1.20 कोटीचे फसवणुकीचे प्रकरण
प्रतिनिधी / मडगाव
आयसीआयसीआय बँकेच्या आर्लेम शाखेचे तत्कालीन व्यवस्थापक गुल्शन गुसाई याचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करावा की फेटाळून लावावा यावर आज गुरुवारी न्यायालय आपला निर्णय देण्याची शक्यता आहे.
मडगावचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एडगर फर्नाडिस यांच्या न्यायालयात या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी चालू होती.
पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रानुसार मडगाव परिसरात राहणाऱया पै नावाच्या एका ग्राहकाच्या खात्यात असलेल्या एकूण रकमेपैकी या प्रकरणातील संशयितानी सुमारे 1.20 कोटी रुपयांची अफरातफर केल्याचा आरोप आहे. या प्रकरणासंबंधी धरपकड सुरु होणार असल्याचे संकेत मिळताच संशयित आरोपी गुल्शन गुसाई याने अटकपूर्व जामीन अर्ज मडगावच्या सत्र न्यायालयात सादर केला होता.
संशयित आारोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या 403 (मालमत्तेचा अप्रामाणिकपणे अपहार करणे), 406 ( मालमत्तेचा अप्रामाणिक अपहार केल्याप्रकरणी शिक्षा होणे), 409 (बँक व्यवसायिकाने केलेला फौजदारीपात्र गुन्हा), 418 (ज्या व्यक्तीचे हित जपण्याची जबाबदारी आहे त्या व्यक्तीला हानी पोहोचेल याची जाणीव असणे), 420 (जाणीवपूर्वक फसवणूक करणे), 468 (फसवणूक करण्याच्या उद्देशाने बनवाबनवी करणे), 471 (कागदपत्रे बनावट आहेत याची कल्पना असून ती कागदपत्रे खरी असल्याचे भासवून प्राधिकरणाकडे सादर करणे) या सारख्या कलमाखाली गुन्हा नोंद केलेला आहेत.