तरुण भारत

दोन लसींच्या मानवी परीक्षणाला प्रारंभ

कोरोनाविरूद्ध युद्धात भारतही आघाडीवर, देशात कोरोना मृत्यूदरात घट, बरे होण्याचे प्रमाण 63 टक्क्यांवर

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

कोरोना विषाणूवर लस शोधून काढण्याच्या प्रयत्नांमध्ये जगातील इतर विकसीत देशांबरोबर भारतानेही आघाडी घेतली आहे. भारतात निर्मित दोन लसींच्या मानवी परीक्षणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. या दोन्ही लसींचे प्रथम उंदीर आणि सशांवर यशस्वी परीक्षण करण्यात आल्यानंतर आता मानवावर प्रयोग होत आहेत.

आयसीएमआर या संस्थेचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी ही माहिती मंगळवारी दिली. दोन्ही लसींच्या प्राण्यांवरील परीक्षणाची माहिती भारतीय औषध नियंत्रण कार्यालयाला देण्यात आली असून या कार्यालयाकडून मानवी परीक्षणासाठी अनुमती मिळाल्यानंतर पुढील परीक्षणांना प्रारंभ करण्यात आला आहे.

प्रत्येकी 1 हजार परीक्षणे

दोन्ही लसींची मानवी चाचणी प्रत्येकी 1 हजार लोकांवर होत आहे. या लोकांचा अभ्यास सुरू असून लसीचा त्यांच्या शरीरावर काय परिणाम होतो ते बारकाईने पाहिले जात आहे. लस प्रभावी आणि पूर्णतः सुरक्षित करण्याकडे सर्व लक्ष पुरविण्यात येत असून त्यासंबंधी कोणती ढिलाई दाखविली जाणार नाही. त्यामुळे कोणीही चिंता करू नये, असे प्रतिपादन त्यांनी केले.

60 टक्के लसी भारतात

जगात जितक्या लसी दरवर्षी लागतात, त्यापैकी 60 टक्के लसींचे उत्पादन भारतातच होते. त्यामुळे भारताला लस बनविण्याचा प्रदीर्घ आणि सखोल अनुभव आहे. कोरोनावर लस शोधण्याचे प्रयत्न सरकारी आणि खासगी अशा दोन्ही प्रयोगशाळांमध्ये होत असून संशोधनाचे निकष जागतिक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जगातील इतर देशांच्या बरोबरीने आपण आहोत असा संकेत त्यांनी दिला.

8 राज्यांमध्ये 86 टक्के

देशात अद्याप कोरोनाचे सामाजिक संक्रमण सुरू झालेले नाही. परिस्थिती नियंत्रणात आहे. देशातील एकंदर बाधितांपैकी 50 टक्के केवळ महाराष्ट्र आणि तामिळनाडू या दोन राज्यांमध्ये आहेत. तर 86 टक्के बाधित एकंतर 8 राज्यांमध्ये आहेत. महाराष्ट्र आणि तामिळनाडूसह दिल्ली, कर्नाटक, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि गुजरात ही इतर राज्ये आहेत अशी माहिती त्यांनी दिली.

बरे होण्याचे प्रमाण 63 टक्यांवर

देशात उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या 3 लाख 11 हजार 565, तर बरे झालेल्या रूग्णांची संख्या 5 लाख 71 हजार 459 आहे. 3 मे ला बरे होण्याचे प्रमाण 26.50 टक्के होता. तो 31 मे पर्यंत 47.76 टक्के झाला. सध्या बरे होण्याचे प्रमाण एकंदर रूग्णंख्येच्या 63.02 टक्के आहे.

रूग्णांचे प्रमाण नियंत्रणात

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात प्रति 10 लाख लोकसंख्येमागे 657 रूग्ण आहेत. काही विकसीत देशांमध्ये प्रति 10 लाख रूग्णांची संख्या भारताच्या सात ते आठ पट जास्त आहे. भारतात कोरोना मृत्यूदर प्रति 10 लाख 17.2 इतका आहे. रूग्णसंख्या वाढत असली तरी मृत्यूदर कमी होत आहे. ही प्रोत्साहित करणारी बाब असल्याचे सांगण्यात आले.

दिल्ली, गुजरात नियंत्रणात

दिल्ली आणि गुजरातमध्ये प्रतिदिन नव्या रूग्णांची संख्या कमी होत आहे. दिल्लीत बरे होण्याचे प्रमाण 80 टक्क्यांवर आहे. तर गुजरातमध्ये ते 74 टक्के असून गुजरातमध्ये गेले कित्येक दिवस दिवसाला जवळपास 1000 रूग्ण नवे येत आहेत. पंधरा दिवसांपूर्वी हे प्रमाण 1,500 होते अशी माहिती देण्यात आली.

अमेरिका, रशिया, चीन यांचे प्रयत्न

अमेरिका, रशिया आणि चीन यांनीही कोरोना लस शोधून काढण्याच्या प्रयत्नांची गती मोठय़ा प्रमाणात वाढविली आहे. रशियाने तर प्राथमिक मानवी चाचणी यशस्वी ठरल्याचा दावा केला आहे. मात्र, आणखी चाचण्या व्हायच्या आहेत. आता भारतही या स्पर्धेत पुढे आला असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली.

कोरोनासंबंधी काही शुभवार्ता

ड भारताची लस प्रभावी ठरणार असल्याचा विश्वास तज्ञांकडून व्यक्त

ड भारताचा कोरोना मृत्यूदर अनेक विकसीत देशांपेक्षाही बराच कमी

ड देशात बरे झालेल्यांची संख्या उपचारार्थी रूग्णांपेक्षा जवळपास दुप्पट

ड महाराष्ट्र आणि तामिळनाडूत परिस्थिती वेगाने सुधारण्याची आवश्यकता

ड मास्क आणि सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन काटेकोर आवश्यक

Related Stories

सुशीलकुमार मोदींना राज्यसभेची ‘लॉटरी’

Patil_p

मच्छीमारांच्या कर्जमाफीची रक्कम अर्थखात्याकडून मंजूर

Patil_p

धनी ऍप सुरु करणार २५ लाख कुटुंबांसाठी मोफत कोविड केअर औषधांचे वितरण

Abhijeet Shinde

सहा जवानांना शौर्य चक्र पुरस्कार

Patil_p

खमींगर ग्लेशियरमध्ये 12 ट्रेकर्स अडकले; दोघांचा थंडीने मृत्यू

datta jadhav

ममता बॅनर्जी यांच्यावर 24 तासांची प्रचारबंदी

Patil_p
error: Content is protected !!