तरुण भारत

रॉकेल बंद अन् घरगुती गॅसची प्रतीक्षा

कृष्णात चौगले / कोल्हापूर

उज्ज्वला योजनेतून सर्व रेशनकार्ड धारकांना घरगुती गॅस मिळाल्याचे गृहित धरून प्रशासनाने करवीर, पन्हाळा, शिरोळ, हातकणंगले, गडहिंग्लज हे पाच तालुके केरोसिनमुक्त केले आहेत. पण या तालुक्यातील सुमारे 15 टक्के शिधापत्रिकाधारकांना घरगुती गॅस मिळाला नसून रॉकेलही बंद आहे. त्यांनी उज्ज्वला योजनेतून गॅसची मागणी केली आहे. पण ऑक्टोबर 2019 पासून या योजनेतून नवीन गॅस कनेक्शन देणे बंद केल्यामुळे हजारो मागणी अर्ज प्रलंबित आहेत. पण प्रत्येक घरात गॅस जोडणी असल्याचा अंदाज बांधून प्रशासनाने पाच तालुक्यांतील रॉकेल पूर्णपणे बंद केले आहे. रेशन दुकानदारांमार्फत प्रत्येक घरात जाऊन सर्व्हे केल्यास वस्तुस्थितीसमोर येणार आहे….

Advertisements

दारिद्रय रेषेखालील कुटुंबांचे जीवनमान उंचावावे, पर्यावरणाची हानी होऊ नये, स्त्राrयांसह कुटूंबातील सर्व सदस्यांना आरोग्याच्या समस्या उद्भवू नये यासाठी मोदी सरकारने 1 मे 2016 रोजी ‘प्रधानमंत्री उज्ज्वला’ ही नवीन योजना सुरु केली. या योजनेअंतर्गंत सुरुवातीच्या टप्प्यात दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना मोफत घरगुती गॅस जोडणी दिली गेली. यामध्ये लाभार्थ्यांना गॅस शेगडी, रेग्युलेटर, जोडणीसाठी पाईपसह एक गॅस सिलिंडर मोफत देण्यात आले आहे. या योजनेतून दारिदय रेषेतील बहुतांशी कुटूंबांना गॅस जोडणी मिळाली आहे. त्यानंतर शासनाने या योजनेची व्याप्ती वाढवून ज्या प्राधान्य व अप्राधान्य शिधापत्रिकाधारकांकडे घरगुती गॅस नाही, त्यांना उज्वला योजनेतून गॅस देण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला. त्याचा लाभ घेत प्राधान व अप्राधान्य गटातील बहुतांशी कार्डधारकांनी गॅस घेतला. त्यामुळे जिह्यात 12 लाख 2 हजार 253 गॅस जोडण्या झाल्या आहेत.
पुरवठा विभागाच्या अंदाजानुसार एका शिधापत्रिकेवर सरासरी 4 सदस्य संख्या गृहित धरल्यास आणि जिह्यातील लोकसंख्येची तुलना करता प्रत्येक घरात गॅस जोडणी असणे आवश्यक आहे. पण प्रशासनाचा हा अंदाज चुकला असून अद्याप सुमारे 20 टक्के शिक्षापत्रिकाधारकांना गॅस जोडणी मिळाली नसल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यामधील अनेकांनी गॅस मागणीसाठी जवळच्या गॅस एजन्सीकडे अर्ज केले आहेत. पण शासनाने ऑक्टोबर 2019 पासून नवीन गॅस जोडणी देण्याची प्रक्रिया स्थगित केल्यामुळे जिह्यातील हजारो अर्ज गॅस एजन्सींकडे प्रलंबित आहेत.

