तरुण भारत

कोरोना योद्धय़ांना हवे जनतेचे पाठबळ

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून गोव्यातील पोलीसयंत्रणा व आरोग्य कर्मचारी कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. अशा कठीण प्रसंगी त्यांना नैतिक आधार व भक्कम पाठबळ हवे आहे. पोलीस खात्याकडून ते मिळत आहेच, पण गरज आहे ती जनतेच्या पाठिंब्याची.

गोव्यात कोरोनाबाधितांचा आकडा झपाटय़ाने वाढत आहे. बहुतेक तालुक्यांमध्ये या महामारीने शिरकाव केल्याने जनतेमध्ये भीती व सरकारची चिंता वाढली आहे. ताज्या आकडेवारीनुसार राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दोन हजारापर्यंत पोहोचली असून दिवसाकाठी 50 ते 90 याप्रमाणे पॉझिटिव्ह केसेसची त्यात भर पडत आहे.  कोरोनाच्या विषाणूने आत्तापर्यंत आठ जणांचे बळी घेतले आहेत. त्यात माजी आरोग्य मंत्री डॉ. सुरेश आमोणकर, वास्को पालिकेचे नगरसेवक पास्कॉल डिसोजा यांचा समावेश आहे. चिंतेची बाब म्हणजे आघाडीवर लढणारे आरोग्य कर्मचारी, पोलीस व त्यांच्या कुटुंबीयांना कोरोनाने विळखा घातला आहे.

जूनच्या पहिल्या आठवडय़ात वास्कोतील मांगोरहिल भागात कोरोनाबाधितांची संख्या अचानक वाढली. सुरुवातीला या भागात सेवा देणारे आरोग्य कर्मचारी व नंतर पहारा देणाऱया पोलिसांना संसर्गाने घेरले. कोरोनाचा हा प्रसार सत्तरी, डिचोली, धारबांदोडा या बहुतांशी ग्रामीण भाग असलेल्या तालुक्यांमध्ये होत गेला. फोंडा पोलीस स्थानकात तब्बल 26 पोलिसांना संसर्गाची बाधा झाली. निरीक्षक, उपनिरीक्षक व पोलीस शिपायांसह गृहरक्षक व त्यांच्या कुटुंबीयांना संसर्ग जडला. वरील तालुक्यांमध्ये जे रुग्ण आढळून आले आहेत, त्यापैकी बहुतेक कोरोनाशी आघाडीवर लढणारे आरोग्य कर्मचारी व पोलीस आहेत. या लोकांमुळे गावात किंवा आपल्या वाडय़ावर कोरोनाचा प्रसार झाला, ही संशयाची भावना काही ठिकाणी मूळ धरू लागली आहे, जी मुळातच चुकीची आहे. या लढवय्यांचे मानसिक खच्चीकरण करणारी आहे. एका अदृष्य शत्रूशी लढताना त्यांना हे संकट ओढवून घ्यावे लागले आहे. त्यामुळे अतिरेक्यांशी लढणाऱया देशातील सैनिकांना जनतेकडून जो आदर, सन्मान मिळतो तोच त्यांनाही मिळायला पाहिजे. कोरोनावर मात करून बरा झाल्यानंतर पुन्हा कामावर रुजू झालेल्या कोलवा पोलीसस्थानकाच्या शिपायावर त्याच्या सहकाऱयांनी ज्या पद्धतीने पुष्पवृष्टी करून स्वागत केले, तसा आदर समाजाकडूनही त्यांना अपेक्षित आहे.

मागील चार महिने लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यातील पोलीसयंत्रणा व आरोग्य कर्मचारी कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. आता त्यांच्यावरच कोरोनाने आक्रमण करून कुटुंबीयांना वेढल्याने त्यांचे मनोधैर्य खचले आहे. आपल्या सहकाऱयांवर ओढवलेल्या या बिकट प्रसंगामुळे यंत्रणेतील इतर कर्मचाऱयांवरही त्याचा विपरीत परिणाम होताना दिसतो. अशा कठीण प्रसंगी त्यांना नैतिक आधार व भक्कम पाठबळ हवे आहे. पोलीस खात्याकडून ते मिळत आहेच, पण गरज आहे ती जनतेच्या पाठिंब्याची.

