तरुण भारत

चौथ्या दिवसाचा खेळ निर्णायक ठरला

पहिल्या कसोटीतील विजयानंतर विंडीज कर्णधार जेसॉन होल्डरची प्रतिक्रिया

साऊदम्प्टन / वृत्तसंस्था

Advertisements

यजमान इंग्लंडविरुद्ध खळबळजनक विजय संपादन करत मालिकेत जोरदार आघाडी घेतल्यानंतर अवघे विंडीज क्रिकेट अर्थातच भारावून गेले आहे आणि विंडीज कर्णधार जेसॉन होल्डर देखील त्याला अपवाद असण्याचे कारण नाही. ‘चौथ्या दिवशी आमच्या संघाने जो जिगरबाज खेळ साकारला, तो पूर्ण लढतीत निर्णायक ठरला. मी नेतृत्व साकारत असताना संघाने केलेला हा असामान्य खेळ ठरतो’, असे होल्डर या लढतीचे वर्णन करताना म्हणाला.

शनिवारी चौथ्या दिवसाच्या खेळात विंडीजने अवघ्या 30 धावा देत 5 फलंदाज गारद केले आणि दिवसअखेर इंग्लंडची 8 बाद 284 अशी दाणादाण उडवली होती. दिवसाच्या उत्तरार्धात विंडीज गोलंदाजांनी अधिक भेदक मारा साकारला होता. ही कसोटी विंडीजने 4 गडी राखून जिंकली.

‘चौथ्या दिवसाच्या खेळात आमच्या गोलंदाजांनी तर भेदक मारा केलाच. पण, त्या दिवशी आमच्या खेळाडूंचे क्षेत्ररक्षणही अव्वल ठरले. मला स्वतःला तो चौथा दिवस महत्त्वाचा वाटतो. ज्या-ज्या क्षणी आपण खेळ उंचावणे महत्त्वाचे आहे, असे वाटले, त्या-त्या प्रत्येक क्षणी आमच्या खेळाडूंनी अव्वल कामगिरी साकारली. तसे पाहता, बेन स्टोक्स व क्रॉली फलंदाजी करत होते, त्यावेळी आमच्या विजयाच्या अपेक्षा कमी झाल्या होत्या. पण, आम्ही हरणार नाही, याची खात्री वाटत होती. त्या क्षणी आम्ही आक्रमक खेळावर भर देण्याचा निर्णय घेतला आणि अंतिमतः आम्हीच बाजी मारण्यात यशस्वी ठरलो’, असे जेसॉन होल्डर तपशीलवार बोलताना म्हणाला.

13 वर्षांनंतर प्रथमच

विंडीजने विदेशातील एखाद्या मालिकेतील सलामीची कसोटी जिंकण्याची मागील 13 वर्षातील ही पहिलीच वेळ ठरली आणि दस्तुरखुद्द होल्डरने स्वतः आघाडीवर लढत पहिल्या डावात कारकिर्दीतील सर्वोत्तम 6 बळी घेतले.

‘इतिहास पाहिला तर आम्हाला अनेकदा अनुकूल स्थिती असताना देखील पराभव स्वीकारण्याची, अपयशाची नामुष्की स्वीकारावी लागली आहे, पचवावी लागली आहे. त्याची पुनरावृत्ती येथेही होऊ नये, हा आमचा प्रयत्न होता. तो यशस्वी ठरला. स्टोक्स, क्रॉली खेळत असताना ती जोडी फोडणे आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे होते आणि स्टोक्सला बाद करु शकल्याने मी त्यात यशस्वी ठरलो. अल्झारीने क्रॉलीला परतीचा झेल टिपत बाद केले, ते ही तितकेच महत्त्वाचे ठरले’, असे होल्डरने पुढे नमूद केले.

‘स्टोक्स व क्रॉलीला बाद केल्यानंतर विस्मयकारक विजय संपादन करु शकतो, याची आम्हाला जाणीव झाली. त्यानंतर आम्ही बटलरला बाद केले आणि डॉम बेसने काही काळ ठाण मांडले तरी त्यावर आम्ही मार्ग काढू शकलो’, याचा त्याने एका प्रश्नाला उत्तर देताना उल्लेख केला.

रुटची गैरहजेरी पथ्यावर

नियमित इंग्लिश कर्णधार जो रुट या सामन्यात खेळू शकला नाही, ती बाब आपल्या पथ्यावरच पडल्याचे होल्डरने येथे आवर्जून सांगितले. ‘रुट अव्वल दर्जाचा खेळाडू आहे आणि त्याच्याशिवाय खेळावे लागलेल्या इंग्लिश संघाला फलंदाजीत उणीव जाणवणे साहजिक होते. अर्थात, विजय हा विजय असतो. इंग्लंडला त्यांच्या भूमीत नमवणे ही सहजसाध्य बाब अजिबात नसते. येथे भक्कम पायाभरणी केली, त्याचा लाभ पुढे घेण्याचा आमचा प्रयत्न असेल’, असे तो शेवटी म्हणाला.

जेव्हा विंडीज संघाने लाराचा अंदाजही खोटा ठरवला!

साऊदम्प्टन येथील पहिली कसोटी सुरु होण्यापूर्वी ब्रायन लाराने आपल्याच विंडीज संघाच्या क्षमतेबद्दल साशंकता व्यक्त केली होती. ‘आपला संघ पाच दिवस तग धरु शकणार नाही. त्यामुळे, त्यांनी चौथ्या दिवशीच विजय संपादन करण्याकडे लक्ष केंद्रित करावे’, असे लारा म्हणाला होता. पण, प्रत्यक्ष लढतीत होल्डरच्या नेतृत्वाखालील विद्यमान विंडीज संघाने इंग्लंडविरुद्ध 5 दिवस किल्ला तर लढवलाच. शिवाय, अविस्मरणीय विजयही खेचून आणला. संघाने विजय संपादन केल्यानंतर लाराने ट्वीट करत आपल्या संघाचे अभिनंदन केले.

Related Stories

ओपेल्का उपांत्य फेरीत दाखल

Patil_p

विश्व युवा तिरंदाजी स्पर्धेत भारताचे दोन नवे विश्वविक्रम

Amit Kulkarni

भारताचे ‘मेगा स्टार’ वर्ल्डकपमध्ये ‘मेगा फ्लॉप’!

Patil_p

बायो-बबल क्रिकेटपटूंसाठी न संपणारे दुःस्वप्न – मॅक्सवेल

Patil_p

रूमानियाची हॅलेप अंतिम फेरीत

Patil_p

जीव मिल्खा सिंग दुबई गोल्डन व्हिसाने सन्मानित

Patil_p
error: Content is protected !!