तरुण भारत

कोरोना लक्षणरहितांचेच विलक्षण आव्हान

कोणतीही लक्षणे नसलेलाही कोरोना पॉझिटिव्ह असून तो वाहक ठरू शकतो.असे असतानाही उत्सवप्रेमी कोकण रेल्वे सुरू करावी यासाठी मागणी करत असल्याची बाब हास्यास्पद ठरते.

आतापर्यंत कोरोनाबाबतची आवश्यक ती जागरुकता आपल्यात आली असे म्हणण्यास वाव नाही. कोरोनाबाबत अनेकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. हा आजार म्हणजे काय, त्याची लक्षणे कशी ओळखायची, त्यावरील उपचार असे बरेच काही तोंडपाठ झाले आहे. मात्र आजार लक्षणे दिसली तर समजणार का, लक्षणेच दिसून आली नाहीत व तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह आहात अशावेळी काय करणार, असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. कोरोना संसर्गाचे कम्युनिटी स्प्रेडमध्ये रूपांतरित झाल्याचे कोणीही तज्ञ कबूल करत नाहीत. वाढती आकडेवारी लक्षणविरहित रुग्णांचा वावर गंभीरतेने अधोरेखित करत आहे. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. यात सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागाची आवश्यकता आहे.

कोरोना मृत्यू विश्लेषण समितीप्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, सध्या मुंबईतील लक्षणविरहित कोरोना रुग्णांची संख्या 10 ते 11 हजार एवढी आहे. मुंबईत 22 ते 23 हजार ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. म्हणजेच ऍक्टिव्ह रुग्णातील 50 टक्के लक्षणरहित रुग्ण आहेत. याहून गंभीर बाब म्हणजे पाच ते सहा हजार जणांना ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याची जाणीव नसेल, असाही संशय तज्ञ व्यक्त करत आहेत. आजाराची लक्षणे न दिसणारे म्हणजेच असिम्प्टोमॅटिक कोरोनाग्रस्त मोठय़ा प्रमाणावर आढळत आहेत. असिम्प्टोमॅटिक कोरोनाग्रस्त म्हणजे असे रुग्ण जे पॉझिटिव्ह आहेत. मुंबईत सध्या कोरोनाला उतरती कळा लागली असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र मुंबईबाहेर राज्यात सध्या कोरोना रुग्ण दररोज दहा हजारांच्या संख्येत आढळत आहेत. एका बाजूला चाचण्यांमध्ये आपण देशात पुढारलेले असून त्यातून दररोज सात ते नऊ हजार रुग्ण आढळत आहेत. मात्र या चाचण्या फक्त लक्षण दिसणाऱया रुग्णांची केली जात आहेत.

लक्षणे काहीच नाहीत मात्र पॉझिटिव्ह असल्यास अशा रुग्णांबाबत काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र तपासणीसाठी पुढे न येणाऱयांची संख्याही लक्षणीय असल्याची माहितीही मिळत आहे. तरीही भीती नसावी, आरोग्य यंत्रणेकडून लक्षणरहित असलेल्या व्यक्तीच्या जवळच्या संपर्कातील 12 ते 15 जणांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग नियमित केले जात आहे. मात्र असे फक्त समोर आलेल्या लक्षणरहित व्यक्तींबाबत होत आहे. जे लक्षणरहित व्यक्तीसमोर आले नाहीत अशांचे काय हा मुद्दा कळीचा असून, यावर कोणाकडेही उत्तर नाही. लक्षणरहित पण कोरोनावाहक असलेल्या व्यक्तीला शोधणे कठीण आहे. यावर सार्वजनिक आरोग्य विभागाने  सुचवलेल्या कोरोनाच्या गाईड लाईन्स तंतोतंत पाळणे एवढेच महत्त्वाचे ठरत आहे. कोणत्याही आजाराची लक्षणे दिसली की त्यावर उपचार करणे सोपे जाते. एखाद्या आजाराच्या जवळची लक्षणे आढळल्यास त्या त्या आजाराची प्रतिबंधात्मक औषधे घेऊन आजार दूर केला जातो. लक्षणे दिसून आल्यास उपचाराची दिशाही ठरते. आतापर्यंत सुरू असलेल्या या उपचार पद्धतीला कोरोनाने मात्र छेद दिला आहे. कोरोना सार्स आजार समूहातील असून त्याची साधारण लक्षणे सर्दी-ताप व पडशाप्रमाणेच आहेत. फार क्वचित जणांना जुलाबाचा त्रास होतो. जुलाबसुद्धा पावसाळ्यातील ठरलेला आजार असून त्याकडे पहिल्याच पातळीवर कोरोना म्हणून पाहणे चुकीचे ठरू शकते. मात्र दुर्लक्ष करूनही चालणारे नाही. हे झाले लक्षण दिसून आलेल्या सिम्प्टोमॅटिक कोरोना रुग्णांची चाचणी. याना क्वारंटाईन करून लक्षणे पडताळणीसाठी निरीक्षणाखाली ठेवलेही जाते.

