तरुण भारत

विंडीजचा फडशा, ब्रॉडचे 6 बळी

तिसरी कसोटी तिसरा दिवस : विंडीज 197, इंग्लंड 282 धावांनी पुढे, सिबलीचे अर्धशतक

वृत्तसंस्था/मँचेस्टर

Advertisements

स्टुअर्ट ब्रॉडने टिपलेल्या सहा बळींमुळे तिसऱया कसोटीच्या तिसऱया दिवशी विंडीजचा पहिला डाव 197 धावांत गुंडाळून यजमान इंग्लंडने पहिल्या डावात 172 धावांची आघाडी मिळविली. त्यानंतर चहापानाला खेळ थांबला तेव्हा इंग्लंडने दुसऱया डावात बिनबाद 86 धावा जमविल्या होत्या. शेवटची बातमी हाती आली तेव्हा इंग्लंडने 33 षटकांत बिनबाद 110 धावा जमवित आघाडी 282 धावांपर्यंत वाढविली होती. सिबलीने अर्धशतक (56) पूर्ण केले होते तर बर्न्स 46 धावांवर खेळत होता.

तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली असल्याने या तिसऱया व अखेरच्या कसोटीला निर्णायक स्वरूप प्राप्त झाले आहे. इंग्लंडने पहिल्या डावात 369 धावा जमविल्यानंतर दुसऱया दिवशीअखेर विंडीजने 6 बाद 137 धावा जमविल्या होत्या. या धावसंख्येवरून त्यांनी तिसऱया दिवसाच्या खेळास प्रारंभ केला आणि उर्वरित चार गडय़ांनी त्यात आणखी 60 धावांची भर घालत फॉलोऑन टाळण्यात कसेबसे यश मिळविले. ब्रॉडने भेदक मारा करीत चारही फलंदाजांना बाद करीत एकूण 31 धावांत 6 बळी मिळविले तर अँडरसनने 2 बळी टिपले.

कर्णधार जेसॉन होल्डर व शेन डॉरिच यांनी फॉलोऑन टाळण्याचे पहिले उद्दिष्ट गाठून दिले. इंग्लंडने जोफ्रा आर्चर व वोक्स यांचाच मारा सुरू ठेवला होता. पण ब्रॉड व अँडरसन गोलंदाजीस आल्यानंतर नूरच पालटला. ब्रॉडने आपल्या तिसऱयाच चेंडूवर होल्डरला पायचीत केले. होल्डरने सर्वाधिक 46 धावा जमविल्या आणि डॉरिचसमवेत 119 धावांची भागीदारी केली. त्यांच्या डावातील हीच सर्वात मोठी भागीदारी ठरली. त्यानंतर आपल्या तिसऱया षटकात ब्रॉडने कॉर्नवाल (10) व केमार रोश (0) यांना चार चेंडूंच्या फरकाने बाद केले. नंतर त्याने डॉरिचला (37) बाद करून सहावा बळी नोंदवत विंडीजचा डावही संपुष्टात आणला आणि आपल्या संघाला मोठी आघाडी मिळवून दिली. विशेष म्हणजे ब्रॉडला पहिल्या कसोटीत वगळण्यात आले होते, त्यावेळी त्याने नाराजीही व्यक्त केली होती. विंडीजने तो सामना जिंकून आघाडी घेतली होती. दुसऱया कसोटीत संधी मिळाल्यावर त्याने दोन्ही डावात प्रत्येकी 3 बळी टिपले तर या कसोटीत त्याने फलंदाजीत 45 चेंडूत 62 धावा फटकावल्या आणि आता 6 बळी मिळविले. पाच किंवा त्याहून जास्त बळी मिळविण्याची त्याची ही 18 वी वेळ आहे. कसोटीत त्याने 497 बळी टिपले असून या सामन्यात पाचशेचा टप्पा गाठण्याची त्याला संधी आहे.

संक्षिप्त धावफलक : इंग्लंड प.डाव 369, विंडीज प.डाव 65 षटकांत सर्व बाद 197 : कॅम्पबेल 32, होप 17, ब्लॅकवुड 26, होल्डर 46, डॉरिच 37, कॉर्नवाल 10, अवांतर 15. गोलंदाजी : अँडरसन 2-28, ब्रॉड 6-31, आर्चर 1-72, वोक्स 1-57. इंग्लंड दु.डाव (33 षटकाअखेर) बिनबाद 110 : बर्न्स खेळत आहे 5 चौकारांसह 46, सिबली खेळत आहे 7 चौकारांसह 56.

Related Stories

फुटबॉल सम्राट पेलेच्या विश्वविक्रमाशी छेत्रीची बरोबरी

Patil_p

बेदीची रुग्णालयातून सुटका

Patil_p

मयांक-केएल राहुलची 183 धावांची सलामी!

Patil_p

ऑस्ट्रेलियाविरुद्ध निश्चितपणाने खेळेन

Patil_p

टेबल टेनिस फेडरेशनची बैठक शनिवारी

Amit Kulkarni

वॉर्नने निवडलेल्या भारतीय संघाचा गांगुली कर्णधार

Patil_p
error: Content is protected !!