरोग्यमंत्री डॉ. सुरेश आमोणकर यांच्या दुःखद निधनावर भाजपचे सरचिटणीस तथा माजी आमदार दामू नाईक तसेच अनिवासी भारतीय आयुक्त ऍड. नरेंद्र सावईकर यांनी दुख व्यक्त केले असून त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे म्हटले आहे.

गोव्यासाठी आमोणकरांचे मोठे योगदान : मुख्यमंत्री

माजी आरोग्यमंत्री डॉ. सुरेश आमोणकर यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दु:ख प्रकट केले आहे. आमोणकरांनी गोव्यासाठी दिलेले योगदान मोठे असून ते विसरता येणे शक्य नाही. त्यांच्या कुटुंबियांप्रति आपण सहवेदना व्यक्त करतो, असे डॉ. सावंत यांनी शोक संदेशात म्हटले आहे. गोवा प्रदेश भाजपचे डॉ. आमोणकर हे अध्यक्ष होते. पाळी मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून आले होते. गोव्यात भारतीय जनता पक्ष वाढवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. गरीब जनतेसाठी ते एक चांगले डॉक्टर म्हणून प्रसिद्ध होते, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

शिस्तप्रिय कार्यकर्ते म्हणून उत्कृष्ट कामगिरी : श्रीपाद नाईक

भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा माजी आरोग्यमंत्री डॉ. सुरेश आमोणकर यांच्या दुख:द निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. त्यांच्या कुटुंबीय, मित्र परिवार यांना आपल्याकडून ह्द्य संवेदना. त्यांनी राज्यात भाजपाला जनतेत स्थान मिळावे म्हणून आमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून श्रम घेतले होते. पक्षासाठी शिस्तप्रिय कार्यकर्ते म्हणून त्यांनी कामही केले होते, असे केंद्रीय आयुषमंत्री तथा संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी म्हटले आहे.

……………………………………………………………………………………………………………..

गोवा एका कुशल नेत्याला मुकला : तानावडे

डॉ. सुरेश आमोणकर यांच्या निधनाने आपल्याला अती दु:ख झाले. गोवा एका कुशल, सुस्वभावी अशा चांगल्या नेत्याला मुकला आहे. मंत्री असताना त्यांनी या राज्यासाठी केलेला विकास त्याचबरोबर जनतेची केलेली अखंड सेवा आणि प्रदेश भाजप अध्यक्ष असताना त्यांनी भाजपच्या तमाम कार्यकर्त्यांशी संपर्क साधून पक्षासाठी दिलेले योगदान हे आम्ही कधीही विसरू शकणार नाही, अशा शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी डॉ. शुरेश आमोणकर यांना श्रद्धांजली वाहिली.

Related Stories

वेदांता महिला फुटबॉल स्पर्धेत एफसी वायएफएचा तीन गोलांनी विजय

Patil_p

निम्न शिक्षक-पोलिसांत संघर्ष

Amit Kulkarni

कोरगावात 20 लाखाचा गांजा जप्त

Patil_p

लोहिया मैदानावरील पुतळा, स्मारक शोधून सुरक्षित ठिकाणी ठेवावे

Amit Kulkarni

कोकणी भाषा मंडळाचे विविध पुरस्कार जाहीर

Patil_p

गुळे येथे अपघातात बळी गेलेल्या गुरांच्या मालकांना भरपाई द्यावी

Amit Kulkarni
error: Content is protected !!