तरुण भारत

बाप्पाच्या भेटीसाठी यंदा अडथळय़ांची शर्यत

कोरोनाच्या अनुषंगाने सीमाबंदी, क्वारंटाईनचीही आव्हाने आहेत. त्यामुळे ‘विघ्न’हर्त्याच्या भेटीसाठी यावर्षीही कोकणवासियांच्या नशिबी अडथळय़ाची शर्यतच दिसून येत आहे.

मुंबई, पुणेसह मोठय़ा शहरात साडेतीन महिन्यांहून अधिक काळ कोरोनामुळे अडकून पडलेल्या चाकरमान्यांना गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोकणची ओढ लागली आहे. कोकण रेल्वे बंद असल्याने त्यांच्यापुढे मुंबई-गोवा महामार्ग हा एकमेव पर्याय उपलब्ध आहे. मात्र, पहिल्याच पावसाने चौपदरीकरण होत असलेल्या या महामार्गाच्या मर्यादा उघड केली आहे. कशेडी घाटात दरड कोसळून 20 तास ठप्प झालेली वाहतूक, कणकवलीत फ्लायओव्हरच्या भिंतीला पडलेले भगदाड, गोव्याजवळ रस्ता वाहून जाण्याची घटना अशा विघ्नांची यादी वाढतच चालली आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या अनुषंगाने सीमाबंदी, क्वारंटाईनचीही आव्हाने आहेत. त्यामुळे ‘विघ्न’हर्त्याच्या भेटीसाठी यावर्षीही कोकणवासियांच्या नशिबी  अडथळय़ाची शर्यतच दिसून येत आहे.

Advertisements

‘नेमेची येतो पावसाळा’ या उक्तीप्रमाणे पाऊस सुरू झाला की महामार्ग आणि रेल्वेमार्गावरची संकटे कोकणात एकामागोमाग एक येत असतात. महामार्गावर खड्डे पडणे, पूल धोकादायक बनणे, दरडी कोसळणे हे नित्याचेच झाले आहे. गणेशोत्सवाचे पडघम वाजू लागले की मग चाकरमान्यांच्या सुखकर प्रवासासाठी राजकीय नेतेमंडळी गळे काढायला सुरुवात करतात. यावर्षी कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर याला अधिकच जोर चढेल. मात्र, महामार्गाचे रखडलेले चौपदरीकरण, कामे सोडून पळत असलेल्या कंपन्या आणि दर्जाबाबत निर्माण होत असलेले प्रश्नचिन्ह यावर पोटतिडकीने बोलताना व त्याबरहुकूम त्याचा पाठपुरावा करताना कोणीही फारसे दिसत नाही.

मार्चच्या तिसऱया आठवडय़ापासून सर्वत्र कोरोना लॉकडाऊन जाहीर झाले. साडेतीन महिन्याहून अधिक काळ लॉकडाऊन सुरू असतानाच परिस्थिती पूर्वपदावर कधी येईल हे अजूनही कुणी सांगू शकत नाही. त्यामुळे दहा-बाय दहाच्या खोलीत अडकून पडलेल्या चाकरमान्यांना गणेशोत्सावाच्या निमित्ताने का होईना गावाला जाता येईल यादृष्टीने चाकरमानी वाट पहात असतानाच महामार्गावर पावसामुळे येत असलेले अडथळे त्यांच्या निराशेत दिवसेंदिवस भर टाकताना दिसत आहेत.

गणेशोत्सव म्हटला की मुंबईतील चाकरमान्यांचे पाय कोकणाकडे वळतात. गणेशोत्सवात कोकणात येणाऱयांची संख्या मोठय़ा प्रमाणात असते. एस.टी. महामंडळाकडून शेकडो जादा बसेस सोडल्या जातात. कोकण रेल्वे मार्गावरही गणपती स्पेशल म्हणून अधिक रेल्वेगाडय़ा धावतात. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग तर चाकरमान्यांच्या वाहनांनी एवढा गजबजून जातो की गणेशोत्सवाच्या अगोदरपासूनच महामार्गावरील अवजड वाहतूक प्रशासनाला बंद ठेवावी लागेल. हजारोंच्या संख्येने चाकरमानी गणेशोत्सवात कोकणातील आपल्या गावी येतात. मात्र कोरोना लॉकडाऊनमुळे या वर्षीच्या उत्सवाचे चित्र अजूनही अस्पष्टच असले तरी चाकरमानी गावाला येणारच या दृष्टीने स्थानिक शासकीय पातळीवर त्याचे नियोजन सुरू झाले आहे.

