तरुण भारत

बेफिकिर राहू नका, कोरोना कोणालाही धोका देऊ शकतो

कोरोना मुक्त झालेल्या मुरगावच्या नगराध्यक्षांचे आवाहन

प्रतिनिधी / वास्को

Advertisements

आपण हॉस्पिटलमध्ये दाखल होताच ज्या नगरसेवकाने आपल्याला घाबरू नको काहीच होणार नाही. आपणही ठिक आहे, असा सल्ला दिला होता. तोच नगरसेवक अचानक निघून गेला. हा प्रकार धक्कादायक असून कोविडला कोणी सहजरीत्या घेऊ नये. कोविड 19 चा संसर्ग अत्यंत धोकादायक आहे. या संसर्गाबाबत कोणीच बेफिकीर राहू नये. बेफिरीमुळे कुणाचाही जीव धोक्यात येऊ शकतो. सुरक्षेचे सर्व नियम पाळा. स्वताची सुरक्षा जपूनच व्यवहार करा असे आवाहन मुरगावचे नगराध्यक्ष नंदादीप राऊत यांनी केले आहे.

मुरगावचे नगराध्यक्ष नंदादीप राऊत सोमवारपासून मुरगावच्या सेवेत पुन्हा रूजू झाले. दहा दिवस सडय़ावरील कोविड कॅअर सेंटरमध्ये उपचार घेतले. त्यानंतर पुन्हा दहा दिवस घरीच कॉरन्टाईन राहिले. आता ते कोविडपासून मुक्त आहेत. आपल्या कार्यालाही त्यांनी पूर्वीप्रमाणेच सुरवात केली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या छोटय़ा मुलीलाही कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळे ती दोघेही एकत्रच हॉस्पिटलमध्ये होती. कोविड पॉझिटिव्ह म्हणून अहवाल आल्यानंतर आपली आणि आपल्या कुटुंबाची काय स्थिती झाली. पुढे हॉस्पिटलमधील दहा दिवस व तीथे आणि आतापर्यंत आलेले अनुभव नगराध्यक्षांनी विषद केले.

कोरोनाने भिती आणि तणाव निर्माण केलेला असतानाही आपण नगराध्यक्ष या नात्याने  फिरतीवर राहिलो, जबाबदारी पार पाडली. लोकांच्या अडिअडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला. पालिका मंडळाच्या आणि इतर बैठकांही घेतल्या. मात्र, तरीही सुरक्षा राखण्याचा प्रयत्न केला. पूर्ण खबरदारी घेऊनही अखेर कोरोनाने माझा शरीरात प्रवेश केला. तपासणी अहवाल पॉझिटिव्ह येताच एखादय़ा कुटुंबाची काय अवस्था होऊ शकते तेच आपल्या कुटुंबातही झाले. आपण चलबीचल झालो. घरातही भिती पसरली. लहान मुले आणि वृध्द आईमुळेच आपल्या मनात भिती निर्माण झाली. सुदैवाने आपली एकच मुलगी पॉझिटिव्ह झाली. बाकी सर्व जण निगेटिव्ह होते. त्यामुळे इतरांची चिंता दूर झाली.

