तरुण भारत

कोल्हापूर : कोरोनाच्या नावाखाली डॉक्टरांच्या बदनामीचे प्रयत्न

संजीव खाडे / कोल्हापूर

कोरोना विरूद्धच्या लढय़ात जिल्हा प्रशासन, आरोग्य प्रशासनाच्या बरोबरीने खासगी डॉक्टरांचाही सहभाग मोलाचा ठरत आहे. प्रत्येक घटक आपले योगदान देत आहे. मात्र त्यातूनही वैद्यकीय क्षेत्रातील तीव्र स्पर्धेतून काही चुकीचे प्रकारही पुढे येत आहेत. कोरोनाच्या नावाखाली एखादा डॉक्टर, हॉस्पिटलला सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनाम करणारी यंत्रणा कार्यरत झाली आहे. शहरातील एका प्रसिद्ध डॉक्टरला कोरोना झाल्याची खोटी पोस्ट व्हायरल झाल्यानंतर वैद्यकीय क्षेत्रातील स्पर्धेतून घडत असलेल्या चुकीच्या प्रकारावर प्रकाश पडला आहे. संबंधित डॉक्टरने आपल्याला कोरोना झाला नसल्याचा व्हिडिओ व्हायरल करून आपल्यावर जळणाऱयांवर काय बोलणार? असे सांगत वैद्यकीय क्षेत्रातील जळफळाटावर सूचक विधान केले आहे.

Advertisements

स्थानिक वैद्यकीय क्षेत्रात कोरोनाच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपल्या प्रतिस्पर्ध्यांना बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू होती. मात्र प्रसिद्ध डॉक्टरने व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर या चर्चेला पुष्टी मिळाली.  कोरोना रूग्णावर उपचार करण्यासाठी शासकीय आणि खासगी डॉक्टर जीवाची बाजी लावून कार्य करत आहेत. त्यामुळे काही डॉक्टरना कोरोनाचा संसर्गही झाला. कोरोना पॉझिटिव्ह होण्याआधी आणि नंतरही संबंधित डॉक्टरांनी प्रतिबंधात्मक दक्षता घेतली होती. पॉझिटिव्ह असतानाही स्वतःवर उपचार घेत रूग्णांना ऑनलाईन वैद्यकीय सल्ला देत कर्तव्य पार पाडले. तरीही त्या डॉक्टर आणि त्यांच्या हॉस्पिटलविषयी नागरिकांत संभ्रम निर्माण करणारी यंत्रणा कार्यरत होती. मात्र याची जाहीर वाच्यता नव्हती. नागाळापार्क परिसरातील एका प्रसिद्ध हॉस्पिटलच्या डॉक्टर कोरोना झाल्याची पोस्ट रविवारी व्हायरल झाली. आधीच दोन डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने वैद्यकीय क्षेत्र चिंतेत असताना प्रसिद्ध डॉक्टरचे नाव व्हायरल झाल्याने चर्चा सुरू झाली.

मात्र प्रत्यक्षात त्या प्रसिद्ध डॉक्टराला कोरोना झाला नव्हता. मात्र त्यांच्या हॉस्पिटलचा असणारा लौकिक आणि नाव यामुळे त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. पण संबंधित डॉक्टर महोदयांनी तातडीने व्हिडिओ व्हायरल करत आपल्याला कोरोना झालेला नाही. मी फिट आणि फाईन आहे. हॉस्पिटलच्या ओपीडी सुरू आहेत. येणाऱया रूग्णांवर उपचार करत आहे. माझ्या हॉस्पिटलमध्ये कुणीही कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण नाही. माझी काळजी करू नका, आपली काळजी घ्या, सुरक्षित राहा, असे आवाहन आपले रूग्ण, हितचिंतक आणि मित्रांना केले. त्यात मात्र त्यांनी काही जळणाऱयांनी मला कोरोना झाला आहे, अशी खोटी माहिती पसरवली. त्यांच्या विषयी मी काय बोलणार? असे सांगत खोटय़ा व्हायरल पोष्टमागे असणारे सत्य अप्रत्यक्षरित्या समाजापुढे आणले. त्यातून वैद्यकीय क्षेत्रात स्पर्धेत निर्माण झालेला मत्सर आणि त्यातून सुरू झालेले बदनामी करण्याचे प्रयत्न उघड झाले.

दोन डॉक्टर पॉझिटिव्ह आणि नंतर निगेटिव्ह
कोरोनाच्या काळात रूग्ण सेवा करत असताना रंकाळा टॉवर येथील एक युवा  आणि ताराबाई पार्क येथील अनुभवी असे दोन डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह झाले. त्यांनी स्वतःवर उपचार घेतले. त्याचवेळी ऑनलाईनवरून सल्ला देत आपल्या रूग्णांची काळजीही घेतली. कर्तव्य पार पाडणाऱया या डॉक्टरांच्या हॉस्पिटलवर चर्चा करणाऱया पोष्टही व्हायरल झाल्या होत्या. त्यामागेही वैद्यकीय क्षेत्रातील जळणारे मेंदू कार्यरत असावेत, असेही डॉक्टरवृंद खासगीत बोलताना दिसत आहे.

Related Stories

शिरोळ तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने मैदान खुले करण्याची मागणी

Abhijeet Shinde

घर बांधकामाला आता ग्रामपंचायतीची परवानगी हवी

Abhijeet Shinde

“विनाकारण डिवचण्याचा प्रयत्न केला, तर शिवसैनिक जिथल्या तिथे हिशोब करतात”

Abhijeet Shinde

गॅस सिलिंडरची तब्बल 850 रुपयांना विक्री

Abhijeet Shinde

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आदमापूरातील संत बाळुमामा चरणी

Sumit Tambekar

”मुख्यमंत्र्यांचा कोकण दौरा म्हणजे केवळ दर्शनाचा’ कार्यक्रम”

Abhijeet Shinde
error: Content is protected !!