तरुण भारत

पहिल्या वनडेत इंग्लंडचा आयर्लंडविरुद्ध विजय

रॉयल लंडन मालिकेत विजयी आघाडी : पुनरागमनवीर डेव्हिड विलीचे 30 धावात 5 बळी

साऊदम्प्टन / वृत्तसंस्था

Advertisements

डेव्हिड विलीने पुनरागमनात 5 बळी घेण्याचा पराक्रम गाजवल्यानंतर यजमान इंग्लंड संघाने शुक्रवारी तुलनेने दुबळय़ा आयर्लंड संघाचा 6 गडी राखून फडशा पाडला आणि रॉयल लंडन सिरीजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली. एजिस बॉल येथे झालेल्या या पहिल्या लढतीत विलीच्या (5-30) भेदक गोलंदाजीमुळे आयर्लंडचा डाव 44.4 षटकात सर्वबाद 172 धावांमध्ये गुंडाळला गेला व प्रत्युत्तरात इंग्लंडने पडझड झाली तरी त्यातून सावरत 22.1 षटकांचा खेळ बाकी राखत विजय संपादन केला.

विजयासाठी 173 धावांचे किरकोळ आव्हान असताना इंग्लिश संघाची देखील 4 बाद 78 अशी दाणादाण उडाली होती. पण, सॅम बिलिंग्जने (54 चेंडूत नाबाद 67) इऑन मॉर्गनच्या साथीने 96 धावांची अभेद्य भागीदारी साकारत विजय संपादन करुन दिला.

आयरिश फलंदाजांची दाणादाण

तत्पूर्वी, स्वच्छ सुर्यप्रकाशात प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर आयर्लंड संघाचा जो धुव्वा उडाला, तो लक्षवेधी ठरला. अव्वल फलंदाज हजेरी लावून परतत राहिल्याने त्यांची 5 बाद 28 अशी दैना उडाली. केवळ आंतरराष्ट्रीय पदार्पणवीर कर्टिस कॅम्फरने 118 चेंडूत नाबाद 59 धावांची खेळी साकारल्यामुळे आयरिश संघाला आणखी नामुष्की टाळता आली. आश्चर्याची बाब म्हणजे कर्टिस कॅम्फरचा जन्म दक्षिण आफ्रिकेतील असून आईच्या पासपोर्टमुळे त्याला आयरिश संघातून खेळण्याची संधी मिळाली आहे.

विली नव्या चेंडूवर सातत्याने भेदक गोलंदाजी साकारण्यात यशस्वी ठरतो आणि याचीच प्रचिती येथील पहिल्या लढतीत आली. त्याने पॉल स्टर्लिंगला मिडविकेटकडे तर आयरिश कर्णधार ऍन्ड्रय़्रू बॅल्ब्रेनला ड्राईव्ह मारण्याच्या प्रयत्नात जॉनी बेअरस्टोकडे झेल देणे भाग पाडले. सकिब महमूदने हॅरी टेक्टरला जाळय़ात पकडले तर विलीने गॅरेथ डेलानी, लॉर्कन टकर यांना सलग दोन चेंडूंवर चीत केले. यापैकी टकरला बाद देण्याचा निर्णय रिव्हय़ू घेतला गेल्यानंतर रिप्लेनुसार बदलण्यात आला.

कॅम्फरच्या समयोचित खेळीत केवळ 4 चौकार होते. पण, दुसऱया बाजूने सहकारी फलंदाज ठरावीक अंतराने बाद होत राहिल्याने त्याने धावफलक सातत्याने हलता ठेवण्यावर भर दिला. विलीनेच शेवटचा फलंदाज क्रेग यंगला मिडऑफकरवी बाद करत आयर्लंडचा डाव संपुष्टात आणला होता.

संक्षिप्त धावफलक

आयर्लंड : 44.4 षटकात सर्वबाद 172 (कर्टिस कॅम्फर 118 चेंडूत 4 चौकारांसह नाबाद 59, अँडी मॅकब्रिन 48 चेंडूत 3 चौकार, 1 षटकारासह 40, केव्हिन ओब्रायन 36 चेंडूत 22, डेलानी 16 चेंडूत 22. अवांतर 10. डेव्हिड विली 8.4 षटकात 5-30, सकिब महमूद 2-36, अदिल रशिद, टॉम करण प्रत्येकी 1 बळी).

इंग्लंड : 27.5 षटकात 4 बाद 174 (सॅम बिलिंग्ज 54 चेंडूत 11 चौकारांसह नाबाद 67, इऑन मॉर्गन 40 चेंडूत नाबाद 36. अवांतर 9. क्रेग यंग 2-56, मॅकब्रिन, कॅम्फर प्रत्येकी 1 बळी).

Related Stories

रियल माद्रीदचा मिलीटो कोरोना बाधित

Patil_p

‘फिट इंडिया’ मोहिमेत किमान 10 कोटी लोकांचा सहभाग

Patil_p

नुरी-बेरेटीनी यांच्यात अंतिम लढत

Patil_p

मँचेस्टर युनायटेड क्लबसाठी पोग्बा, रेसफोर्ड उपलब्ध

Patil_p

वर्ल्ड चॅम्पियनशिपमधून जपानच्या मोमोटाची माघार

Amit Kulkarni

किदाम्बी श्रीकांत उपांत्य फेरीत, सिंधूचा पराभव

Patil_p
error: Content is protected !!