तरुण भारत

हृदयीं कालिंदी संतोषे

ती सुंदरी अर्जुनाला पुढे म्हणाली-काळावर ज्याची सत्ता चालते व काळाचे जो मापन करतो तो सूर्यदेव माझा पिता आहे. मी त्याची कन्या असून माझे नाव कालिंदी आहे. माझ्या पित्याने यमुनेच्या गर्भात या मंदिराची रचना केली आहे. तेथे राहून मी भगवान हरिच्या प्राप्तीकरिता तप करीत आहे. तो प्राप्त होईपर्यंत माझ्या तपात खंड पडणार नाही.

ऐसीं कालिंदीचीं वचनें । ऐकोनि अर्जुन निवाला मनें । मग तो स्वमुखें हरिकारणें । कथिता जाला तें ऐका । जैसी लिखित पत्रिका पढतां । पर्याय पालटूं न शके वक्ता । तैसेंचि अर्जुनें श्रीभगवंता । कथिलें तत्त्वता तदुदित जें । तोही ऐकोनि अर्जुनवाणी । तद्वृत पूर्वींच चक्रपाणि ।  सर्व जाणता अंतःकरणीं । त्याची करणी अवधारा । रथ लोटूनि घडघडाट । जाऊनि यमुनासलिलानिकट । कालिंदीचें यथाभीष्ट । केली उपविष्ट रहंवरिं । शंतम हस्तें करग्रहण । करूनि घेतली उचलून ।  रथावरौती आरोपून । निघे भगवान इंद्रप्रस्था । भगवंताच्या करस्पर्शें । हृदयीं कालिंदी संतोषे ।  तया सुखासि तुलना असे । विधिही ऐसें वदों न शके । पहातां श्रीकृष्णाचें वत्र । कालिंदीचे निवाले नेत्र । त्रैलोकविभवा जाली पात्र । फावली स्वतंत्र विश्रांती । मग विलोकी चरणांकडे । रथीं मौनस्था न बोले तोंडें । हृत्कमळींच्या सुखसुखवाडें। प्रेम वोसंडे सर्वांगीं । कालिंदीचा हर्षोत्कर्ष । वर्णू न शके विरिंचि शेष । असो यानंतर आदिपुरुष । इंद्रप्रस्थास चालिला ।

Advertisements

कालिंदीचे बोलणे ऐकून अर्जुनाला मनातून अत्यंत आनंद झाला व तो तात्काळ धावत कृष्णापाशी आला. कोणी लिहिलेले पत्र वाचून दाखवताना जसा एकही शब्द बदलला जात नाही त्याचप्रमाणे अर्जुनाने कृष्णाला कालिंदी जे काही बोलली ते शब्दशः सांगितले. अर्थात श्रीहरी सर्वांच्या हृदयात वास करून असल्याने अर्जुनाने जे जे काही सांगितले ते ते कृष्ण आधीच जाणून होता. पण केवळ लीला करण्यासाठी कृष्णाने अर्जुनाला कालिंदीची मुलाखत घेण्याकरिता पाठविले होते. अर्जुनाचे मुखातून कालिंदीच्या मनातील इच्छा ऐकल्यावर कृष्णाने वेगाने आपला रथ यमुनेपाशी नेला. कालिंदीला उचलून आपल्या रथात घेतले. हरिचा स्पर्श होताच कालिंदीला अत्यंत आनंद झाला. तिच्या हृदयातून प्रेमाचा वर्षाव होऊ लागला. ती भगवंताचे चरण पहात रथात मौन होऊन राहिली. तिच्या नेत्रातून आनंदाचे अश्रू पाझरू लागले. तिच्या हर्षाचे वर्णन प्रत्यक्ष ब्रह्मदेवाला किंवा सहस्त्र मुखांच्या शेषालाही करता येणार नाही. कृष्णाचा रथ इंद्रप्रस्थाच्या दिशेने निघाला.

भास्करभ्रमणें वय वोसरें । तैसाचि मार्ग क्रमूनि त्वरें ।

धर्मराजाप्रति स्नेहसुभरें । येता जाला श्रीभगवान् ।

सेवक धांवोनि कथिती पुढें । कृष्णलावण्यगुणपरिपाडें ।

कन्या जोडली कनकीं ठिकडे । जेविं जिडे पाचूचे ।

हें ऐकूनि धर्मराज । सभीम माद्रीचे आत्मज ।

परमाह्लादें नाचती भोज । जाणोनि भाज हरियोग्य।

हर्षें सामोरे धांवती । स्थळोस्थळीं बळी सांडिती ।

विविध द्रव्यें कुरवंडिती । तेणें वारिती दृग्दोष ।

Related Stories

सरकारी परीक्षेची सत्वपरीक्षा!

Patil_p

लोकशाही ‘म्यान’

Patil_p

दरवर्षाची तीच कहाणी

Patil_p

ब्रेक्झिटचे घोडे अखेर ऍटलांटिक समुद्रात न्हाले

Patil_p

स्पर्धा परीक्षांचा दर्जा आणि गुणात्मक बदल

Patil_p

कोरोनाच्या लढय़ात अखंड सावधपणच कामी येणार

Patil_p
error: Content is protected !!