सात तालुक्यांत 2 लाख 4 हजार लिटर्स रॉकेलचे वितरण
जिह्यातील करवीर, पन्हाळा, शिरोळ, हातकणंगले, गडहिंग्लज हे तालुके केरोसिनमुक्त केले असले तरी उर्वरित सात तालुक्यांमध्ये 2 लाख 4 हजार लिटर्स रॉकेलचे वितरण सुरु आहे. यामध्ये कागलमध्ये 36 हजार लिटर्स, आजरा 12 हजार, चंदगड 48 हजार, भुदरगड 48 हजार, राधानगरी 12 हजार, गगनबावडा 12 हजार तर शाहूवाडी तालुक्यात 36 हजार असे एकूण 2 लाख 4 हजार लिटर्स रॉकेलचे वितरण केले जात आहे. पण ज्या पाच तालुक्यांमध्ये रॉकेलचे वितरण पूर्णपणे बंद केले आहे, तेथे अद्याप 15 ते 20 टक्के रेशनकार्डधारकांकडे घरगुती गॅस नाही आणि रॉकेलही नाही अशी स्थिती झाली आहे.

रेशन दुकानदारांच्यामार्फत घरोघरी जाऊन सर्व्हे होणे आवश्यकजिह्यात विशेषतः रॉकेल वितरण बंद केलेल्या पाच तालुक्यांमध्ये रेशन दुकानदारांमार्फत घरोघरी जाऊन रॉकेलसह घरगुती गॅस नसलेल्या कुटुंबांची माहिती घेतल्यास नेमकी वस्तुस्थिती समोर येईल. हा सर्व्हे करताना संबंधित गॅस एजन्सीने त्या गावातील अथवा वॉर्डातील गॅस असलेल्या ग्राहकांची यादी रेशन दुकानदारांना दिल्यास त्यांना सर्व्हे करणे अधिक सोईस्कर ठरेल. त्यामुळे इंधनापासून वंचित असलेल्या रेशनकार्डधारकांना न्याय मिळेल.

दिवाबत्तीसाठी सर्व शिधापत्रिकाधारकांना 2 लिटर रॉकेल द्यावे
जिह्यात 12 लाख 2 हजार 253 गॅस जोडण्या असल्या तरी दिवाबत्तीसाठी म्हणून शासनाने सर्व शिधापत्रिकाधारकांना प्रत्येकी 2 लिटर रॉकेल द्यावे अशी जिल्हा रेशन दुकानदार संघटनेची मागणी आहे. याबाबत राज्यव्यापी संघटनेकडून शासनाकडे पाठपुरावा सुरु आहे. तसेच सध्या जे कार्डधारक गॅस आणि रॉकेल या दोन्ही इंधनापासून वंचित आहेत,त्यांना गॅस जोडणी मिळेपर्यंत रॉकेल देणे आवश्यक आहे.
रविंद्र मोरे – अध्यक्ष, जिल्हा रेशन दुकानदार संघटना

इंधनापासून वंचित असलेल्या शिधापत्रिकाधारकांना न्याय देऊ
जिह्याच्या शहरी अथवा ग्रामीण भागातील बहुतांशी सर्वच घरांमध्ये घरगुती गॅसचा वापर होत आहे. त्यामुळेच प्रशासनाकडून केरोसिनमुक्त जिल्हा करण्याचा प्रयत्न सुरु आहे. तरीही जे कार्डधारक गॅस आणि रॉकेल या दोन्ही इंधनापासून वंचित आहेत, त्यांना गॅस मिळेपर्यंत रॉकेलचे वितरण केले जाईल. पण याबाबतची माहिती प्रशासनाकडे प्राप्त होणे आवश्यक आहे.
दत्तात्रय कावितके – जिल्हा पुरवठा अधिकारी, कोल्हापूर

Related Stories

काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

Abhijeet Shinde

काळम्मावाडी धरण परिसरात पावसाचा जोर कायम, १२९५० क्युसेक विसर्ग सुरु

Abhijeet Shinde

महाराष्ट्र सरकारने एसटी बस प्रवासा संदर्भात घेतला ‘हा’ निर्णय

Rohan_P

किमान दोन- चार मोठे उद्योग सातायात आणा- आ. शिवेंद्रसिंहराजे

Patil_p

कोल्हापूर : धारवाडच्या कर्नाटक युनिव्हर्सिटीमधून शिरोळमधील स्मिता माने यांची पीएचडी

Abhijeet Shinde

ऑनलाईन परीक्षेत शिवाजी विद्यापीठाचे एक पाऊल पुढे

Abhijeet Shinde
error: Content is protected !!