तरुण भारत

कोकणच्या गणेशोत्सवावरही कोरोनाचे सावट

कोकणामध्ये घरोघरी साजरा केला जाणारा गणेशोत्सव जवळ आला आहे. परंतु कोरोनाच्या संकटकाळात नेहमीप्रमाणे गणेशोत्सव कसा साजरा करायचा, हा मोठा प्रश्न कोकणवासियांसमोर आहे.

गणेश चतुर्थी जवळ आली की मुंबईतील कोकणी माणसांना गावाला जाण्याचे वेध लागतात. यावर्षी मात्र कोरोनामुळे चाकरमान्यांच्या आनंदावर विरजण पडल्यात जमा आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हय़ातील तिथवली ग्रा.पं.ने गणेशोत्सव काळासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आखल्या आहेत. त्याचाच आदर्श घेऊन संपूर्ण कोकणात प्रतिबंधात्मक उपाययोजना आखल्यास गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडू शकतो.

Advertisements

कोरोना विषाणूच्या संकटामुळे गेल्या तीन महिन्यात देशभर साजरे होणारे विविध धार्मिक उत्सव किंवा कार्यक्रम रद्द करावे लागले. आषाढी एकादशीला पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो भाविक येत असतात. परंतु, यावर्षी त्या ठिकाणीही संचारबंदी लागू करून साधेपणाने उत्सव साजरा करण्यात आला. असे अनेक सण, उत्सव साजरे करत असताना कोकणामध्ये घरोघरी साजरा केला जाणारा गणेशोत्सव जवळ आला आहे. परंतु, कोरोनाच्या संकटकाळात नेहमीप्रमाणे गणेशोत्सव कसा साजरा करायचा, हा मोठा प्रश्न कोकणवासियांसमोर आहे. मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळानेही यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव रद्द करून आरोग्योत्सव साजरा करायचा मोठा निर्णय घेतला आहे. परंतु, हा सार्वजनिक गणेशोत्सव असल्याने तो रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हय़ात सार्वजनिक गणेशोत्सवांपेक्षा घरोघरी गणेशोत्सव साजरा केला जातो. दोन्ही जिल्हय़ात दीड लाख गणेशमूर्तींचे पूजन हेते.

सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सिंधुदुर्ग व रत्नागिरी दोन्ही जिल्हय़ांच्या जिल्हाधिकाऱयांना गणेशोत्सवाचे नियोजन करण्यासाठी 19 सदस्यांची समिती स्थापन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याप्रमाणे दोन्ही जिल्हाधिकाऱयांनी नियोजनाची तयारी सुरू केली आहे. मात्र नेमकी काय तयारी केली आहे, हे अद्याप समजलेले नाही. मात्र सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी गणेशोत्सव काळात रूम क्वारंटाईन करण्याचे सूतोवाच केले आहे. ही संकल्पना चांगली आहे. मात्र गणेशोत्सव काळात रूम क्वारंटाईन करताना घरातील वातावरण कसे असणार, यावर अवलंबून राहणार आहे. गणेशोत्सवात घरातील सर्व कुटुंब एकत्र येते आणि सण साजरा केला जातो. अशा परिस्थितीत चाकरमानी कितपत रूम क्वारंटाईन होऊन राहतात, यावर शक्याशक्यतांचे वातावरण निर्माण होऊ शकते. तसेच 14 दिवसांचे क्वारंटाईन असेल. गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी 14 दिवस अगोदर चाकरमानी आले, तर ऐन गणपती सणात क्वारंटाईन राहण्याचा प्रश्न राहणार नाही. मात्र चाकरमान्यांना ते शक्य होणार का, याबाबतही साशंकता आहे.

गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने घरोघरी साजरा होत असला, तरी कोरोना विषाणूच्या संकटामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर निर्णय घ्यावेच लागणार आहेत. रत्नागिरी जिल्हय़ात तर कोरोनाने थैमान घातले असून आतापर्यंत 781 रुग्ण आढळले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हय़ात काही प्रमाणात कोरोना नियंत्रणात असून आतापर्यंत 245 रुग्ण आढळले आहेत. जे रुग्ण आतापर्यंत आढळले, त्यामध्ये बहुतांशी मुंबई-पुणे येथून आलेल्या चाकरमान्यांमधून आढळले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हय़ात दीड लाखाहून अधिक, तर रत्नागिरी जिल्हय़ात दोन लाखाहून अधिक चाकरमानी आले आहेत. आता गणेशोत्सवामध्येही तेवढय़ाच मोठय़ा प्रमाणात चाकरमानी कोकणात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी गणेशोत्सव काळाकरिता जिल्हा प्रशासनाला कठोर निर्णय घ्यावे लागतील.

22 ऑगस्टपासून गणेशोत्सव सुरू होत आहे. त्यामुळे कोरोना रोखण्यासाठी आतापासून प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक असून सिंधुदुर्ग जिल्हय़ातील तिथवली ग्रा.पं.ने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कठोर निर्णय घेत चांगल्या प्रकारे प्रतिबंधात्मक उपाययोजना आखल्या आहेत. याचा आदर्श घेऊन रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हय़ात त्या उपाययोजना करणे आवश्यक आहे.

गणेशोत्सव काळात कोरोनाचे संकट दूर ठेवायचे असेल किंवा चाकरमान्यांना ऐन गणपती सणात क्वारंटाईन राहण्याची वेळ येऊ नये यासाठी चतुर्थीपूर्वी 15 ते 18 दिवस आधीच गावी येण्याचे चाकरमानी तसेच ग्रामस्थांच्या नातेवाईकांना कळवावे आणि 5 ऑगस्टपूर्वी गावाला येण्याचे नियोजन करण्यात यावे. गावी आल्यानंतर संस्थात्मक विलगीकरणाची सोय नसलेल्या गावांमध्ये घरांमध्ये स्वतंत्र राहण्याची सुविधा असेल, असे नियोजन करून गावी येण्याचा निर्णय घ्यावा.

गणेशोत्सव कालावधीमध्ये वाडीतील ग्रामस्थांनी एकत्र येऊन आरती, भजने करू नयेत. गावात कोठेही सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात येऊ नये. सार्वजनिक ठिकाणी समूहाने एकत्र येऊ नये तसेच विनाकारण घराबाहेर पडू नये. गणपती विसर्जनावेळी योग्य ते सामाजिक अंतर पाळावे. विसर्जनावेळी मिरवणुका व अन्य मनोरंजनाची साधने वापरणे टाळावीत. मास्कशिवाय घराबाहेर पडल्यास  पाचशे रु. दंड आकारावा. या सर्व नियमांचे पालन केल्यास स्वत:च्या व इतरांच्या आरोग्यास धोका निर्माण होणार नाही. अशाप्रकारे ग्रा.पं.नी प्रतिबंधात्मक उपाययोजना आखून नियमावली तयार केली आहे. याचाच आदर्श घेऊन प्रशासनाने उपाययोजना केल्यास कोरोनाच्या संकटावर नियंत्रण मिळवण्यास मदत होऊ शकते.

संदीप गावडे

Related Stories

आनंदवारे…

Patil_p

बिहारमध्ये कुणाची सरशी?

Omkar B

सोशल आणि रेल्वे प्लॅटफॉर्म!

Patil_p

मोदींचे अश्रू

Patil_p

विष्णुभक्त राजा अंबरिष

Patil_p

त्याच खड्डय़ात झाडे!

Patil_p
error: Content is protected !!