लक्षणरहित रुग्णांचा मुद्दा कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून गंभीर झाला आहे. कोरोना विषाणू प्रकरणातील 80 टक्के प्रकरणे संक्रमणाची लक्षणे दिसून आली नसल्याची चिंताजनक बाब इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)चे  ज्येष्ठ शास्त्रज्ञ रमण गंगाखेडकर यांनी एप्रिलमध्येच व्यक्त केले होते. 80 टक्के जणांमध्ये संक्रमणाची लक्षणे नसल्याने पुढील कॉन्टॅक्ट ट्रेसिंगला वाव मिळाला नाही, असे स्पष्ट मत त्यावेळीच तज्ञांनी मांडले होते. याच कालावधीदरम्यान आगामी एखादा कोरोना लक्षणरहित मृत्यू असल्यास कोरोनाचाही असू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली होती. सध्या काही प्रकरणात अशा बाबीही समोर आल्या आहेत. अशावेळी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग हा एकमेव पर्याय उरतो. मात्र सध्या असेही दिसून आले की कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करूनही रुग्णांचे सापडणे हे ट्रेसिंगच्या अंदाजावर नव्हते. याचाच अर्थ असा की काही पॉझिटिव्ह आहेत मात्र त्यांना कोरोना असल्याची माहितीही नाही असे किती तरी जण समाजात सध्या कोरोनाचे वाहक होऊन फिरत आहेत. यावर आरोग्य विभागने दिलेली मार्गदर्शक तत्त्वे पाळणे आवश्यक आहे. सोशल डिस्टंसिन्ग, मास्क आणि साबणाने हात-पाय धुणे हे नियम पाळले गेले पाहिजेत. तुम्ही लक्षणरहित असा किंवा पॉझिटिव्ह असा हे नियम पाळून कोरोनाला आपण पळवून लावू शकतो.

सध्याच्या वाढत्या कोरोना रुग्णांच्या नोंदीकडे सरकारनेही गंभीरपणे लक्ष देणे आवश्यक असून निव्वळ लक्षणरहित रुग्णगटाबाबत आताच तपासणी रणनीती ठरवावी असे वाटत आहे. लक्षणरहित रुग्णांच्या संपर्कातील 12 ते 15 जणांना सध्या ट्रेस करत असले तरीही त्यापलीकडे जाऊन उपाययोजनेची आवश्यकता आहे. त्याचवेळी सर्वसामान्यांनी कडक सोशल डिस्टंसिन्ग पाळणे गरजेचे आहे.  यासाठी तुमची-आमची सर्वांच्याच सहकार्याची खरी गरज निर्माण झाली आहे. लक्षणरहितांबाबत अशी स्थिती असतानाही उत्सवप्रेमीनी कोकण रेल्वे सुरू करण्याची मागणी हास्यास्पद ठरत आहे. भीतीतून जागरूकता आली असली तरी अंगवळणी पडण्यास उशीरही होता काम नये.

राम खांदारे

Related Stories

जानकीनिमित्तें सुरकैवारा

Patil_p

मजनू उस्मानाबादी

Patil_p

‘राष्ट्र प्रथम’ हे मानणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

Patil_p

धोका आजही

Patil_p

लॉकडाऊनचे गांभीर्य कळतंय पण वळत नाही

Patil_p

मंत्रिपदाच्या नाराजीने आ.दीपक केसरकरांचीच कोंडी

Patil_p
error: Content is protected !!