तरुण भारत

डिजिटल सौंदर्य

आयटी क्षेत्रातील बलाढय़ कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱया गुगलने भारतामध्ये 10 अब्ज डॉलर म्हणजेच तब्बल 75 हजार कोटी रु.ची गुंतवणूक करण्याची केलेली घोषणा म्हणजे सध्याच्या रुक्ष वातावरणातील हवेची सुंदर झुळूकच म्हणायला हवी. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या चर्चेत या संदर्भातील विविध पैलूंवर टाकलेला प्रकाश निश्चितपणे देशाला नवी ऊर्जा मिळवून देण्यास उपयुक्त ठरू शकेल. नोटबंदीसह काही फसलेले आर्थिक निर्णय व कोरोनाचे संक्रमण याचे भारतीय अर्थव्यवस्थेवर सखोल परिणाम झालेले दिसतात. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे अद्यापही उद्योगजगताची गाडी रुळावर येऊ शकलेली नाही. बेरोजगारी, क्रयशक्तीतील घट अन् अडखळते अर्थचक्र अशा अनेकविध प्रश्नांमुळे एकूणच देशभर निराशेचे मळभ दाटलेले आहे. अशा काळात डिजिटल इंडियासह एकूणच भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टीने ही गुंतवणूक महत्त्वपूर्ण ठरेल. पिचाई म्हणतात, त्याप्रमाणे सध्या संपूर्ण जग कठीण काळातून जात आहे. आरोग्य आणि अर्थव्यवस्थेच्या समस्यांशी तोंड देत असताना आपण कसे काम करू आणि कशा पद्धतीने जगू याचा पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे. प्रसंग बाका आहे. तथापि, हीच वेळ इनोव्हेशन वा नवनवीन कल्पना राबविण्याची आहे, हे नि:संशय. स्वस्थ बसण्याने अस्वस्थता वाढते. म्हणून क्रिएटिव्हिटी, प्रयोगशील दृष्टी ठेवून पावले टाकणे, हेच कुठल्याही व्यक्ती वा संस्थेच्या भविष्याकरिता हितकारक असते. गुगलचा नावलौकिक आहे, तो अशा नवनवोन्मेषी प्रतिभासंपन्नतेमुळेच. भारतीय वंशाचे सुंदर पिचाई यांच्यासारखा सीईओ लाभणे, हे गुगलच्या सर्जनशीलतेलाच साजेसे म्हणता येईल. आता भारताच्या व्यापक डिजिटायझेशनला गुगलचा हा परिसस्पर्श होतो आहे. त्यातून झळाळी मिळण्याच्या दृष्टीने पुढचा टप्पा म्हणूनच औत्सुक्यपूर्ण असेल. साधारणपणे आगामी पाच ते सात वर्षात होणारी ही गुंतवणूक समभाग गुंतवणूक, भागिदारी, इको सिस्टिम, पायाभूत सुविधा या माध्यमातून आवश्यकतेनुसार केली जाणार आहे. भारतात डिजिटल तंत्रज्ञानाला नागरिक आता सरावत आहेत. या डिजिटल तंत्रज्ञानाच्या स्वीकाराचा वेग वाढविण्याचा यामागे उद्देश आहे. हा एकप्रकारे भारतावर दाखवलेला विश्वासच म्हणता येईल. भारताने इंटरनेटमध्ये मोठी झेप घेतली असली, तरी अद्यापही लाखो जनसंख्या इंटरनेटपासून दूर आहे. हे ओळखून केलेली ही गुंतवणुकीची घोषणा सर्वांना परस्परांशी कनेक्ट करण्यास सहाय्यभूत ठरेल. याशिवाय ई शिक्षण, डिजिटल पेमेंट्सह विविध क्षेत्रांनाही याचा लाभ होणार आहे. आज कोरोनाने शैक्षणिक प्रक्रियेलाही बाधा उत्पन्न केल्याने ई शिक्षणाचे महत्त्व अधोरेखितच झाले आहे. स्वाभाविकच पुढच्या काळात यादृष्टीने जाणीवपूर्वक पावले उचलावी लागतील. त्यासाठीची ही पायाभरणी काळाची गरजच ठरते. याशिवाय मातृभाषेत सर्व प्रकारची माहिती उपलब्ध करून देणे व भारतीयांच्या गरजा लक्षात घेऊन डिजिटल उत्पादनांची निर्मिती करण्यावर गुगलचा भर असेल. यातून भाषिक दरी दूर होऊन ही प्रक्रिया अधिक संवादी बनू शकेल. व्यापार-उद्योग क्षेत्रात डिजिटल सेवा उपलब्ध