तरुण भारत

मित्रविंदेचा कृष्णाशी विवाह

भगवान श्रीकृष्ण हा भक्तवत्सल आहे. मित्रविंदेच्या मनातील आर्त भावना त्याने जाणली. त्यामुळे त्याचे चित्त द्रवले. मग त्याने काय केले ते पहा. राजाधिदेवी ही कृष्णपिता वसुदेवाची धाकटी बहीण होय. तिचा विवाह राजा जयत्सेन याच्या बरोबर झाला होता. मित्रविंदा ही राजाधिदेवीची कन्या होय. ती प्रेमाने कृष्ण शरण आली होती व कृष्णाशीच विवाह करू इच्छित होती. अशावेळी तिचे बंधू विंद व अविंद यांनी खोडा घातला होता. रुक्मिणीच्या लग्नाच्या वेळी तिचा भाऊ रुक्मी याने जसा कृष्णाला विरोध केला होता, तसाच विरोध आता विंदाविंद करीत होते. त्यामुळे कृष्णाने मनोमन असा निश्चय केला की आपण अचानक मित्रविंदेच्या विवाह प्रसंगी धाड घालून मित्रविंदेला पळवून आणावी. त्याप्रमाणे त्याने दारुकाला रथ सज्ज करण्याची आज्ञा केली व तो अवंतिका नगरीत पोहोचला. इकडे मित्रविंदेच्या स्वयंवराच्या सोहळय़ासाठी सर्व राजे जमले. नटवून थटवून वधूला तिथे आणण्यात आले. मित्रविंदेच्या सख्या तिच्यासमोरील एक एक राजाच्या पराक्रमाचे, ऐश्वर्याचे वर्णन तिच्यापाशी करत होत्या. पण हिने मात्र मनोमन कृष्णालाच वरले होते. याचवेळी अचानक हत्तींच्या कळपात शिरून सिंह जसे आपले सावज पळवून नेतो, तसे कृष्णाने त्या राजांच्या कळपात शिरून मित्रविंदेला पळवली. कृष्णाने दोन्ही हातांनी वधूला उचलले व तिला घेऊन तो निघाला. राजांमध्ये एकच खळबळ उडाली. ते एकदम घाबरले.

घ्या घ्या म्हणोनि उठिले एक । एक म्हणती पहा कौतुक ।एक म्हणती यदुनायक। मागधप्रमुखनिर्जेता। भो भो राया कौरवप्रवरा । पाहता असतां भूभुजचक्रा।  चक्रपाणि सुचारुवत्रा। वाहूनि रहंवरा निघाला । आस्फुरिला पाञ्चजन्य । तेणें दणाणिलें त्रिभुवन।  नृपचक्राचा भंगला मान। जाले म्लानमुख अवघे। कोण्ही न करिती पाठिलागा। अवलंबूनियां निजपुरमार्गा ।  भूपतीफिरोनि गेले मागां । वरी श्रीरंगा यशोलक्ष्मी । मित्रविंदा वाहूनि रथीं। द्वारके आला कमलापति ।  ऐकूनि वधू हरणाची ख्याति। यादव गर्जती जयघोषें ।पितृष्वसेची तनया ऐसी । कृष्णें हरिली लावण्यराशि।  द्वारकेमाजि यथाविधीसीं । लग्न सुदिवसीं लावियलें । नित्यनोवरा द्वारकाधीश । वऱहाडी यादव निर्जरअंश। रूपें धरूनियां बहुवस । वरी कृष्णास यशोलक्ष्मी । मित्रविंदेला पळवून नेणारा कृष्ण आहे हे उपस्थित राजांनी पाहिले. याच कृष्णाने मागे महापराक्रमी मगधाधिपती जरासंधाचा अनेक वेळा पराभव केलेला आहे हे ते जाणून होते. कृष्णाच्या सुदर्शन चक्राला ते घाबरत होते. त्यांनी विरोध करण्याचे धाडस केले नाही किंवा कृष्णाचा पाठलागही केला नाही. कृष्णाने सौंदर्यवान मित्रविंदेला द्वारकेत आणली. सर्वांना अत्यंत आनंद झाला. मग त्या दोघांचे थाटात लग्न लागले. मित्रविंदा ही कृष्णाची पाचवी पत्नी होय. त्यानंतर महामुनी शुकदेव कृष्णाच्या सहाव्या लग्नाची कथा सांगायला प्रारंभ करतात. राया परिसें परीक्षिति । कोशलदेशीं अयोध्यापति।  नग्नजिन्नामा पैं भूपति। स्वधर्ममूर्ति धार्मिक जो । तयाची कन्या सुभगा सत्या। नाग्नजिती जे पितृनामता ।

तिचिया स्वयंवरसंकेता । नृपें तत्वता पण केला ।

Related Stories

विचार रत्नाकर!

Patil_p

हत्तीमुखी गणपती पूजन परंपरा

Patil_p

अमेरिकेत कोरोनाचे महाभयंकर संकट

Patil_p

दुर्वासाच्या पाठी सुदर्शन

Patil_p

शेतकऱयांचे ऐका

Patil_p

नागरिकता सुधारणा कायदा (सीएए) : मूळ कारण व काही शंका

Patil_p
error: Content is protected !!