तरुण भारत

प्रतिसादाकडे वळण्यासाठी…

सुप्रसिद्ध मेंदूतज्ञ व मानसोपचार तज्ञ व्हिक्टर एमिल फ्रँक याचे Between stimulus and response there is space. In that space lies our freedom and power to choose our response हे वाक्मय मार्गदर्शक आणि विचार करायला लावणारे आहे. भावना हाताळण्याचे कौशल्य आणि भावनांचे नियोजन चांगले असणे हे मानसिक आरोग्याच्या दृष्टीने गरजेचे आहे. हे नियोजन चांगले असण्यासाठी भावनिक प्रतिसाद आणि प्रतिक्रिया यातील फरक तपासून पाहणे आवश्यक आहे कारण बऱयाच समस्यांच्या मुळाशी या गोष्टीचे भान नसणे हेही एक कारण पहायला मिळते. क्षुल्लक कारणावरून रागावणाऱया मंडळींच्याबाबतीत हे सांगता येईल. आपण प्रतिसाद (Response) देत आहोत की प्रतिक्रिया (Reaction) यांचे त्यांना भान नसते. अनेकदा त्यांच्याबाबतीत असे होते की, जरा काही मनाविरुद्ध घडायचा अवकाश काही कळायच्या आतच रागावण्याची प्रतिक्रिया देऊन ते मोकळे होतात. लहान असताना असे कुणी चिडत असेल तर चिडका बिब्बाच आहे तो असे त्यावेळी गमतीने म्हटले जाते परंतु नंतर सवयीतील सातत्याने स्वभावाचा आकृतिबंध तसाच तयार होतो आणि अशा माणसांचा सहवास नकोसा वाटू लागतो. क्रोधामुळे अशा व्यक्तींचे स्वतःचे मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य धोक्मयात येतेच आणि इतरांनाही यांचा स्वभाव त्रासदायक होतो. नातेसंबंधात अडथळे येऊ लागतात. एकंदरच समायोजन क्षमतेवर याचा परिणाम होतो.

खरंतर प्रतिसाद कसा द्यायचा हे ठरवता येण्याचे किंवा स्वतःला थांबवण्याची क्रिया करण्याचे वरदान फक्त मनुष्यप्राण्यालाच आहे. कारण मानवी मेंदूच ते कार्य करू शकतो. आपल्या मेंदूतील प्री प्रंटल कॉरटेक्सचे ते काम आहे. मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणे ‘मनाचा मेंदूतील ब्रेक’ हे इनबिल्ट फंक्शन आहे. मेंदूतील प्री प्रंटल कॉर्टेक्स हा भाग वयाच्या सातव्या वर्षापासून विकसित होऊ लागतो. वयाच्या पंचविशीपर्यंत ही प्रक्रिया सुरू असते. या साऱया टप्प्यात साऱयाच गोष्टींचा वेग अधिक असतो. पंचविशीत एखादा निर्णय आवेगात घेतला गेला तर गद्धे पंचवीशी ना..असे म्हटले जाते. म्हणजेच या वयापर्यंत निर्णय आवेगात घेतले जाण्याची शक्मयता अधिक असते. केवळ याच वयात नव्हे तर जीवनाची वाटचाल करत असताना हरएक टप्प्यावर भावभावनांची हाताळणी सुयोग्य पद्धतीने होण्यासाठी प्री प्रंटल कॉर्टेक्सची सक्रियता महत्त्वाची आहे. इमोशनल रेग्युलेशन हे या भागाचे महत्त्वाचे कार्य आहे.

Advertisements

 खरंतर मानवी मनाचा हा ब्रेक आहे. या ब्रेकचा वापर केला गेला तर बऱयाच समस्यापासून आपण स्वतःला वेगळे ठेवू शकतो. आपल्या जीवनाची गाडी मानसिक आरोग्याच्या ट्रकवर योग्य दिशेने धावण्यासाठी मेंदूतील या फंक्शनला सक्रिय करणे गरजेचे आहे. माईंडफुलनेसच्या सरावाने हे शक्मय आहे. आपल्या मनाला वर्तमानात आणणे म्हणजेच माईंडफुल असणे. मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणे याची सुरुवात नैसर्गिक श्वसनामुळे होणारी छाती पोटाची हालचाल जाणत करता येईल. दर तासात असे किमान पाच श्वास जाणायचे हे एक चॅलेंज म्हणूनही स्वीकारता येईल.

