तरुण भारत

एमएमआर लसः नवा दिलासा ?

कोरोनाच्या संसर्गापासून दूर राहण्यासाठी एक नवा आशेचा किरण शास्त्रज्ञांना गवसला आहे. एमएमआर लस ज्यांना टोचली आहे, त्यांच्यात कोरोना विषाणूचा संसर्ग कमी असल्याचे आढळले असून, प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ही लस उपयुक्त ठरू शकते असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

या वास्तवाला पुष्टी देणारा आणखी एक पुरावा म्हणजे, लहान मुलांना कोविड-19 ची लागण झाल्यास त्यांच्यातील मृत्युदर कमी दिसून येतो. वयस्क व्यक्तींचा ज्या प्रमाणात मृत्यू कोविड-19 मुळे जगभरात झाला, तेवढा लहान मुलांचा झाला नाही. अनेक मुले कोरोनाला पराभूत करून घरी परतली. याचेही कारण लहान मुलांना दिली जाणारी एमएमआरची लस हेच आहे, असा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे. डेंगी, स्वाइन फ्लू आदी आजारांना लहान मुले मोठय़ा संख्येने बळी पडली; मात्र कोरोनामुळे मुलांचा मृत्यू होण्याचे प्रमाण कमी राहिले.

एमएमआर लस ही गोवर, गालगुंड आणि कांजिण्या या आजारांसाठी दिली जाते. विषाणूचा संसर्ग झाल्यामुळे होणारा संक्रमणाचा आवेग (सेप्टिक इन्फ्लेमेशन) या लशीमुळे रोखले जाते, असे संशोधकांना आढळून आले आहे. सर्वसाधारण रोगप्रतिकारशक्ती असलेल्या व्यक्तीला एमएमआर लस टोचल्यास कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत आणि कोविड-19 चा सर्वाधिक धोका असणार्यांसाठी, विशेषतः आरोग्य कर्मचार्यांसाठी ही लस उपयुक्त ठरू शकते, असे संशोधकांचे म्हणणे आहे.

  • ‘अमेरिकन सोसायटी ऑफ मायक्रोबायोलॉजी’तर्फे प्रकाशित होणार्या ‘एम-बायो’ या नियतकालिकात यासंदर्भातील वृत्तांत प्रकाशित झाला आहे. एमएमआर लशीची चाचणी आत्यंतिक धोका असणार्या लोकसंख्येवर घेतल्यास, कमीत कमी धोका आणि जीव वाचविण्याच्या दृष्टीने अधिकाधिक फायदा मिळू शकेल, असे लुइझियाना युनिव्हर्सिटी हेल्थ स्कूलचे असोसिएट डीन फॉर रिसर्च डॉ. पॉल फिडेल यांनी म्हटले आहे.
  • गोवर, गालगुंड आणि कांजिण्या या आजारांवर बहुगुणी ठरलेली ही लस टोचून घेतल्यास कोणताही अपाय होण्याची शक्यता नाही; शिवाय या तीन आजारांव्यतिरिक्त कोविड-19 च्या विषाणूंशी लढण्याची अतिरिक्त ताकद मिळू शकते, असे त्यांचे म्हणणे आहे. आतापर्यंत हाती असलेले पुरावे असे दर्शवितात की, क्षीणीकृत लस एखादा विशिष्ट विषाणूच नव्हे तर ज्यासाठी लस तयार केली आहे, तो वगळता कोणत्याही धोकादायक विषाणूशी लढण्यासाठी उपयुक्त ठरते. कारण ती रोगप्रतिकारक पेशींना बळकट करून विषाणूंशी लढण्यासाठी तयार करते आणि संबंधित व्यक्तीला तशाच प्रकारच्या अनेक संसर्गांपासून वाचवू शकते. क्षीणीकृत केलेले जिवंत विषाणू शरीरात सोडणार्या कोणत्याही लशीचा उद्देश जिवंत विषाणूंशी लढण्याची ताकद पेशींमध्ये निर्माण करणे हा असतो. अशा प्रकारच्या लशींमुळे ‘प्रशिक्षित सैनिक पेशी’ तयार होतात आणि या पांढर्या पेशी अस्थिमज्जेत (बोन मॅरो) पूर्वचिन्हित झाल्या असता, घातक प्रकारच्या विषाणूंशी लढण्याची अधिक क्षमता प्रदान करतात.
  • न्यू ऑर्लिन्स येथील टय़ूलेन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनमधील प्राध्यापक डॉ. मायरी नॉव्हेर यांच्या प्रयोगशाळेत डॉ. फिडेल यांच्या सहकार्याने झालेल्या संशोधनात जिवंत विषाणूंची एमएमआर लस दिल्यास घातक आजारांशी लढण्याची शक्ती श्वेतपेशींमध्ये येते, हे स्पष्ट झाले.
  • फुफ्फुसाचा वाढता संसर्ग हे कोविड-19 मुळे होणार्या मृत्यूंचे प्रमुख कारण ठरले आहे. परंतु हा संसर्ग वाढण्यापूर्वीच विषाणूचा प्रतिकार झाल्यास कोरोनामुळे मृत्यू होत नाही, याचे एक उदाहरण अमेरिकेत नुकतेच पुढे आले आहे. यूएसएस-रूझवेल्ट या जहाजावरील 955 खलाशांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती; मात्र त्यातील फक्त एकाच खलाश्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. उर्वरित खलाश्यांना सौम्य लक्षणे जाणवली; मात्र रुग्णालयात न जाताच ते बरेही झाले. नौदलात भर्ती होत असतानाच सर्व खलाश्यांना एमएमआर लस दिली जाते. त्यामुळेच या खलाश्यांमध्ये कोविड-19 विरुद्ध लढण्याची रोगप्रतिकार शक्ती विकसित झाली असावी, असे मानले जाते. त्यांच्या पांढर्या पेशींमध्ये एमएमआरव्यतिरिक्त अन्य विषाणूंचाही निकराने प्रतिकार करण्याची ताकद निर्माण झाल्यामुळेच कोरोनाचा त्यांच्यावर परिणाम झाला नाही, असे मानण्यात येते.
  • या सर्वांमुळे एमएमआर लस कोविड-19 चा प्रतिकार करू शकते का, याची वैद्यकीय चाचणी करावी, अशी सूचना संशोधकांनी केली असून, प्रतिकारशक्ती वाढविण्यास ही लस उपयुक्त असल्याचे मान्य झाल्यास अनेकांचा प्राण वाचविणे शक्य आहे. अनेकांच्या शरीरात सौम्य लक्षणे दिसताच एमएमआर लशीमुळे मिळालेली प्रतिकारशक्ती काम करू लागेल आणि कोविड-19 च्या विषाणूंचा शरीरात होत असलेला प्रसार वेळीच आटोक्यात येईल.

– प्रा. विजया पंडित

Related Stories

भारतात कोरोनावर लस तयार, मानवी चाचणीला होणार सुरुवात

datta jadhav

नागीन आणि अ‍ॅलोपॅथी

Omkar B

ऑक्सीमीटर आणि आपण

Omkar B

हैपीटीएट्सचे औषद कोरोनावर प्रभावी

Amit Kulkarni

पित्तशूल आणि ऍलोपॅथी

Omkar B

शून्य मुद्रा

Omkar B
error: Content is protected !!