तरुण भारत

वृद्धाचा कोरोना वॉर्डमध्ये तडफडून मृत्यू

प्रतिनिधी/ बेळगाव

रड्डेरहट्टी (ता. अथणी) येथील एका वृद्धाचा कोरोना वॉर्डमध्ये तडफडून मृत्यू झाला आहे. यासंबंधी 1 मिनीट 36 सेकंदाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. वाढत्या रुग्ण संख्येमुळे सिव्हिल हॉस्पिटल हाऊसफुल्ल झाल्याने जमिनीवर बेड टाकून त्याला झोपविण्यात आले होते. पोटदुखीमुळे हा वृद्ध तडफडत होता. मात्र कोणीच त्याची दखल घेतली नाही, हे व्हिडीओवरुन स्पष्ट होते. या व्हिडीओमुळे बिम्सचा गलथान कारभार चव्हाटय़ावर आला आहे.

Advertisements

सोमवार दि. 13 जुलै रोजी रात्री रड्डेरहट्टी (मूळचे नागनूर पी.के.) येथील 65 वषीय वृद्धाला बेळगावला आणण्यात आले. सुरुवातीला त्याला खासगी इस्पितळात नेण्यात आले होते. पोटदुखी आणि श्वसनाचा त्रास असल्यामुळे खासगी इस्पितळात त्याला दाखल करुन घेण्यास टाळाटाळ करण्यात आली व सिव्हिल हॉस्पिटलचा मार्ग दाखविण्यात आला.

त्या वृद्धाच्या कुटुंबीयांनी त्याच दिवशी त्याला सिव्हिल हॉस्पिटलला हलविले. या इस्पितळात आल्यानंतर तब्बल पाच तास त्याच्यावर कोणतेच उपचार झाले नाहीत. पाच तासानंतर त्याच्या घशाचे स्वॅब घेण्यात आले. त्यानंतर ट्रोमा विभागात नव्याने सुरू करण्यात आलेल्या कोरोना संशयितांच्या वॉर्डमध्ये त्याला दाखल करण्यात आले होते. बुधवारी त्याचा स्वॅब तपासणी अहवाल पॉझिटिव्ह येताच कोविड-19 हॉलमध्ये हलविण्यात आले. गेल्या दोन दिवसांत वाढत्या रुग्ण संख्येमुळे सिव्हिल हॉस्पिटल कोरोना रुग्णांनी तुडुंब भरले आहे. त्यामुळे नव्या रुग्णांसाठी बेड मिळेना, अशी परिस्थिती आहे. जमिनीवर एक बेड टाकून त्या वृद्धाला झोपविण्यात आले होते.

शुक्रवारी व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे त्रासाने तडफडून त्याचा मृत्यू झाल्याचे सामोरे आले आहे. याच विभागात उपचार घेणाऱया आणखी एका रुग्णाने तडफडणाऱया वृद्धाचा व्हिडीओ केला असावा. जेणेकरुन कोविड-19 वॉर्डमध्ये काय परिस्थिती आहे, हे नागरिकांना कळू दे या उद्देशाने व्हिडीओ व्हायरल केल्याचा संशय आहे. या व्हिडीओमुळे एकच खळबळ माजली आहे.

विवस्त्र अवस्थेतील वृद्ध विव्हळत होता. मात्र त्याच्या मदतीला कोणीच धावले नाहीत. बेडवरुन तो फरशीवर पडला. तरी त्याच्या मदतीला कोणीच गेले नाहीत. कोरोनाबाधितांवर उत्तमरितीने उपचार करण्याचा दावा करणाऱया बिम्स प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे वेळेत उपचार न मिळाल्याने त्या वृद्धाचा तडफडून मृत्यू झाला आहे. या एका प्रकारावरुन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे, हे लक्षात येते.

संबंधितांना नोटीस देणार-डॉ. विनय दास्तीकोप्प

यासंबंधी बिम्सचे वैद्यकीय संचालक डॉ. विनय दास्तीकोप्प यांच्याशी संपर्क साधला असता आपण शुक्रवारी दुपारीच कर्तव्यावर रुजू झालो आहे. ही घटना आपल्या निदर्शनास आली आहे. एकंदर प्रकाराची चौकशी करण्यात येत आहे. त्या वॉर्डमध्ये जे कर्मचारी सेवेत होते. त्यांना नोटीस देण्यात येणार आहे. ते काय उत्तर देणार याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यानंतरच या घटनेवर प्रकाश पडणार आहे, असे त्यांनी सांगितले. दरम्यान व्हायर झालेल्या व्हिडीओमुळे बिम्स प्रशासनाचे बिंग बाहेर पडले असून कोविड-19 वॉर्डमध्ये सर्व काही ठिक नाही हे पुन्हा एकदा सामोरे आले आहे.

Related Stories

सिव्हिल हॉस्पिटलमधून 24 जणांना डिस्चार्ज

Patil_p

‘कोरोनामुक्तां’ची चमक

Patil_p

समर्थनगर येथे मटका अड्डय़ावर छापा

Rohan_P

विमान प्रवासाला प्रवाशांचा वाढता प्रतिसाद

Patil_p

जमा-खर्च घेणारे निवडणूक अधिकारीच गायब

Amit Kulkarni

वंटमुरी कॉलनीत घरे बांधून द्या

Patil_p
error: Content is protected !!