तरुण भारत

6 आठवडय़ात कोरोना बाधितांचे प्रमाण दुप्पट

आपत्कालीन समिती लवकरच स्थापन करण्याची डब्ल्यूएचओची घोषणा : जगभरात आतापर्यंत 1 कोटी 66 लाख रुग्ण

जगभरात कोरोना विषाणूची बाधा आतापर्यंत 1 कोटी 66 लाख 72 हजार 258 जणांना झाली आहे. यातील 1 कोटी 02 लाख 62 हजार 971 बाधितांना संसर्गापासून मुक्तता मिळाली आहे. तर 6 लाख 57 हजार 264 बाधित दगावले आहेत. 6 आठवडय़ांमध्ये जगात बाधितांचा आकडा दुप्पट झाला आहे. महामारीसंबंधी गुरुवारी आपत्कालीन समिती स्थापन केली जाणार असल्याची घोषणा जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस गेबेयेसस यांनी केली आहे. विषाणूप्रकरणी जागतिक आणीबाणीच्या घोषणेला गुरुवारी 6 महिने पूर्ण होतील. डब्ल्यूएचओने 30 जानेवारीला आरोग्य आणीबाणी घोषित केली होती.

Advertisements

ब्राझील : 614 बळी

ब्राझीलमध्ये दिवसभरात 23 हजार 284 नवे बाधित सापडले असून 614 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत 24,46,397 बाधित आढळून आले असून 87,737 जण दगावले आहेत. अमेरिकेनंतर ब्राझीलमध्ये सर्वाधिक कोरोना संसर्ग पसरला आहे. ब्राझीलमध्ये अद्याप नव्या रुग्णांचा आकडा अधिक असला तरीही तो स्थिरावू लागला आहे.

चिलीचा महत्त्वाचा निर्णय

कोरोनाबाधिताच्या अंतिम काळात त्याच्या कुटुंबीयांना सोबत राहू देण्याचा निर्णय चिलीच्या रुग्णालयांनी घेतला आहे. जगभरात कोरोना संसर्ग फैलावण्याच्या भीतीने रुग्णाला त्याच्या कुटुंबीयांची भेट घेता येत नाही. चिलीमध्ये 3.40 लाखाहून अधिक बाधित सापडले असून 9,187 जणांचा मृत्यू ओढवला आहे. चिलीमध्ये कोरोना संसर्ग मोठय़ा प्रमाणात पसरल्याने आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला आहे.

चीन : दुसऱया लाटेचा धोका

चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना संसर्गाचा धोका वाढू लागला आहे. तेथे दिवसभरात 68 कोरोनाबाधित सापडले असून यात 34 लक्षणेरहित रुग्णांचा समावेश आहे. तर एक दिवसापूर्वी 61 रुग्ण आढळून आले आहेत. मे आणि जून महिन्यात चीनमधील कोरोनाचा संसर्ग जवळपास थांबला होता. मागील 24 तासांत 16 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. 391 रुग्णांवर अद्याप उपचार सुरू आहेत. यातील 20 जणांची प्रकृती गंभीर आहे. चीनमध्ये आतापर्यंत 83 हजार 569 बाधित सापडले असून 4634 जणांचा बळी गेला आहे.

इस्रायलमध्ये 2029 नवे रुग्ण

इस्रायलमध्ये मागील 24 तासांमध्ये 2,029 नवे रुग्ण सापडले आहेत. देशातील बाधितांचा एकूण आकडा 63 हजार 985 वर पोहोचला आहे. एका दिवसात 2 हजारांपेक्षा अधिक रुग्ण मिळण्याची ही तिसरी वेळ आहे. देशात आतापर्यंत 474 जणांचा मृत्यू झाला आहे. सरकारने सर्व नागरिकांना एक ऍप इन्स्टॉल करण्याचे आवाहन केले आहे. हा ऍप परिसरात फैलावलेल्या संसर्गाची माहिती देतो.

इजिप्तमध्ये संसर्ग घटला

इजिप्तमध्ये दिवसभरात 420 नवे रुग्ण आढळले आहेत. आरोग्य मंत्रालयानुसार 16 मेपासून एका दिवसात आढळून आलेल्या रुग्णांचे हे सर्वात कमी प्रमाण आहे. 16 मे रोजी 491 रुग्ण सापडले होते. देशात आतापर्यंत 92 हजार 482 कोरोनारुग्ण सापडले असून 4,652 जणांचा मृत्यू झाला आहे.

