तरुण भारत

विरोधकांना राज्यपाल जवळचे !

प्रतिनिधी/ पणजी

राज्यातील कोरोनाचा वाढता फैलाव आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यात आलेले अपयश यावरून सध्या सरकारवर जोरदार टीका होत आहे. विरोधकांनी तर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना टार्गेटच केले आहे. कोरोनाच्या विषयावरून मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका सुरू आहे. आता तर मुख्यमंत्र्यांपेक्षा राज्यपालांवरच आम्हाला जास्त विश्वास आहे, अशी स्पष्ट आणि सडेतोड प्रतिक्रिया विरोधी पक्षाच्या नेत्यासह अन्य विरोधी घटकांनी व्यक्त केली आहे.

Advertisements

म्हादई, खाणसंबंधी राज्यपाल गंभीर

गोव्याची जीवनदायिनी असलेल्या म्हादईच्या विषयावरून खाणबंदीचा विषय व आता कोरोना महामारीचा विषय या प्रत्येक मुद्दय़ावर राज्यपालांनी गांभीर्याने लक्ष दिले आहे. सातत्याने केंद्र सरकारकडेही पाठपुरावा केला आहे. प्रदीर्घ राजकीय अनुभव आणि राज्यपालपदाची जबाबदारी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी निभावली आहे. त्यामुळे विरोधी घटकांना आता राज्यपालच गोव्याचे तारणहार वाटत आहेत. गोव्याला प्रत्येक संकटातून राज्यपालाच तारु शकतात, अशी भावना विरोधकांची झालेली आहे.

मुख्यमंत्री अपयशी ठरले म्हणूनच राज्यपालांकडे
जावे लागते : दिगंबर कामत

राज्यातील अनेक समस्यांबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांना सतत सूचना केल्या, पण त्यांनी विरोधी नेत्यांचे कधीच ऐकून घेतले नाही. कोरोना महामारीच्या सुरुवातीलाच लॉकडाऊन करण्यापासून धान्य वितरणापर्यंत मुख्यमंत्र्यांना अनेकवेळा सूचना केल्या. एवढेच नव्हे तर या काळात पूर्ण सहकार्य दिले, पण त्यांनी कुणाचेही ऐकले नाही. आपल्याला हवे तेच केले. त्यामुळे आम्हाला दरवेळी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याकडे जावे लागले, अशी स्पष्ट प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी व्यक्त केली.

आज गोवा गंभीर स्थितीतून जात आहे. अशावेळी मुख्यमंत्री अपयशी ठरले तर राज्यपालांकडे जाणे भागच आहे. कारण राज्यपाल आज प्रत्येक समस्येकडे लक्ष देतात व समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करतात. सुरुवातीलाच लॉकडाऊनच्या काळात धान्यपुरवठा सुरळीत ठेवण्याची मागणी आम्ही केली होती, पण ते न करता कुठूनतरी बाहेरून धान्य आणून त्यांनी काही ठिकाणी वितरण केले व नंतर बंद केले. त्यामुळे लॉकडाऊनचे उल्लंघन करून लोक रस्त्यावर येऊ लागले. मुख्यमंत्री योग्य प्रतिसाद देत नसल्याने अखेर आम्हाला राज्यपालांकडे जावे लागले. राज्यपाल योग्य प्रकारे ऐकून घेतात व प्रतिसाद देतात. त्यामुळे आम्ही आमची गाऱहाणी राज्यपालांकडे मांडत आलो, असेही कामत यांनी सांगितले.

मुख्यमंत्री विश्वासाला पात्र ठरले नाहीत : सरदेसाई

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर आमचा कधीच विश्वास नव्हता. वर्षभराअगोदर त्यांनी गोवा फॉरवर्डचा विश्वासघात केला, पण ज्यावेळी राजकारण बाजूला ठेवून संघटित गोयंकारपणाचा मुद्दा असतो त्यावेळी तरी मुख्यमंत्र्यांनी विचारपूर्वक वागायला हवे. कोरोना महामारीचे गांभीर संकट गोव्यासमोर आहे, पण अशावेळी सरकारला कोळसा आणि खाण व्यवसायाला जास्त महत्व देतात. त्यामुळे वाटते की मुख्यमंत्री विश्वासाला पात्र नाहीत, असे गोवा फॉरवर्डचे नेते व आमदार विजय सरदेसाई यांनी सांगितले.

विरोधकांनाही आज राज्यपालांचा आधार वाटतो. कारण राज्यपाल प्रत्येक समस्यांत लक्ष घालतात 31 जुलैपर्यंत मायनिंग खडीची वाहतूक होणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री लॉकडाऊनला तयार नव्हते. आता तीन दिवसांचे लॉकडाऊन त्यांनी निरुपायाने केले आहे. शिक्षण खात्याच्या परिपत्रकाबाबत मुख्यमंत्री आपल्याला माहीत नसल्याचे सांगतात. कोणतीही फाईल संबंधित मंत्र्यांकडे पाठविल्याशिवाय निर्णय होत नाही. शिक्षण खात्याची फाईल जर मुख्यमंत्र्यांकडे आली नसेल तर ते मुख्यमंत्र्यांना गृहीत धरतात व शिक्षणातले मुख्यमंत्र्यांना काहीच कळत नाही असाच त्याचा समज झालेला असावा, असेही ते म्हणाले. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांचा पर्दापाश केला आहे. राज्यपालांनी योग्य शब्दात मुख्यमंत्र्यांना सुनावले आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर गोंयकार लक्ष ठेऊन आहेत. ते योग्यवेळी मुख्यमंत्र्यांना औषध देतील, असेही सरदेसाई म्हणाले.

Related Stories

श्री इस्वटी ब्राह्मण लक्ष्मी-नारायण देवालयात उदक शांती पूजा

Amit Kulkarni

धान्यासाठी बेतोडय़ात मजूरांची झुंबड सामाजिक अंतराचा भंग

Omkar B

शिरदोन येथील अर्भकाच्या खूनाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी

Patil_p

खुटवळ हळर्ण परिसरात बिबटय़ा वाघाचा धुमाकूळ

Amit Kulkarni

मार्था साल्ढाना व मारियानो रॉड्रिक्स यांच्याकडून काँग्रेस पक्षाचा राजीनामा

Amit Kulkarni

मडगाव गांधी मार्केट बंद करण्याची पाळी

tarunbharat
error: Content is protected !!