तरुण भारत

रविवारी कोरोनाचे दोन बळी

काणकोणातील पहिला तर : वास्कोतील आठवा : एकूण बळींची संख्या 14

प्रतिनिधी / मडगाव

Advertisements

सद्या गोव्यात कोरोनाने कहर माजविला आहे. काल रविवारी मडगावच्या कोविड हॉस्पिटलात उपचार घेणाऱया दोघा रूग्णांचा बळी गेला. पाळोळे-काणकोण येथील सांतान डायस (49) तर चिखली-वास्को येथील श्रीमती सुशिलाबाई चिपळूणकर (80) यांनी काल कोविड हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे काणकोण तालुक्यात कोरोनाच्या पहिल्या तर वास्कोत आठव्या बळीची नोंद झाली. गोव्यात कोरोनामुळे बळी गेलेल्याची संख्या रविवारी 14 वर पोचली आहे.

पाळोळे-काणकोण येथील सांतान डायस याला कॅन्सर झाला होता व त्याच्यावर मणिपाल हॉस्पिटलात उपचार सुरू होते. त्याच ठिकाणी त्याच्यावर एक शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती. गेल्या दोन आठवडय़ापूर्वी न्यूमोनिया झाला होता. त्यावेळी त्याची कोरोना चाचणी घेतली असता, तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले होते. नंतर त्याला कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नव्हती. त्याचा जीवन-मृत्यूशी संघर्ष सुरू होता. त्यात काल रविवारी सकाळी 7.30च्या दरम्यान त्याने अखेरचा श्वास घेतला. त्याच्या मृत्यूने काणकोण तालुक्यात कोविडच्या पहिल्या बळीची नोंद झाली आहे.

चिखली-वास्को येथील श्रीमती सुशिलाबाई चिपळूणकर हिचा दुपारी 2.30च्या दरम्यान कोरोनामुळे बळी गेला. चिखलीत कोरोनाचा फैलाव झाला होता. त्यावेळी  चिपळूणकर कुटुंबातील काही सदस्यांना संसर्ग झाला होता. त्यात सुशिलाबाईचा समावेश होता. कुटुंबातील इतर सदस्य कोरोनाच्या संसर्गातून बरे झाले व आपल्या घरी पोचले आहेत. मात्र वयस्क सुशिलाबाईला कोविड हॉस्पिटलात दाखल करण्यात आले होते. तिच्या प्रकृतीत सुधारणा झालीच नाही. शेवटी काल तिने अखेरचा श्वास घेतला. चिपळूणकर हे कुटुंब महाराष्ट्रातील असून चिखली येथे स्थायिक झालेले आहे.

सद्या कोविड हॉस्पिटलाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू असलेल्या बऱयाच रूग्णांची प्रकृती खालावली आहे. भाजपचे आमदार क्लाफास डायस हे सुद्धा अतिदक्षता विभागात असून त्याच्या प्रकृतीकडे डॉ. सुनंदा आमोणकर या लक्ष ठेऊन आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

शनिवार आणि रविवार असे दोन दिवस मिळून कोविड हॉस्पिटलातून 20 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. काल रविवारी दिवसभरात 10 जणांना कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

कोरोनाची दहशत वाढली : गत 48 तासात 5 बळी : रविवारी नवीन 85 रुग्णांची भर : एकूण सक्रीय रुग्णसंख्या 952

प्रतिनिधी / पणजी

राज्यात कोरोनाची दहशत प्रचंड वाढली असून 48 तासात पाच जणांना मृत्यू आला आहे. शनिवारी तीन तर रविवारी आणखी दोघांचा मृत्यू झाला. दुसऱया बाजूने कोरोना पोझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. रविवारी नव्याने 85 रुग्णांची भर पडली असून एकूण सक्रीय रुग्णसंख्या 952 झाली आहे.

