तरुण भारत

अक्षरशः ढगफुटी, तीन तालुक्यांत पूर

जिल्हय़ाच्या राजधानीसह परिसरात दाणादाण : वस्त्यांमध्ये शिरले पुराचे पाणी

  • नागरी वसाहती, बाजारपेठा शासकीय कार्यालयांमध्ये पाणी
  • पुरात अडकलेल्या अनेकांना सुखरुपपणे काढले बाहेर
  • मंदिरे, रस्ते, शेती, दुकाने घरे गेली पाण्याखाली
  • महामार्गाच्या कामामुळे पुराचा फटका अधिक तीव्र

प्रतिनिधी / सिंधुदुर्ग:

Advertisements

 सिंधुदुर्गची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱया ओरोस व सिंधुदुर्गनगरी परिसरात झालेल्या ढगफुटी सदृश पावसाने ओरोससह सिंधुदुर्गनगरीतील रहिवासी व व्यापाऱयांची अक्षरश: दाणादाण उडवली. पोलीस मुख्यालय, आरटीओ, पर्यटन महामंडळ, गोविंद शॉपिंग मार्केट इत्यादी कार्यालये व मार्केट परिसर अचानकपणे आलेल्या पुराच्या पाण्यात वेढला गेला. मालवण, कणकवली तालुक्यांसह उर्वरित कुडाळ तालुक्यातही हा पाऊस अक्षरश: धो-धो कोसळला.

ओरोसला पुराचे पाणी अचानक नागरी वसाहतीत घुसल्याने आपत्ती निवारण पथकाला पाचारण करून अनेक रहिवाशांना सुखरुपपणे बाहेर काढावे लागले. सुकळवाड परिसरात मंदिरे पाण्याखाली गेली, तर कसाल बाजारपेठेला अक्षरश: नाल्याचे स्वरुप प्राप्त झाले.

भारतीय हवामान खात्याने पुढील दोन दिवसात किनारपट्टी भागात वादळी वारे व तुफानी पावसाची शक्यता वर्तवली असून मच्छीमारांना सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे. तर तिलारीच्या पट्टय़ात मोठय़ा प्रमाणावर पाऊस सुरू असल्याने धरणातील पाण्याची पातळी धोक्याच्या पातळीच्या दिशेने सरकत असल्याने पुढील धोका ओळखून कोणत्याही क्षणी धरणातील पाण्याचा विसर्ग करावा लागण्याची शक्यता आहे. नदी व कालव्यांकाठच्या नागरिकांनी देखील सावधगिरी बाळगावी, अशा सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

ओरोसला जणू आभाळ फाटले

जिल्हय़ाची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱया सिंधुदुर्गनगरी-ओरोस व दशक्रोशीतील कसाल, रानबांबुळी, सुकळवाड, कुंदे, वर्दे इत्यादी गावांमध्ये मध्यरात्रीपासून आभाळ फाटल्यागत तुफानी पावसाने जोर धरला. अचानक सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पाण्याचे लोटच्या लोट नागरी वसाहतीत घुसले. अगोदरच महामार्गाच्या कामामुळे मोठय़ा संख्येने असलेल्या छोटय़ा-मोठय़ा मोऱया कायमस्वरुपी बंद झाल्यामुळे लगतच्या डोंगरमाथ्यावरून उताराच्या दिशेने आलेले पाणी नागरी वसाहतीमध्ये घुसले. त्यामुळे हाहाकार उडाला. अचानक घुसलेल्या या पुराच्या पाण्यामुळे महामार्गालगतच्या वसाहती, विहिरी, दुकाने, व्यापारी संकुले, शासकीय कार्यालये व भातशेती पाण्याखाली गेली. वसाहतींमध्ये जाणारे छोटे रस्ते वाहून गेल्याने वसाहतीतील रहिवाशांना बाहेर काढण्यासाठी आपत्ती निवारण पथकाला पाचारण करावे लागले. अनेक रहिवाशांना यावेळी आपत्ती निवारण पथक तसेच संतोष वालावलकर मित्रमंडळाचे कार्यकर्ते, आपत्ती निवारण तज्ञ प्रवीण सुलोकार व स्थानिक नागरिक यांनी सुखरुप बाहेर काढले.

ओरोस जाधववाडी, ख्रिश्चनवाडी, जैतापकर कॉलनी, रवळनाथ नगर, सावंतवाडा, आनंदनगर व मुख्यालयाच्या आतील काही परिसरात पुराचे पाणी घुसल्याने या परिसरातील अनेक घरांना याचा फटका बसला. ओरोस येथील दीपा ताटे, महेश परब, पात्रीस फर्नांडिस, रोमिओ फर्नांडिस, शेखर सावंत, प्रमोद जाधव, सदा ओरोसकर, गुरु चव्हाण, नितीन मुळये, प्रसाद मालवणकर आदींच्या घरात पाणी घुसले.

कसाल, सुकळवाड, पडवे गावांनाही फटका

ओरोसप्रमाणेच लगतच्या कसाल, कुंदे, वर्दे, सुकळवाड, पडवे व रानबांबुळी या गावांनाही पुराच्या पाण्याचा जबरदस्त फटका बसला. डोंगर माथ्यावरून आलेले पाणी कसाल बाजारपेठेत घुसून बाजारपेठेला अक्षरश: नाल्याचे स्वरुप प्राप्त झाले व काही काळ वाहतूक थांबवावी लागली. कसाल कोलतेवाडी परिसरातही काही घरांमध्ये पाणी घुसल्यामुळे अनेक रहिवाशांना सुखरुपपणे बाहेर काढावे लागले. सुकळवाड बाजारपेठेलगत असलेल्या ब्राह्मण मंदीर व लगतच्या मंगल कार्यालयातही पुराचे पाणी घुसले. तसेच याच परिसरात राहणारे सुनिल पालकर यांच्या पिठाच्या गिरणीमध्ये, बागकर यांच्या घरामध्येही पुराचे पाणी घुसले. पडवे गावातील शिर्केवाडीतही पाणी घुसून याचा सुर्यवंशी, कदम, ठोमरे, जामसंडेकर इत्यादींच्या घरांना त्याचा फटका बसला.

Related Stories

बीएसएनलचे 111 कर्मचारी एकाचवेळी स्वेच्छानिवृत्त

NIKHIL_N

प्रत्येक कुटुंबाला मास्क, सॅनिटायझर

NIKHIL_N

राजापूर-शीळ मार्गावर अर्ध्या रस्त्यात संरक्षक भिंत

Patil_p

रत्नागिरी : तुतारी एक्स्प्रेस मडगावपर्यंत नेण्यास कोकण रेल्वे समन्वय समितीचा विरोध

Abhijeet Shinde

चाकरमान्यांच्या आगमनाने गर्दी वाढतीच

NIKHIL_N

देवगडातील कोरोना नियंत्रणात पालकमंत्री अपयशी!

NIKHIL_N
error: Content is protected !!