मानवी मेंदू अद्वितीय आहे. अनेक कामे तो एकाचवेळी करत असतो. आपल्या या सुपर कॉम्प्युटरमधे एकाच वेळी अनेक फाईल्स ओपन होत असतात. त्यामुळे विचार, भावनांची गर्दी होते. जसे आपण कॉम्प्युटरवर एखादे काम करत असताना एखादी अनावश्यक फाईल ओपन होते. ते आपल्या लक्षात येते आणि लक्षात येता क्षणी आपण ती क्लोज करतो. तसेच माईंडफुलनेसच्या सरावाने आपले लक्ष विचारात भरकटते आहे याचे भान येऊन अशी एखादी विचार वा भावनेची ओपन झालेली अनावश्यक फाईल बंद करणे सहज शक्मय होऊ लागते. परंतु त्यासाठी या सजगतेच्या तंत्रांचा सराव करण्याचा संकल्प आणि त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न आवश्यक आहेत. श्वासाची हालचाल जाणण्यासोबतच एखाद्या आलंबनावर लक्ष केंद्रीत करण्याचा सराव करता येईल. उदा. डोळे बंद करायचे आणि आपले संपूर्ण लक्ष बाह्य आवाजांवरती केंद्रीत करायचे. गाडय़ांचा आवाज, पक्ष्यांचा आवाज, पंख्यांचा आवाज, माणसांचे आवाज. विविध आवाज ऐकण्याचा प्रयत्न करायचा. दूरच्या आणि जवळच्या आवाजातील बदल जाणायचे. हे करत असताना मनात विचार येतील, मन विचारात भरकटेल. ज्यावेळी असे होईल त्यावेळी मान्य करायचे की मन विचारात भरकटले आहे. ठीक आहे. न चिडता, उदास न होता पुन्हा लक्ष आवाजावर केंद्रीत करायचे. पुन्हा परिसरातील आवाज जाणायला सुरुवात करायची. अशा पद्धतीने ज्यावेळी आपण (सेन्स ऑर्गन) पंचज्ञानेंद्रियापैकी एखाद्या ज्ञानेंद्रियाने दिलेली माहिती तिथेच लक्ष देत जाणायला सुरुवात करतो तेव्हा मेंदूतील प्री प्रंटल लोबमध्ये असलेले अटेंशन सेंटर सक्रिय होते. लक्ष देण्याची क्षमता वाढू लागते. मेंदूतील डिफॉल्ट मोडलाही विश्रांती मिळते. एखाद्या गोष्टीमधे यश मिळविण्यासाठी त्यामधे लक्ष असणे गरजेचे आहे. यामुळे ते साध्य होऊ लागते. आपण ‘बीईंग इन दी झोन’ राहू लागतो. या सरावासोबतच सजगता तंत्रामध्ये साक्षी ध्यानालाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. साक्षी ध्यान हे माईंडफुलनेसचे महत्त्वाचे टूल आहे.

 आपल्या मनामध्ये अनेक विचार, भावना येत असतात त्यामुळे शरीरात काही संवेदनाही निर्माण होतात. उदा. भीती वाटली की धडधडते, राग आला तर डोके जड होते इ. मनात येणारे विचार, भावना, शरीरामध्ये जाणवणाऱया संवेदना हे शांत बसून न्याहाळत रहायचे. आता मनामध्ये हा विचार आहे. ओके.. चांगला वाईट असे लेबलिंग न करता तो स्वीकारायचा. तो विचार वा भावना किती काळ राहते, बदलते का, शरीरामध्ये त्यामुळे कोणते बदल जाणवतात, हे चांगले किंवा वाईट अशी प्रतिक्रिया न देता उत्सुकतेने न्याहाळत राहायचे. असा सराव रोज दहा मिनिटे नियमितपणे केला तर All thoughts are not facts चे भान येते. दृष्टिकोन बदलू लागतो. साक्षीध्यानामुळे अनेक गोष्टींचे भान येते.

एखादी गोष्ट बदलणे आवश्यक आहे याची जाणीव होऊन कर्ताभाव विकसित होतो आणि ती बदलण्याचा प्रयत्न केला जातो. जेव्हा एखादी गोष्ट वा घटना आनंददायी आहे तर भोक्ता भावाने त्याचा खरा आनंद घेता येतो आणि ज्या गोष्टी, घटना, परिस्थिती आपल्या आवाक्मयाबाहेर आहे त्याकडे साक्षीभावाने पाहणे जमू लागते. त्यामुळे उदासी, निराशा यापासून स्वतःला बाजूला ठेवता येते. साक्षीध्यानामुळे अमायग्डलाची सक्रियता कमी होते आणि इन्सुला किंवा Anterior cingulate cortex ची सक्रियता वाढते. वैचारिक मेंदू योग्य रीतीने सक्रीय झाल्यामुळे आवेगी वर्तन (इंपल्सिव्ह बिहेवियर) टाळता येते. observing self  विकसित होतो. भावनांची तीव्रता, वारंवारता आणि कालावधी यावर योग्य नियंत्रण आल्याने भावनिक हुशारी वाढण्यासही मदत होते. माईंडफुलनेसची अशी विविध तंत्रे आत्मसात करून त्याचा सातत्याने सराव केल्यास प्रतिसाद आणि प्रतिक्रिया यातील फरक उमजेल, अनेक गोष्टी सहजसाध्य तर होतीलच परंतु दृष्टिकोन बदलायला मदत झाल्याने आयुष्याला नवीन अर्थ प्राप्त होईल हे मात्र खरे!!

Ad.  सुमेधा देसाई, मो.94226 11583

Related Stories

आर्सेलर मित्तल 2 हजार कोटी गुंतवणार

Patil_p

भयंकर वणवे, प्रलयंकारी महापूर, उपाय काय?

Patil_p

कोरोनाची त्सुनामी

Patil_p

वाढीव शुल्काचे शुक्लकाष्ठ

Patil_p

दृष्टीहीन विकासाचे प्रकल्प

Omkar B

कृष्णाआजी

Patil_p
error: Content is protected !!