कोरोना हा बेसावध क्षणी गाठणारा महारोग असल्याने प्रत्येक पावलावर काळजी व दक्षता घेणे हाच त्यावर उपाय आहे. राज्यातील आरोग्ययंत्रणा त्यासाठी सज्ज आहे. आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी रुग्णसंख्या वाढल्यास ‘प्लॅन बी’ म्हणजेच उत्तर गोव्यात आणखी एक कोविड इस्पितळ उभारण्याची सरकारची तयारी असल्याचे जाहीर केले आहे. या महामारीवर कायमस्वरुपी औषध येईपर्यंत पर्यायी उपचार पद्धतीच्या माध्यमातूनच हा लढा लढावा लागणार आहे. अत्यवस्थ रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी ‘केरळ पॅटर्न’चा अवलंब करतानाच नेझल सॉप्स यंत्रणा कार्यान्वित करण्याची तयारीही ठेवली आहे. प्लाझ्मा बँक उभारण्यासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात तयारी सुरू आहे. हे सर्व खरे असले तरी एखाद्या रोगावर मात करण्यासाठी वैद्यकीय प्रयत्नांना रुग्णांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळणे तेवढेच महत्त्वाचे असते. कोरोना ही तर सामाजिक महामारी आहे. त्यामुळे जनसमूहातून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याशिवाय तिचा प्रतिकार करणे शक्य नाही. अशा संकटाशी लढताना शारीरिक क्षमतेबरोबरच मानसिक बळही तेवढेच प्रबळ हवे. मनाने खचलेली एखादी व्यक्ती किंवा यंत्रणा कुठल्याच संकटाला धैर्याने सामोरी जाऊ शकत नाही. हे तत्त्व लक्षात घेऊन राज्यातील आरोग्य कर्मचारी व पोलीस यंत्रणेचे मनोबल वाढविण्यासाठी जनतेने सकारात्मकपणे साथ द्यावी लागेल. राज्यातील बिगर सरकारी संस्था, सामाजिक कार्यकर्त्यांनीही त्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. कारण ही लढाई एका व्यक्तीची नसून संपूर्ण समाजाची आहे.

 आजपर्यंत ग्रामीण भागातील जनतेने गावात रुग्ण सापडल्यानंतर उत्स्फूर्तपणे लॉकडाऊन पाळून जो शहाणपणा दाखवला तसाच निर्णय सरकारने यापूर्वी घ्यायला हवा होता. राज्यात सरकारने पर्यटनाचे दरवाजे खुले केले आहेत. मंदिरेही खुली करण्याचा निर्णय देवस्थान समित्यांनी घेतलेला आहे. सध्या समाजात कोरोनाच्या प्रसारापेक्षा सामाजिक माध्यमातून अफवाच मोठय़ा प्रमाणात पसरत आहेत. हा नकारात्मक प्रचार कोरोनाच्या वाढत्या प्रसारापेक्षाही अधिक घातक आहे.

 गोदावरीच्या पुरात घरासह संपूर्ण संसार वाहून गेलेल्या कुसुमाग्रजांच्या ‘कणा’ या कवितेतील त्या नायकाप्रमाणेच राज्यातील कोरोना योद्धय़े जनतेकडून अपेक्षा बाळगून आहेत. ‘मोडून पडला संसार… तरी मोडला नाही कणा…! पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा…! ताठ कण्याने लढण्यासाठी प्रत्येक नागरिकांकडून त्यांना हा धीर व पाठबळ मिळाल्यास कोरोनाच्या या संकटावर ते आणि आपण निश्चितच मात करू शकू.

सदानंद सतरकर

Related Stories

रूग्णवाढ मंदावली,काळजी आवश्यकच

Patil_p

तणावमुक्तीसाठी…

Patil_p

पैशुन्यं साहसं द्रोहम्…..(सुवचने)

Patil_p

जगावर परिणाम!

Patil_p

अन्योक्ति…..(सुवचने)`

Patil_p

चुके काळजाचा ठोका

Patil_p
error: Content is protected !!