तरुण भारत

रामजन्मभूमीवर दहशतवादी हल्ला शक्य

केंद्रीय गुप्तचर विभागाने दिली माहिती : परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था केली जाणार

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

येत्या 5 ऑगस्ट या दिवशी अयोध्येतील रामजन्मभूमीवर भव्य राममंदिराचा भूमिपूजन समारंभ होणार आहे. साऱया देशाकडून आतुरतेने प्रतीक्षा केली जात असलेले हे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. मात्र, यावेळी पाकपुरस्कृत दहशतवाद्यांकडून मोठा दहशवादी हल्ला केला जाण्याची शक्यता गुप्तचर विभागाने व्यक्त केल्याने कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात येत आहे.

अनके वृत्त वाहिन्यांनी या संबंधींचे वृत्त प्रसारित केले आहे. लष्करे तोयबा ही दहशतवादी संघटना या हल्ल्याची तयारी करत असल्याचे गुप्तचरांचे म्हणणे आहे. रामजन्मभूमीवर भूमिपूजनादिवशीच हल्ला केल्यास भारतभर त्याचे तीव्र प्रतिसाद उमटून मोठय़ा प्रमाणावर हिंसाचार घडेल अशी दहशतवाद्यांची अपेक्षा असल्याचे वृत्त गुप्तचरांनी दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

प्रशिक्षित दहशतवाद्यांवर भरवसा

या हल्ल्याची सूत्रे पाकिस्तानमधून हलविली जाणे शक्य आहे. हल्ला घडवून आणण्यासाठी प्रशिक्षित दहशतवाद्यांची निवड केली गेली असून अत्यंत गुप्तपणे हालचाली सुरू झाल्या आहेत. रामजन्मभूमी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने गेल्यावर्षीच आदेश दिला होता. तेव्हापासूनच ही तयारी सुरू असल्याची माहिती गुप्तचरांच्या हाती लागल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

अनेक दहशतवादी संघटना

हा संभाव्य हल्ला केवळ एकाच दहशतवादी संघटनेकडून केला जाणार नाही. तर त्यात अनेक लहान-मोठय़ा दहशतवादी संघटना व उपसंघटनांचा समावेश असून शकतो. भारतातील स्थानिक दहशतवाद्यांचे सहकार्यही घेतले जाऊ शकते. त्यामुळे सर्व संशयितांवर बारकाईने लक्ष ठेवले जावे, अशी सूचना गुप्तचरांनी केली असल्याचे सांगण्यात येते. सरकारनेही हे प्रकरण गंभीररित्या घेतले आहे.

आरडीएक्सचा उपयोग शक्य

अतिघातक समजले जाणारे आरडीएक्स हे स्फोटक या हल्ल्यासाठी उपयोगात आणले जाऊ शकते. त्याचा साठा काही दहशतवाद्यांजवळ करून ठेवण्यात आला असण्याचीही शक्यता आहे. त्यादृष्टीने आता सरकारने पावले टाकण्यास प्रारंभ केला आहे.

विशेष सुरक्षा व्यवस्था

5 ऑगस्ट किंवा त्यापूर्वी अथवा त्यानंतरसुद्धा रामजन्मभूमी दहशतवाद्यांचे लक्ष्य राहील ही शक्यता गृहित धरून अयोध्या, उत्तर प्रदेश आणि साऱया देशभरातच हालचाली गेल्या जात आहेत. भूमिपूजनाच्या प्रसंगी सामाजिक अंतर व मुखावरण (मास्क) अनिवार्य करण्यात आले आहे, तसेच प्रत्येक अभ्यागताची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी तातडीचे उपाय केले जात आहेत.

Related Stories

योगी सरकार कडून मनरेगा मजूरांसाठी ६११ कोटी

prashant_c

स्वदेशी कोवॅक्सिनची अंतिम टप्प्यातील चाचणी सुरू

Patil_p

लॉक डाऊन कुठे कठोर आणि कुठे शिथिल करायचे हे राज्यांनी ठरवा, मोदींची मुख्यमंत्र्यांना सूचना

prashant_c

झारखंडमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

pradnya p

जम्मू काश्मीरमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

pradnya p

अहमदाबादमध्ये ‘हाउडी ट्रम्प’!

Patil_p
error: Content is protected !!