तरुण भारत

बॉक्सेल ब्रिजचा कोसळलेला भाग ‘ग्रीन नेट’ने झाकला

ठेकेदार कंपनी-महामार्ग प्राधिकरणच्या भूमिकेबाबत साशंकता : गणेशोत्सवापूर्वी कोसळलेल्या भागाच्या ठिकाणी उपाययोजना अत्यावश्यक

वार्ताहर / कणकवली:

Advertisements

कणकवलीतील महामार्ग चौपदरीकरणांतर्गत बॉक्सेल ब्रिज कोसळल्यानंतर तेथील कोसळलेल्या भागाच्या ठिकाणी काँक्रिटच्या तात्पुरत्या संरक्षक भिंती उभारण्यात आल्या आहेत. मात्र, बॉक्सेलच्या वरील भागात पाणी जात असून ब्रिजचा भाग कोसळू नये म्हणून कोसळण्याच्या स्थितीत असलेला बॉक्सेलच्या शेवटच्या भिंतीचा भाग पाडण्यात आला. ज्या ठिकाणी बॉक्सेल ब्रिज संपतो, तेथील कोसळलेला भाग ग्रीन नेटने झाकून ठेवण्यात आला आहे. मात्र, या भागातील माती रस्त्यावर येऊ नये म्हणून गणेश चतुर्थीपूर्वी तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.

कणकवलीतील बॉक्सेल ब्रिजचा काही भाग कोसळल्यानंतर यावरून कणकवलीत ठेकेदार कंपनीविरोधात रोष निर्माण झाला. नागरिकांनी महामार्ग रोखून धरला होता. आमदार नीतेश राणे, वैभव नाईक, संदेश पारकर आदींनी ठेकेदार कंपनीविरोधात कारवाईची मागणी केली होती. नागरिकांनी दिलेल्या तक्रारीनुसार फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 133 नुसार प्रांताधिकाऱयांनी अंतरिम आदेश दिले होते. मात्र, सध्या शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने या विषयाकडे  दुर्लक्ष झाले आहे.

माती सर्व्हिस रस्त्यावर येण्याची भीती!

महिनाभराने गणेश चतुर्थी सण येत असून मोठय़ा प्रमाणात चाकरमानी जिल्हय़ात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. गेले चार दिवस पावसाने उसंत घेतली असली, तरी येत्या काळात पाऊस सुरू झाला की, या बॉक्सेल ब्रिजचा प्रश्न   पुन्हा ऐरणीवर येणार आहे. सध्या कोसळलेल्या भागात सर्व्हिस रस्त्याच्या बाजूने संरक्षक भिंती उभारण्यात आल्या. मात्र, ज्या ठिकाणी बॉक्सेल ब्रिज संपतो, तेथे पाणी बाहेर येण्यासाठी सिमेंट ब्लॉकचा बहुतांश भाग पाडण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काळात मोठा पाऊस झाल्यास त्या बॉक्सेलमधील माती सर्व्हिस रस्त्यावर येण्याची भीती आहे.

आतापासूनच खबरदारी हवी!

एस. एम. हायस्कूल व हॉटेल मंजुनाथ या दोन्ही बाजूंच्या सर्व्हिस रस्त्यांवर बॉक्सेलच्या कोसळलेल्या भागाला संरक्षक भिंतीचा आधार देण्यात आल्याने अगोदरच अरुंद असलेला सर्व्हिस रस्ता अजूनच अरुंद झाला आहे. त्यात जर ऐन गणेशोत्सवात या बॉक्सेलच्या भागातील माती रस्त्यावर आली, तर सर्व्हिस रस्ते व कणकवलीतील पटवर्धन चौकापासूनचा भाग चिखलमय होऊ शकतो. याबाबत आतापासूनच खबरदारी घेत उपाययोजना करण्याची गरज आहे.

गणेशोत्सवापर्यंत काय करणार?

बॉक्सेल ब्रिजचे काम निकृष्ट असल्याचे समोर आल्यानंतर तो ब्रिजच काढून फ्लाय ओव्हरब्रिज करण्याची मागणी पुढे आली आहे. त्यात तात्पुरत्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या. आता बॉक्सेल जेथे संपतो, तेथे कोसळण्यात आलेल्या भागाला ग्रीन शेडनेट लावण्यात आले आहे. त्यामुळे गणेशोत्सवापर्यंत हा भाग तसाच झाकून ठेवण्यात येणार का, असा सवाल केला जात आहे.

कागदोपत्री सोपस्कार नको

आताच्या स्थितीत बॉक्सेल ब्रिज पूर्ण काढणे शक्य नसले, तरी पावसाळ्य़ानंतर हे पूर्ण ब्रिज काढून तेथे नव्याने ब्रिजचे काम करण्याची गरज आहे. अधीक्षक अभियंत्यांनी काही दिवसांपूर्वी महामार्ग ठेकेदार कंपनीच्या कामावर देखरेख ठेवणाऱया आरटी फॅक्ट या कन्सल्टंन्ट एजन्सीला आर्थिक दंड का करू नये, अशी कारणे दाखवा नोटीस पाठविली होती. मात्र, असे केवळ कागदोपत्री सोपस्कार पार पाडण्यापेक्षा बॉक्सेल ब्रिज पूर्णत: काढून नव्याने करण्याबाबत स्पष्ट आदेश देण्याची मागणी जनतेतून होत आहे.

ऐन गणेशोत्सवात भीती!

बॉक्सेल ब्रिज कोसळल्यानंतर महामार्ग प्राधिकरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी जी प्रेस नोट दिली, त्यात संभ्रमावस्था आहे. नेमके ब्रिजचे पूर्ण काम करण्यात येणार की, कोसळलेला भाग तेवढाच काढून नव्याने करण्यात येणार, याबाबत स्पष्टता नाही. त्यामुळे जनतेच्या मनात आजही महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार कंपनीच्या विरोधात संशयाची भावना आहे. याचा विचार करून वरिष्ठस्तरावरून निर्णय घेण्याची गरज आहे. अन्यथा ऐन गणेशोत्सवात कणकवलीत हायवेच्या समस्या पुन्हा एकदा डोके वर काढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Related Stories

मार्गताम्हानेत मध्यरात्री आग लागून कार, दुचाकी खाक

Patil_p

जिह्यात कोरोनामुळे आणखी तिघांचा मृत्यू

Patil_p

लॉकडाऊनमध्ये अडकले मनोरूग्णालयातील 60 रूग्ण!

Patil_p

देयके 22 कोटीची, आले फक्त साडेतीन कोटी

NIKHIL_N

लॉकडाऊनमध्ये घरीच बनविली इलेक्ट्रिक दुचाकी

NIKHIL_N

85 वर्षीय वृद्धाकडून 73 वर्षीय वृद्धाचा खून

NIKHIL_N
error: Content is protected !!