यावर्षी कोकण रेल्वेची वाहतूक बंद असल्याने कोकणात जाण्यासाठी एकमेव सुरक्षित मार्ग म्हणजे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग. गेल्या तीन-चार वर्षापासून या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. सिंधुदुर्ग वगळता रत्नागिरी आणि रायगड जिल्हय़ात चौपदरीकरणाला म्हणावी तशी गती मिळालेली नाही. कोरोना लॉकडाऊनमध्ये तर कामेच पूर्णपणे ठप्प झाली होती. पहिल्या टप्प्यानंतर परवानगी दिल्यानंतरही अनेक कंत्राटदार कंपन्यांनी कामेच सुरू केलेली नाहीत. शिवाय झालेली कामेही ढासळत असल्याने अथवा रस्त्याला तडे जात असल्याने या कामांच्या दर्जावरही प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. महामार्ग चौपदरीकरणाची कामे मोठय़ा कंपन्यांच्या नावे असली तरी स्थानिक पातळीवर राजकीय नेत्यांनी त्यामध्ये शिरकाव केलेला असल्याने निकृष्ट कामांबाबत कुणीही फारसा चकार शब्द काढताना दिसत नाही. सिंधुदुर्गातील दोन्ही टप्प्यांतील कामे 95 टक्के पूर्ण झाली तरी रत्नागिरी जिल्हय़ात कंपन्या अर्धवट कामे सोडून पळू लागल्या आहेत. त्यामुळे महामार्गाचे रडगाणे या पावसाळय़ातही पहायला मिळू लागले आहे.

गेल्या आठवडय़ात कशेडी घाटात पोलादपूर हद्दीत धामणदेवी येथे रस्त्यावर कोसळलेली दरड बाजूला करण्यासाठी तब्बल वीस तासांचा कालावधी लागला.  मुळातच आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आपल्याकडे काय आराखडा असायला हवा याचे कोणतेही नियोजन नाही. कणकवलीत फ्लायओव्हरच्या भिंतीलाच भगदाड पडले आहे. गेल्या महिन्यात या भिंतीला तडे गेलेले लक्षात आल्यानंतर काम करणाऱया कंपनीला ही भिंतच काढून टाकण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र लॉकडाऊनमध्ये ते काम करणे शक्य न झाल्याने पावसाचे पाणी त्यामध्ये जिरून फुगलेली भिंत फुटली. कोकणातील भौगोलिक परिस्थिती आणि पर्जन्यमान याचा विचार करून कामांचा दर्जा राखण्याची गरज आहे.

कोरोना लॉकडाऊनमुळे यावर्षीच्या गणेशोत्सवाला नेहमीच्या उत्सवाचे स्वरूप येणार नाही हे सत्य आहे. त्यातच लॉकडाऊनमध्ये सिंधुदुर्गात दीड लाखाहून अधिक, तर रत्नागिरीत अडीच लाखाहून अधिक चाकरमानी गावात आलेले आहेत. त्यामुळे मुंबई, पुणेसह इतर ठिकाणाहून येणाऱयांची संख्या सध्या कमी दिसत असली तरी उत्सवाला उधाण आल्यानंतर कोकणी माणूस घरात बसून राहील असे वाटत नाही. मात्र महामार्गावर सध्या येत असलेले अडथळे व सुरू असलेला लॉकडाऊन यामुळे येणाऱयांच्या संख्येत निश्चितच घट होण्याची शक्यता असली तरीही येणाऱया चाकरमान्यांच्या सुखकर प्रवासासाठी योग्य त्या उपाययोजनांची गरज आहे.

राजेंद्र शिंदे

Related Stories

दुसऱया अहवालानंतर तरी महापुरातून मुक्ती मिळेल?

Patil_p

नव्या वर्षाचे संकल्प

Patil_p

।। अथ श्रीरामकथा ।।

Patil_p

संकटात संधी

Patil_p

जागतिक स्तरावर कोरोनामुळे लॉकडाऊन

Patil_p

पुन्हा समूह संसर्गाची चर्चा

Patil_p
error: Content is protected !!