राज्यात 48 तासात पाच रुग्ण दगावल्याने कोरोनाबाबतची धास्ती राज्यात वाढली आहे. वास्को परिसरात लोकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. राज्यातील मृत्यूंचा आकडा 14 वर पोहोचला आहे. मांगोरहिलमधील कोरोना बाधितांची संख्या 76 वर पोहोचली आहे. या भागाशी संबंधित बाधितांची संख्या 88 झाली आहे. बायणात 110, झुवारीनगरात 146 तर खारीवाडा भागात 52 रुग्णसंख्या झाली आहे. बायणा आणि झुवारीनगर येथे तर स्फोटक स्थिती निर्माण झाली आहे.

कुडतरी येथील रुग्णसंख्या 32 झाली आहे. चिंबल -63, बाळ्ळी -38, मडगाव -9, केपे -17, लोटली -31, इंदिरानगर चिंबल -27, नावेली -6, म्हापसा -7, सांखळी -36, कामराभाट टोंक -6, काणकोण -9, फातोर्डा -4, कुडका -4, वेर्णा -8, मोतीडोंगर -7, फोंडा -40, वाळपई -22, माशेल -5, उसगाव -5, डिचोली -8, शिरोडा -17, पेडणे -11, पिलार -4, गोवा वेल्हा -6, बेतकी -42, सांगे -4, मंडूर -9, पर्वरी -5, धारबांदोडा -20, कुंकळ्ळी -12, करमळी -5, नेरूल -23, अशा पद्धतीने रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 59 एवढी होती.

फोंडा, बेतकी, नेरूल, चिंबल या भागात रुग्णसंख्या वाढत आहे. त्याचबरोबर लोटली, कुडतरी, बाळ्ळी येथील स्थिती स्फोटक बनत चालली आहे. वास्कोत कंटेनमेंट, मीनी कंटेनमेंट झोन केल्यानंतरही स्थिती नियंत्रणात येत नाही.

रुग्णसंख्या घटविण्यासाठी आकडय़ांचे कारस्थान

बाधितांची संख्या कमी दाखविण्यासाठी सरकार कारस्थान करीत असल्याचा आरोप गोवा फॉरवर्डचे नेते व आमदार विजय सरदेसाई यांनी केला आहे. तर पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांनी 500 रुग्णांना इस्पितळातून डिस्चार्ज देण्याची तयारी चालविल्याचा आरोप केला आहे. सरकारचे अपयश उघड करून त्यांनी जोरदार टीका केली आहे.

बसस्थानके, बसेसचे होणार निर्जंतुकीकरण

कोरोनाचे वाढते बळी लक्षात घेऊन राज्यातील सर्व प्रमुख बसस्थानके, प्रवासी बसेस यांची जंतुनाशक फवारणी करण्यात येणार आहे. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी त्याची माहिती दिली. सध्या गोव्यात 178 कदंब बसेस व 20 टक्के खासगी बसगाडय़ा चालू आहेत. त्यांचे निर्जंतुकीकरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

काणकोणात कोविडचा पहिला बळी नोंद

प्रतिनिधी / काणकोण

मणिपाल इस्पितळातून कोरोनाबाधित असल्याने मडगावच्या कोविड इस्पितळात उपचारांसाठी पाठविलेल्या पाळोळे-काणकोण येथील एका रुग्णाचे 12 रोजी निधन झाले. यामुळे काणकोण तालुक्यात पहिल्या कोविड बळीची नोंद झाली आहे. या तालुक्यात आतापर्यंत 20 कोरोनाबाधित आढळले असून बहुतेक जण अन्य भागांतूनच आलेले आहेत. त्यातील 10 जणांना उपचारांनंतर घरी पाठविण्यात आले आहे. अन्य व्यक्तींचा अहवाल देखील निगेटिव्ह आलेला आहे, अशी माहिती काणकोण आरोग्य केंदाच्या सूत्रांकडून देण्यात आली.

Related Stories

मुखर्जी स्टेडियमचे लवकरच होणार इस्पितळात रुपांतर

Amit Kulkarni

जि.पं.साठी भाजपची निकराची झुंज

Patil_p

संशयितांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

Patil_p

पाब्लो एस्कोबारची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी

Amit Kulkarni

मांगोरहिलवर 202 नमुने गोळा

Omkar B

श्री दामोदर फडते यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार समारंभ 26 रोजी

Omkar B
error: Content is protected !!