तरुण भारत

अव्वल प्रथमश्रेणी क्रिकेटपटू रजत भाटिया निवृत्त

17 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीची सांगता, वरिष्ठ स्तरावर संधी न मिळाल्याची खंत नसल्याचे प्रतिपादन

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

प्रथमश्रेणी क्रिकेटमधील अव्वल क्रिकेटपटू रजत भाटियाने बुधवारी सर्व क्रिकेट प्रकारातून आपली निवृत्ती जाहीर केली. 2014 मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करण्याच्या उंबरठय़ावर पोहोचणाऱया या दिग्गज खेळाडूने आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीबाबतीत काहीही खंत नसल्याचे नमूद केले.

40 वर्षीय रजत भाटियाने 2003-04 हंगामात तामिळनाडूतर्फे पदार्पण केले. पण, नंतर तो प्रदीर्घ काळ दिल्ली संघातर्फे खेळला. 2018-19 मध्ये त्याने नवोदित संघ उत्तराखंडला रणजी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत धडक मारुन दिली होती. दिल्ली क्रिकेटचा संघ अडचणीत असताना त्यांच्या मदतीला हमखास धावून येणारा खेळाडू, अशी ख्याती त्याने प्रामुख्याने मिळवली. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्याने 112 प्रथमश्रेणी सामन्यात 49.10 च्या सरासरीने 6482 धावा जमवल्या. शिवाय, 27.97 च्या सरासरीने 137 बळी घेतले. याशिवाय त्याने 119 लिस्ट ए व 146 टी-20 सामनेही खेळले. दिल्लीचा जन्म असलेल्या या खेळाडूने मागील हंगामात बांगलादेशमध्ये लिस्ट ए क्रिकेट खेळले होते.

‘मी मागील वर्षीच निवृत्तीचा निर्णय घेतला होता. मी येथे प्रथमश्रेणी क्रिकेट खेळत नव्हतो. नंतर समालोचन सुरु केले. पुढे बांगलादेशमध्ये व्यावसायिक क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. मात्र, कोरोनामुळे तेथे व्यावसायिक खेळाडूंशी करार थांबवले गेले. त्यामुळे, निवृत्तीसाठी हीच योग्य वेळ ठरते’, असे रजतने आपल्या निर्णयाविषयी बोलताना नमूद केले.

रजत भाटिया 2014 मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याच्या उंबरठय़ावर पोहोचला. त्यावेळी टी-20 विश्वचषक संभाव्य संघात त्याचा समावेश झाला होता. अर्थात, भारतीय संघात संधी मिळाली नाही, याची खंत वाटत नाही, असे त्याने म्हटले आहे. ‘मी माझ्या कारकिर्दीचा या पद्धतीने विचार करु इच्छित नाही. तसे केल्यास तो माझ्या कारकिर्दीवर मीच केलेला अन्याय ठरेल. जे मानसन्मान माझ्या वाटय़ाला आले, त्याबद्दल मी समाधानी आहे’, असे रजत पुढे म्हणाला.

प्रथमश्रेणी क्रिकेट खेळायला सुरुवात केली, तेव्हाचे व आताचे प्रथमश्रेणी क्रिकेट यामध्ये काय फरक जाणवतो, या प्रश्नावर त्याने सविस्तर विवेचन केले. तो म्हणाला, ‘प्रथमश्रेणी क्रिकेट सध्या भरपूर स्पर्धात्मक झाले आहे. त्याचे स्वरुप व रुपरेषा यात आमूलाग्र बदल झाले आहेत. पण, दुखापत व्यवस्थापनाच्या निकषात आपण अद्याप बरेच मागे आहोत. भारतात एखादा खेळाडू कारकिर्दीची सुरुवात करतो, त्यावेळी दुखापती होऊ नये, याकडेच त्याला अधिक लक्ष द्यावे लागते. अज्ञान हे मोठे कारण आहे. यासाठी आपल्या शारीरिक हालचाली समजावून घेणे अधिक महत्त्वाचे ठरते. बायो-मेकॅनिक्सच्या कोर्समुळे मला याची माहिती झाली आणि या ज्ञानाचा मी भविष्यात युवा खेळाडूंसाठी विनियोग करु इच्छितो’.

सचिनला तीनवेळा बाद केले, ते सर्वात मोठे यश

2007-08 हंगामात दिल्लीला रणजी स्पर्धेचे आणि 2012 मध्ये केकेआरला आयपीएलचे जेतेपद मिळवून देणाऱया संघात रजत भाटियाचा समावेश राहिला. मात्र, सचिन तेंडुलकरला कारकिर्दीत तीनवेळा बाद करता आले, हे तो सर्वात मोठे यश मानतो. रजतची आयपीएलमधील कारकीर्द 10 वर्षांची राहिली.

बायो-मेकॅनिक्सकडे लक्ष पुरवणार

रजतने हवाई येथील एका संस्थेतून बायो-मेकॅनिक्सचा कोर्स केला असून या क्षेत्रात पुढील कारकिर्दीत अधिक लक्ष पुरवण्याचा त्याचा विचार आहे. ‘मी सध्या दुसरा टप्पा पार केला असून आता तिसऱया टप्प्याकडे वळत आहे. गोलंदाजीत अनेक बायो-मेकॅनिक्स स्पेशालिस्ट आहेत. पण, प्रशिक्षणात नाही. मी खेळाडूंच्या हालचालींचा अभ्यास करुन त्यांची मदत करु शकतो’, असे त्याने म्हटले आहे.

Related Stories

रेस वॉकर केटी इरफानसह पाच ऍथलेट्स ‘पॉझिटिव्ह’

Amit Kulkarni

भारतीय फुटबॉलपटूकडून गरजू लोकांची सुटका

Patil_p

दिवगंत फुटबॉलपटू प्रँको यांना एएफसी प्रमुखांची श्रद्धांजली

Patil_p

चेपतेगेई, गिडे यांचा नवा विश्वविक्रम

Patil_p

पृथ्वी शॉचे कसोटी संघात पुनरागमन

Patil_p

काळय़ा फिती बांधून बापू नाडकर्णी यांना भारतीय खेळाडूंकडून आदरांजली

Patil_p
error: Content is protected !!