तरुण भारत

पृथेप्रति जनार्दन

भगवान श्रीकृष्ण   सिंहासनावर विराजमान झाले, तेव्हा सर्वांग सुंदरी नववधू द्रौपदी, लाजत लाजत हळूहळू श्रीकृष्णांजवळ आली व तिने त्यांना नमस्कार केला. तसेच पांडवांनी वीर सात्यकीचा सुद्धा सत्कार करून त्याला वंदन केले. तो दुसऱया एका आसनावर बसला. इतर यादवांचाही सत्कार केल्यावर तेसुद्धा श्रीकृष्णांच्या चारी बाजूंना आसनावर बसले.

पृथेप्रति जनार्दन । येऊनि करी अभिवादन।  तिणें देखतां भ्रातृनंदन । आसनावरून ऊठिली। हार्द म्हणिजे स्नेहसुभरें । आर्द दृष्टी जळ पाझरे । पृथेनें तया सप्रेमभरें । श्रीकृष्ण आदरें आळंगिला। मग तयेनें क्षेमकुशल । पुशिलें स्वबंधुवर्ग सकळ ।  तैसाचि भावुजयांचा मेळ । कंकाकंसादि पुशिलिया। श्रीकृष्णाच्या सापत्नमाता । इरा मदिरा देवरक्षिता। रोहिणीप्रमुखा त्या समस्ता । संतानसहिता पुशिलिया। स्नुषासहित कुंतीप्रति । क्षेम पुसे स्वयें श्रीपति ।  हें ऐकोनि अश्रुपातीं । गंहिंवरें कुंती दाटली ।

यानंतर श्रीकृष्णांनी आत्या कुंतीजवळ जाऊन तिच्या चरणांना वंदन केले. तिने अत्यंत स्नेहाने त्यांना हृदयाशी धरले. त्यावेळी तिच्या डोळय़ांतून प्रेमाश्रू वाहू लागले. कुंतीने श्रीकृष्णांना बांधवांची खुशाली विचारली आणि भगवंतांनी सुद्धा त्याचे यथोचित उत्तर देऊन तिला तिच्या सुनेची व तिची स्वतःची खुशाली विचारली.

सप्रेमस्नेहाचिये भरिं । कळवळूनियां अभ्यंतरिं। कंठ दाटोनि स्फुंदन करी । बाष्प नेत्रीं पाझरती । श्रीकृष्णातें बोले वचनीं। कौरवांची कापटय़करणी।  भस्म केलें लाक्षासदनीं । कीं गरदानीं भीमवध । गान्धारांचिया दुरुक्ति दुष्टा। कीं सौबळोदिकांचिया कुचेष्टा ।  नित्य नूतन देती कष्टा। नेणों अभीष्टा तद्योगें। पदोपदीं दु:खराशि । किती सांगाव्या तुजपाशीं ।  तूं नांदसी हृदयकोशीं । सर्व जाणसी हृदयस्थ । बहुतां क्लेशांतें स्मरोन । ग्लानि पावोनि करी कथन । करुणावत्सल श्रीभगवान । तत्कारुण्य वांच्छितसे। निजभक्तांचे जितुके क्लेश। निरसावया ते अशेष ।  आपणातें दर्शवी त्यांस । तेणें क्लेशांस भंग करी । दर्शनें क्लेश निवारी सर्व । ऐसा नैसर्गिक स्वभाव । तो तूं प्रत्यक्ष वासुदेव । आमुची कींव तुजपोटीं । त्यावेळी प्रेमविव्हल झाल्याने कुंतीचा गळा दाटून आला होता, डोळय़ांतून अश्रू वाहत होते. भगवंतांनी विचारल्यावर तिला आपले पूर्वीचे पुष्कळ क्लेश आठवले. भीमसेनाला बालपणीच पाण्यात बुडवून मारण्याचा प्रयत्न कौरवांनी कसा केला आणि लाक्षागृहात पांडवांना जाळून टाकण्याचा कट कसा केला हेही तिला आठवले. करुणावत्सल भगवंताची कृपा आपल्यावर राहावी या इच्छेने कुंती भगवंताला म्हणाली-हे श्रीकृष्णा! आम्हाला पदोपदी भोगाव्या लागलेल्या दु:खांचा पाढा तुझ्या समोर काय वाचायचा? तू तर प्रत्येकाच्या हृदयात राहतोस. तुझ्यापासून काय लपून राहिले आहे. तुझ्या केवळ दर्शनानेच दु:खाचा नाश होतो. म्हणूनच आपल्या भक्तांचे क्लेश नष्ट करण्यासाठी तू त्यांना दर्शन देतोस. हे वासुदेवा! भक्तांचे क्लेश नाहीसे करावेत असा तुझा स्वभावच आहे. तुला आमच्याविषयी अपार करुणा आहे. हे बोलताना कुंती वारंवार भावविवश होत होती.

देवदत्त परुळेकर

Related Stories

शेतकरी आंदोलनाचे जगभर पडसाद

Patil_p

कृष्णाचि सरिसा भासतसे

Patil_p

तेणे चक्रपाणी उद्धरीत असे

Patil_p

संघम् शरणम् गच्छामी- कै. बाबुराव देसाई

Patil_p

उच्च शिक्षणातील नवे पर्व आता राजस्थानात

Patil_p

देशभक्ती आणि अर्थव्यवस्था

Patil_p
error: Content is protected !!