तरुण भारत

वन महोत्सवाला देऊ नवी दिशा

सध्या नैर्त्रुत्य मॉन्सून सक्रिय झाल्या कारणाने पर्जन्यवृष्टी सुरू आहे. ज्येष्ठातला पाऊस सुरू झाला की आपल्याकडच्या लोकमानसाला वटपौर्णिमेच्या सणाची आठवण प्रकर्षाने होते. एकेकाळी सुवासिनी स्त्रिया वटपौर्णिमेचे व्रत आपल्या पतीला वडासारखे प्रदीर्घ आयुष्य लाभावे म्हणून करायच्या. आज वड आपल्या परिसरात सापडणे दुरापास्त झाल्याने बऱयाच ठिकाणी वडाच्या फांद्या तोडून घरातल्या चार भिंतीआड पूजा केली जात आहे. आपल्या धर्मग्रंथात वड हे भगवान शिवाचे प्रतीक मानलेले असून, वटवृक्ष तोडल्यास शिवाला अपाय केल्याचे मानले जाते. चैत्रात फुलणाऱया पळस वृक्षाने मानवी समुदायाला भारतात भगव्या रंगाची गुढी उभारण्याची प्रेरणा दिलेली असावी. वैशाख पौर्णिमेला शाक्यमुनी गौतम बुद्धांना आर्य सत्यांची प्राप्ती पिंपळ वृक्षाखाली ध्यानावस्थेत झाल्याने बौद्धधर्मियांत पिंपळ ज्ञानवृक्ष ठरलेला आहे. भगव्या फुलांनी अलंकृत होणारा अशोक केवळ हिंदूंनाच नव्हे तर बौद्ध आणि जैन धर्मियातही पवित्र वृक्ष मानलेला आहे.

मंदिर परिसरात चाफा, बकुळ, वड, पिंपळ आदी वृक्षांना पवित्र मानलेले असून, त्यांचे वृक्षारोपण आणि संगोपनाला प्राधान्य दिलेले आहे. चैत्रात विविध वृक्ष, वनस्पती पुष्पोत्सवात सहभागी होत असल्याने त्याला वसंतोत्सव म्हणून साजरा करण्याची परंपरा निर्माण झालेली आहे. भारतीय संस्कृतीने वृक्षारोपणाला धर्मजीवनात स्थान प्रदान केलेले असून विविध वृक्षांची सांगड देवदेवतांशी घातलेली आहे. आपल्या लोकधर्मात वृक्षांना असलेल्या अनन्यसाधारण महत्त्वाला अधोरेखित करून भारत सरकारात कन्हैय्यालाल मुन्शी अन्न आणि कृषिमंत्री असताना 1 ते 7 जुलै या आठवडय़ात वनमहोत्सव साजरा करण्यास प्रारंभ केला. आज दरवर्षी भारतभर मॉन्सूनच्या पावसात कोटय़वधी वृक्षांच्या रोपांची लागवड केली जाते. परंतु, त्यातील काही मोजकीच रोपे तग धरत असल्याने हरित वृक्षाच्छादनाचे प्रमाण वृद्धिंगत होण्यास अडचणी उभ्या राहतात. आज रस्ते, महामार्ग, रेलमार्ग आणि विविध विकास प्रकल्पांसाठी वनक्षेत्राला जेव्हा तिलांजली देण्याची परिस्थिती येते तेव्हा सक्तीच्या वृक्षारोपणासाठी संबंधित खात्यांना निधी सुपूर्द करणे बंधनकारक असते. परंतु वृक्षारोपणासंबंधी बऱयाचदा वनखात्याकडे नियोजनबद्ध आराखडा नसल्याकारणाने हा उपलब्ध निधी भलत्याच कामासाठी किंवा विनावापर पडून असल्याचे स्पष्ट झालेले आहे. गेल्या काही वर्षांपासून वनमहोत्सवाच्या सप्ताहभरात मोठय़ा प्रमाणात वृक्षारोपणाच्या घोषणा केल्या जातात आणि मंत्री, नेतेमंडळींच्या हस्ते दिखाऊ पद्धतीने वनमहोत्सव साजरा केला जातो. वनमहोत्सवाचे असे कार्यक्रम आटोपल्यावर पुढे लावलेल्या रोपांचे काय झाले, त्यांचे संगोपन होत आहे की नाही याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे असे बरेच कार्यक्रम दिखाऊ पद्धतीने साजरे केले जातात आणि वृक्षांची आबाळ केली जाते.