ते दिवस कठीण आणि आव्हानात्मक होते

आपण मुलीसह हॉस्पिलमध्ये दाखल झालो. एके रात्री आपल्या ताप आला. मुलीलाही ताप आला. त्या रात्री मुलीचा ताप वाढू नये म्हणून तीच्या कपाळावर ओल्या घडय़ा घालायचे काम आपण करीत राहिलो. त्या रात्रीनंतर ताप आला नाही. कसला त्रासही झाला नाही. परंतु दिवस कठीण होते. जोपर्यंत निगेटिव्ह होऊन बाहेर पडत नाही तोपर्यंत आपण बरा झालो असे कुणी म्हणू शकत नाही. हेडलॅण्ड सडय़ावरील त्या हॉस्पिटलमध्ये छोटी छोटी मुले होती, वृध्द लोक होते, गरीब लोक होते. त्यांना पाहून वाईट वाटायचे. अशी संख्या वाढतच गेली तर काय होईल असा विचार मनात यायचा. हॉस्पिटलमध्ये जेवणा खाणाची सेवाही समाधानकारण नव्हती. त्यामुळे मुले, वृध्द आणि गरीब रूग्णांचे होणारे त्रास दिसत होते. अशा परिस्थितीमुळे आपण व आपल्यासोबत असलेल्या क्रितेश गावकर, रोचना बोरकर, लाविना डिसोजा व इतरांनी प्रशासनावर दबाव आणल्यानंतर सेवेत सुधारण झाली ही समाधानाची गोष्ट होती. कोविड निगेटिव्ह बनण्यासाठी विशेष उपचार नव्हते. मात्र, डॉक्टरांनीही चांगली देखरेख ठेवली. त्यामुळेच आपल्या सारखे अनेकजण सुखरूप घरी पोहोचले. मात्र, ते दहा दिवस आव्हानात्मकच होते. संघर्षजनकच होते.

सुरक्षीत राहूनच दैनंदिन व्यवहार करा

आपणाला कोरोना होणारच नाही असा समज कुणी करून घेऊन नये असे आपल्याला वाटते. तो कुणालाही आणि केव्हाही होऊ शकतो. नंतर त्यातून सुटका करण्यासाठीही संघर्ष करावा लागतो. कुटुंबालाही त्रास सहन करावा लागतो. स्वताला जपावे, सुरक्षा नियमांचे पालन करूनच दैनंदिन व्यवहार करावेत. कोरोना येण्यापूर्वी जे काही दिवस होते. ते काही काळासाठी आता विसरावेत. या संसर्गाबाबत कोणीच बेफिकीरी बाळगू नये. बेफिकीर राहिल्यास कुणाचाही जीव धोक्यात येऊ शकतो.

पास्कॉल डिसोजा यांनी आपण घाबरत नाही, तुही घाबरू नको असा सल्ला दिला होता

पालिका मंडळाला कोरोनाच्या संकटात पास्कॉल डिसोजासारख्या नगरसेवकाला जीव गमवावा लागल्याचे दुख त्यांनी व्यक्त केले. कोरोनामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागल्यानंतर आपण फोन बंद ठेवला होता. त्या दरम्यान, नगरसेवक पास्कॉल डिसोजा यांनी आपल्याला चौदा वेळा फोन केला. त्यांना आपल्याला धीर ध्यायचा होता. दुसऱया दिवशी आपल्याला पास्कॉल संपर्क करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे समजताच आपण त्यांच्याशी बोललो. पास्कॉल दिलखुलास बोलत होते. घाबरू नकोस काहीच होणार नाही असा सल्ला देतानाच आपण तुझ्यापेक्षा वयाने किती तरी मोठा आहे. आपण घाबरत नाही, आपण ठीक आहे असे त्यांनी आपल्याला सुनावले होते. मात्र, काही दिवसांनी आपण त्याला पुन्हा कॉल करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा फोन बंद असल्याचे जाणवले. संध्याकाळपर्यंत पास्कॉल यांची प्रकृती चिंताजनक असल्यचेही समजले. आणि दुसऱया दिवशी ते कोरोनाचे बळी ठरल्याची धक्कादायक माहिती मिळाली. त्यामुळे कोरोना ही सहजरीत्या घेता येणारी गोष्ट नाही. तो कोणालाही धोका देऊ शकतो असे नगराध्यक्षा नंदादीप राऊत म्हणाले.

Related Stories

साखळीत अपघातात युवक ठार

Amit Kulkarni

दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात स्वतंत्र ‘हृदयरूग्ण’ विभाग

Amit Kulkarni

खांडोळा येथे वीज ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन

Patil_p

आत्मनिर्माण भारत व स्वयंपूर्ण गोवा उपक्रमात मोठय़ा प्रमाणात सहभागी व्हा

Patil_p

सरकारने जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर नियंत्रण ठेवावे – विठू मोरजकर

Patil_p

खासगी वनक्षेत्र प्रकरणी सरकारची याचिका फेटाळली

tarunbharat
error: Content is protected !!