तरुण भारत

कोल्हापुरात कोरोना पॉझिटिव्ह सांगलीत निगेटिव्ह

आरोग्य यंत्रणेचा भोंगळ कारभार : चिकुर्डेतील घटना

कुरळप/महादेव पाटील

चिकुर्डे (ता. वाळवा) येथील ८० वर्षीय वृद्ध महिलेचा कोरोना चाचणी अहवाल कोल्हापुरात पॉझिटिव्ह आला तर त्याच महिलेचा अहवाल सांगलीमध्ये निगेटिव्ह मिळाला. एकंदरीत या प्रकाराने खासगी आरोग्य यंत्रणेचा भोंगळ कारभार समोर आला असून चिकुर्डे सह परिसरातून अशा आरोग्य यंत्रणेच्या कारभारावरती प्रश्नचिन्ह निर्माण करून नाराजी व निषेध व्यक्त होऊ लागला आहे.

येथील बाजार गल्लीत रहात असलेल्या एका ८० वर्षीय महिलेला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल काल, सोमवारी (दि.२७) प्राप्त झाला असल्याची माहिती चिकुर्डे आपत्कालीन समितीच्या वतीने देण्यात आली होती. संबंधित महिला गेली पाच दिवसापासून दम्याच्या आजाराने त्रस्त होती. त्यामुळे महिलेच्या कुटुंबियांच्या कडून त्यांना कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना संबंधित महिलेचा कोरोना चाचणी तपासण्यात आली. तपासणीअंती या महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. संबंधित महिलेवरती कोरोना उपचार करणे गरजेचे असल्याचे कोल्हापुरातील खासगी रुग्णालयाकडून सांगण्यात आले. कोरोना झाल्याचे निष्पन्न होताच कुटुंबीय भयभीत झाले होते.

एकंदरीत ही वयस्कर महिला कोरोना होण्याचे नेमके कारण संभ्रमीत करणारे होते. कारण ही महिला ८० वर्षाची वृद्ध असल्याने त्यांचे बाहेर फिरणे अजिबातच नव्हते. त्यामुळे कुटुंबियांचा सुरुवातीला यावरती विश्वासच बसला नाही. परंतु रुग्णालयाकडून चाचणी अहवाल कोरोना मिळाला असल्याचे ठामपणे सांगण्यात आल्याने कुटुंबियांनी त्यावरती विश्वास ठेवून उपचाराची तयारी दर्शवली होती. दरम्यानच्या काळात संबंधित कुटुंबीयांच्या नजीकच्या काही लोकांच्या कडून वृद्ध आजींना सांगली येथील रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर संबंधित महिलेच्या कुटुंबियांनी सांगली येथे उपचारासाठी दाखल केले. सांगली येथील रुग्णालयात कोल्हापूर येथे कोरोना पॉझिटिव्ह आले असल्याचे सांगण्यात आले होते. असे असतानाही सांगली येथील रूग्णालयात पुन्हा संबंधित महिलेचा कोरोना चाचणी अहवाल तपासण्यात आला. मंगळवार दिनांक २८ रोजी कोरोना चाचणी अहवाल सांगली येथील रुग्णालयाच्या हातात मिळताच त्यांच्याकडून आश्चर्य व्यक्त करण्यात आले. त्यांनी आजी कोरोना पॉझिटिव्ह नसून त्या कोरोना निगेटिव्ह असल्याचे स्पष्टपणे सांगितले.

सांगली येथील रुग्णालयातील डॉक्टरांच्या कडून संबंधित अहवाल कुटुंबीयांच्याकडे सोपवण्यात आला आहे. रुग्णाला आता जनरल वॉर्डमध्ये दम्याच्या आजारावरती उपचार सुरू करण्यात आले आहेत. एकंदरीत या प्रकाराने चिकुर्डे सह परिसरात खाजगी रूग्णालयांच्या या भोंगळ कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आला असून रुग्णालयातील फसवणुकी संदर्भात उलट सुलट चर्चा सुरू झालेल्या आहेत.

सोमवार दिनांक २७ रोजी संबंधित महिला कोरणा पॉझिटिव्ह मिळाली असल्याची वार्ता परिसरात तात्काळ पसरली. प्रशासनाकडूनही यावरती तत्परता दाखवून चिकुर्डे येथील बाजार गल्ली पूर्णतः सील करण्यात आली होती. गावातील पहिलाच रुग्ण पॉझिटिव्ह सापडल्यामुळे गावांमधील वातावरणही भयभीत स्वरूपाचे बनले होते. सोमवार तसेच मंगळवार या दोन दिवस तालुका प्रशासनातील अधिकारी यांच्याकडूनही गावाला भेटी देऊन सुरक्षा व उपाय योजना संदर्भात कार्यप्रणाली राबविण्यात आली होती.

परंतु मंगळवार दिनांक २८ रोजी सायंकाळी संबंधित महिलेचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला असल्याचे समजल्यानंतर खाजगी रूग्णालयाच्या कारभारात चाललेल्या फसवणुकी संदर्भात लोकांच्या कडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. चुकीचा अहवाल देऊन कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयाने प्रशासनाची दमछाक तसेच संबंधित कुटुंबाची फसवणूक केली असल्याचेही तक्रारी व्यक्त होऊ लागले आहेत. या बरोबरच चिकुर्डे गावाने आजपर्यंत कोरोनाच्या संदर्भात अनेक उपाययोजना केल्या असताना आमच्या गावाचे नाव बदनाम झाले असल्याचेही नागरिकांच्यातून तीव्र संताप व्यक्त होऊ लागले आहेत. कोल्हापूर येथील अशा खाजगी रुग्णालय वरती कारवाई होणे गरजेचे असल्याचे मागणी नागरिकांच्या कडून होवू लागली आहे.

Related Stories

सातारा जिल्हय़ात आता होम आयसोलेशन; 148 बाधित, 90 मुक्त

Abhijeet Shinde

मिरज पंचायत समितीच्या प्रभारी सभापतीपदी दिलीप पाटील

Abhijeet Shinde

सांगली : विजयनगर येथे वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

Abhijeet Shinde

सातारा : कोरोनासंसर्ग वाढीसह मृत्यूदराचा आलेख खाली

Abhijeet Shinde

कोल्हापूर : दुपारपर्यंत 80 कोरोना बाधितांची भर, शहरातील 60 जण

Abhijeet Shinde

डॉ. आमोद गडीकरांची अखेर बदली

Patil_p
error: Content is protected !!