करून देणे असो वा शिक्षणाबरोबर आरोग्य व कृषि क्षेत्रातील तंत्रज्ञानासाठी योगदान देण्याचा मानस असो, या डिजिटल सौंदर्यातून या क्षेत्रांमध्ये सुटसुटीतपणा येऊन नवी उभारी मिळण्यासच मदत होणार आहे. सुंदर पिचाई हे आज जगभरातील तरुणाईचे आयडॉल आहेत. सर्वाधिक वेतन घेणारे पगारदार, अल्फाबेट व गुगलचे सीईओ या पलीकडे एक हार्डवर्क करणारे व्यक्तिमत्त्व ही त्यांची ओळख आहे. त्यांच्या माध्यमातून पंतप्रधानांच्या महत्त्वाकांक्षी डिजिटल इंडिया योजनेला बळकटी मिळणे, यातून नक्कीच आशादायक वातावरण निर्माण होईल. दुसऱया बाजूला अमेरिकेच्या क्वालकॉम व्हेंचर्सने मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या जिओ प्लॅटफॉर्ममध्ये 730 कोटी रु.ची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. जिओ फ्लॅटफॉर्म ही रिलायन्सची डिजिटल उपकंपनी आहे. आजच्या अटीतटीच्या काळात येथे होणारी गुंतवणूकही बाजारपेठेमध्ये उत्साह पेरू शकते. कोरोना व लॉकडाऊनमध्ये अनेकांच्या नोकऱयांवर कुऱहाड आली असून, पगार कपातीलाही अनेकांना सामोरे जावे लागले आहे. तथापि, देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात टीसीएसने यंदाही 40 हजार नोकऱया देण्याचे जाहीर केले आहे. शिवाय कंपनीने अमेरिकेतही कँपस इंटरव्हय़ूद्वारे दोन हजार जणांची भरती करण्याचे निश्चित केले आहे. सद्य स्थितीतील या उत्साहवर्धक घटना ठरतात. आयटी क्षेत्रातील नावाजलेल्या विप्रो कंपनीनेही नोकर कपात न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी काटकसर वा खर्च कमी करण्यास प्राधान्य देण्याची कंपनीचे अध्यक्ष रिशाद प्रेमजी यांची भूमिका अधिक व्यवहार्य म्हणता येईल. आजमितीला कोरोनामुळे बाजारात एकप्रकारची मंदीच आहे. परंतु, कोणतीही मंदी ही कधीच कायम नसते. म्हणूनच नोकर कपातीपेक्षा अवास्तव खर्चाला कात्री लावणे, पारदर्शकतेचा आग्रह धरणे यावर भर असायला हवा. गुणवान व प्रामाणिक माणसे ही कोणत्याही संस्थेसाठी हिऱयाहून मोलाची असतात. तात्पुरत्या डागडुजीसाठी अशी माणसे कायमची गमावली, तर कोरोनास्थिती सुरळीत झाल्यानंतर मोठी पोकळी निर्माण होऊ शकते. आगामी काळात सर्वच क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची टंचाई जाणवेल, असेही काही तज्ञांचे म्हणणे आहे. त्या दृष्टीने विविध कंपन्या व व्यवस्थापनाने कौशल्याचा उचित सन्मान करणे हितकर ठरेल. ‘गुंतवणूक’ या एका शब्दामध्ये अनेक गुंते सोडविण्याची जादू आहे. गुंतवणुकीने भांडवल निर्माण होते, रोजगार तयार होतात, क्रयशक्ती वाढते. त्याचबरोबर अर्थचक्रालाही गती प्राप्त होते. या कठीण वेळी गुंतवणुकीतून निश्चितपणे एक उमेद जागली आहे. या उमेदीतूनच एक सकारात्मकता तयार होईल. ‘स्वर्ग नको, सुरलोक नको, मज लोभस हा इहलोक हवा,’ असे कवी बा. भ. बोरकर आपल्या कवितेत म्हणतात. नैराश्य हटून येथील लोभसपण टिकून रहावे, इतकेच.

Related Stories

कोरोनाचा वाढता मृत्यूदर कोकणसाठी चिंताजनक!

Patil_p

कोकणवासियांना धसका चाकरमान्यांचा!

Patil_p

पूजा महात्म्य

Patil_p

अद्भुत प्रवास

Patil_p

शांततेला सुरूंग लावण्याचे प्रयत्न

Patil_p

देहात राहून विदेही स्थिती कशी प्राप्त होते?

Patil_p
error: Content is protected !!