Advertisements

आज जेव्हा एखाद्या प्रकल्पासाठी अपरिमित अशी जंगलतोड करण्यास केंद्रीय वन, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयामार्फत ना हरकत दाखले दिले जातात तेव्हा नियोजनबद्ध वृक्षारोपण आणि संगोपनाचे अपवादात्मक प्रयत्न केले जातात. त्यामुळेच महामार्ग, रेल्वेमार्गासाठी जंगलतोड करण्याच्या प्रस्तावांना विरोध केला जात असतो. खरंतर एखाद्या प्रकल्पास जंगल तोडण्याचा प्रस्ताव सादर केला जातो तेव्हा त्या परिसरातील तीनपटीने खाजगी मालकीचे वनक्षेत्र खरेदी करून आरक्षित करण्यास प्राधान्य दिले तर ती एक चांगली सुरुवात पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने होऊ शकते. वनमहोत्सव साजरा करताना सरकारी आणि बिन सरकारी यंत्रणांनी नियोजनबद्ध पूर्वतयारी करून हवामान, भौगोलिक परिस्थिती, मातीचा कस ओळखून वृक्षारोपण केले तर ते लाभदायक ठरू शकते. आज गवेरेडे, माकडे, वानरे, हरणे यासारखी जंगली श्वापदे लोकवस्ती, शेती, बागायती क्षेत्रांकडे वळलेली आहेत, त्याला त्यांचा ओसाड होत चाललेला नैसर्गिक अधिवास तसेच खाद्यान्नासाठी सुरू असलेला संघर्ष कारणीभूत ठरलेला आहे.

त्यामुळे वनमहोत्सवाचे आयोजन करताना आपल्याकडून ज्या वृक्षवनस्पतींचे संगोपन करणे शक्य आहे, त्यांच्या लागवडीला प्राधान्य दिले पाहिजे. महामार्गाच्या दुतर्फा भविष्यात होणारे विस्तार ओळखून ताम्हण, करंज, कडुनिंब, खैर अशा वृक्षांबरोबर प्रत्येक पाच कि.मी.वर वनौषधी उद्यान, मोसमी फळेफुले देणाऱया वनस्पतींच्या बागा, पवित्र वनांची निर्मिती करणे गरजेचे आहे. महामार्ग, रेल्वेमार्ग, हवाईमार्ग जेथे आहेत त्या परिसरात वड, पिंपळ, चिंच, बेहडा, आवळा, आईन, जांभूळ, आंबा, फणससारख्या वृक्षांची लागवड केली तर अशा वृक्षांवर पशुपक्षी आपले अधिवास प्रस्थापित करू शकतील. एखादी व्यक्ती जन्माला आली अथवा मृत्यूमुखी पडली तर त्यांच्या स्मरणार्थ स्मृतीवनाची निर्मिती करण्याची प्रथा रूढ करण्याची गरज आहे.

आपल्याकडे कारखाने सुरू करण्यासाठी जेव्हा जमीन दिली जाते तेव्हा जंगलतोडीबद्दल निधी देण्याबरोबर आपले संकुल स्वदेशी वृक्षवेलींनी कसे हरित होईल, कर्ब उत्सर्जनाच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवणाऱया वड, पिंपळ, औदुंबर, चिंच, जांभूळ, आवळा, कडुनिंबासारख्या वृक्षांची लागवड आणि संगोपन होईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. वनमहोत्सवाचा कार्यक्रम दरवर्षी 1 ते 7 जुलैपर्यंत साजरा करणाऱयांबरोबर उपलब्ध परिस्थितीनुसार वृक्षारोपणाला महत्त्व देण्याची गरज आहे. राजस्थानातील वैष्णोई समाजाने आपणाला पर्यावरण आणि निसर्ग संवर्धन आणि संरक्षण करण्याचा जो वारसा दिलेला आहे तो आजच्या परिस्थितीतही समृद्ध आणि संपन्न ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न केले पाहिजे. गोजिऱया वृक्षाच्या रोपाने आमचे जीवन साजिरे सुंदर करण्यासाठी आमच्या नियोजनबद्ध प्रयत्नांची आवश्यकता आहे.

Related Stories

आपुलाचि वाद आपणासी

tarunbharat

बदलत्या राजकारणाचे संकेत

Patil_p

भूकेचे मूळ

Patil_p

केंद्र-राज्य संबंधात तणाव

Patil_p

आत्मनिर्भर अर्थसंकल्प

Patil_p

ऋषितुल्य तपस्वी मा. गो. उपाख्य बाबुराव वैद्य

Omkar B
error: Content is protected !!