युएई : 264 नवे रुग्ण

संयुक्त अरब अमिरातमध्ये मागील 24 तासांमध्ये 264 नवे बाधित सापडले आहेत. याचबरोबर देशातील रुग्णसंख्या 59 हजार 177 झाली आहे. नव्याने आढळलेल्या बाधितांची प्रकृती स्थिर आहे. 24 तासांमध्ये 328 रुग्ण बरे झाले आहेत. देशात आतापर्यंत एकूण 52 हजार 510 रुग्ण बरे झाले आहेत. तर 345 जणांना जीव गमवावा लागला आहे.

तुर्कस्तानात 5 हजार बळी

तुर्कस्तानात दिवसात 919 नवे रुग्ण सापडले आहेत. देशातील रुग्णांचे प्रमाण आता 2 लाख 27 हजार 19 झाले आहे. कोरोना संसर्गामुळे आतापर्यंत 5,630 जणांना स्वतःचा जीव गमवावा लागल्याची माहिती आरोग्यमंत्री फहरेतिन कोको यांनी दिली आहे. देशात आतापर्यंत 46 लाख 17 हजार 971 जणांची चाचणी करण्यात आली आहे.

2 आठवडय़ांत ‘शुभवार्ता’ मिळणार

कोरोनावरील उपचारासंबंधी डोनाल्ड ट्रम्प यांचे महत्त्वाचे विधान : संपूर्ण जगाचे असणार लक्ष

दोन आठवडय़ांमध्ये माझे प्रशासन कोविड-19 च्या उपचाराशी संबंधित चांगली बातमी देणार असल्याचे उद्गार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काढले आहेत. तत्पूर्वी अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टीटय़ूट ऑफ हेल्थने कोविड-19 लसीच्या चाचणीचा तिसरा टप्पा सुरू झाल्याचे सोमवारी म्हटले होते. ही लस मॉडर्ना या बायोटेक्नॉलॉजी कंपनीने विकसित केली आहे. या लसीची 30 हजार स्वयंसेवकांवर चाचणी केली जात आहे.

मॉडर्ना कंपनी लस सादर करण्याच्या अत्यंत नजीक आहे. लसीच्या चाचणीकरता अमेरिकेच्या बायोमेडिकल ऍडव्हान्स्ड रिसर्च अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीने मॉडर्ना कंपनीला अतिरिक्त 472 दशलक्ष डॉलर्सची मदत केली आहे. तत्पूर्वी कंपनीला एप्रिलमध्ये अमेरिकेच्या प्रशासनाकडून 483 दशलक्ष डॉलर्सचा निधी प्राप्त झाला होता. मॉडर्नाची लस लोकांच्या रोगप्रतिकारकशक्तीत वाढ करत असल्याचे पहिल्या टप्प्यात दिसून आले आहे. तसेच ही लस दिल्यावर स्वयंसेवकांमध्ये कुठल्याही प्रकारचे गंभीर दुष्परिणाम दिसून आलेले नाहीत.

अमेरिकेतील ज्या भागांमध्ये कोरोनाचा सर्वाधिक फैलाव झाला आहे, तेथेच ही चाचणी सुरू करण्यात आली आहे. मॉडर्ना लसीच्या चाचणीच्या पहिल्या टप्प्यात 45 स्वयंसेवकांचा सहभाग होता. या स्वयंसेवकांमध्ये कोरोनाशी लढण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढली होती. अमेरिकेतील 85 ठिकाणी या लसीची तिसऱया टप्प्यातील चाचणी घेतली जात आहे.

काही देशांमध्ये लस विकसित करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. जवळपास 13 लसी क्लीनिकल ट्रायलच्या टप्प्यात पोहोचल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक चीनच्या लसी मानवी चाचणीच्या टप्प्यात आहेत. चीनच्या 5, ब्रिटन 2, अमेरिकेत 3, रशिया आणि जर्मनी तसेच ऑस्ट्रेलियात प्रत्येकी एक लस क्लीनिकल चाचणीच्या टप्प्यात आहे.

Related Stories

वाळवंटात वसविले जाणार स्वप्नातील शहर

Patil_p

घोडय़ावरून रानोमाळ हिंडणारी आजी

Patil_p

म्यानमार स्थितीवर सुरक्षा परिषदेत चर्चा होणार

Patil_p

बीजिंग विमानतळावरून होणारी 1255 उड्डाणे रद्द

datta jadhav

केवळ सुटीसाठी एकाच मुलीशी चारवेळा विवाह

Patil_p

टीव्ही आणि खाणे

Patil_p
error: Content is protected !!