तरुण भारत

आगळं-वेगळं केरळ

कोरोना विषाणूचा देशातील पहिला रुग्ण जानेवारी महिन्यात केरळमध्ये आढळून आला होता. सध्या केरळमध्ये जवळपास 24 हजार लोक कोरोनाने संक्रमित आढळून आले आहेत. सध्या राज्यात साडेदहा हजार सक्रिय रुग्ण असून 13 हजार लोकांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तसेच आतापर्यंत केरळमधील 73 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाला रोखण्यासाठी आता केरळ सरकारने कंबर कसली आहे. मुख्यमंत्री पिनराई विजयन सरकारने कोरोनापासून बचाव करण्यासाठी पुढील एक वर्षाची पूर्वतयारी केली आहे. या एक वर्षात नागरिकांना नियमांचे पालन करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. नेहमी सतर्क आणि दक्ष असलेल्या केरळ राज्यातील काही रंजक बाबींचा घेतलेला हा आढावा…!

केरळ हे देशाच्या दक्षिण टोकाला असलेले राज्य आहे. कर्नाटक व तामिळनाडू या राज्यांच्या सीमा केरळला लागून आहेत. केरळच्या पश्चिमेला अरबी समुद्र व दक्षिणेला विस्तीर्ण हिंदी महासागर आहे. मल्याळम ही राज्याची प्रमुख भाषा आहे. भारताचे सर्वाधिक हिरवाईने नटलेले राज्य म्हणून केरळचा उल्लेख होतो. केरळची संस्कृती संमिश्र आणि विश्वव्यापी आहे. या राज्याला एक वेगळी ऐतिहासिक आणि भौगोलिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. ब्रिटिश काळापासूनच या राज्यांमध्ये ब्रिटिश शासकांनी शिक्षणाचा विकास केला त्याचबरोबर धर्माचा देखील प्रसार केला. यातून या ठिकाणी ख्रिश्चन धर्मियांची संख्या मोठी दिसते. ब्रिटिश काळातील चर्च हे या राज्याचे मुख्य वैशिष्ट आहे. या राज्याने आपली वेगळी संस्कृती जोपासलेली आहे. निसर्ग सौंदर्य या राज्याला लाभले असून पर्यटनाच्या दृष्टीनेही या ठिकाणाचा मोठा विकास झालेला आहे.

Advertisements

पर्यटनसमृद्ध राज्य…

भारताचे सर्वाधिक हिरवाईने नटलेले राज्य म्हणून केरळचा उल्लेख होतो. पर्यटनाबरोबरच येथील खाद्यसंस्कृतीही वैशिष्टपूर्ण आहे. पर्यटनाच्या बाबतीत केरळ हे भारतातील दुसऱया क्रमांकाचे राज्य असून सृष्टीसौंदर्य पाहायला व आयुर्वेदिक उपचारांसाठी देशातून तसेच जगभरातून हजारो प्रवासी केरळमध्ये येतात. केरवालम हे समुद्रकिनाऱयावरील प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. भगवान अयप्पांचे सबरीमला मंदिर हे प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. तिरूअनंतपुरम हे मंदिरे, मशिदी, चर्चेस यांचे शहर आहे. त्याच्या सभोवताली असलेली वेली लगुन, नेय्यर डॅम व पोनमुदी ही थंड हवेची ठिकाणे म्हणून ओळखली जातात. आदी शंकराचार्यांचे जन्मगाव कलाडी, गुरुवायुरचे श्रीकृष्ण मंदिर, मळमपुझा पालघाट (कासारगोड), एडक्केल गुहा (वायनाड) ही इतर काही प्रसिद्ध पर्यटनस्थळे आहेत. तसेच मुन्नार व पीरमाडे ही दोन केरळची प्रसिद्ध डोंगरी पर्यटनकेंदे आहेत. पालाकड जिल्हय़ात पेरियार नदीच्या काठावर साकारलेले केरळचे अतिशय आकर्षक असे वन्यप्राणी थेक्राडी अभयारण्य सर्वांनाच आकर्षित करते. तसेच मनंथवेकी, सुलतान, बथेरी व वायनाड येथील अभयारण्येही प्रसिद्ध आहेत.

साक्षरता, शहरीकरणात अव्वल…

केरळमध्ये साक्षरतेचे प्रमाण 100 टक्क्मयांच्या जवळपास आहे. त्यामुळे केरळात भारतातील सर्वाधिक शिक्षितांचे राज्य आहे. तसेच महिलांचे शिक्षणाचे प्रमाणही केरळमध्ये सर्वाधिक आहे. जगभरात आणि देशभरात या राज्यातील लोक मोठय़ा संख्येने शासकीय सेवेमध्ये मोठय़ा पदांवर कार्यरत आहेत. जगभरामध्ये केरळ मधील तरुण हे आयटी क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. एका सर्वेक्षणानुसार केरळ हे भारतातील सर्वात कमी भ्रष्ट राज्य आहे. मानव विकास निर्देशांकात केरळ सर्व भारतीय राज्यांमध्ये आघाडीवर आहे. तर सर्वात मोठा वाटा आखाती देशांच्या कमाईचा आहे. जर केरळमध्ये आखाती देशांचे रोजगार सोडले तर प्रचंड बेरोजगारी आहे. औद्योगिक क्रमवारीत केरळ देशात 12 व्या क्रमांकावर आहे. केरळमधील शहरीकरणाचा वेग प्रचंड आहे. 2001 ते 2011 दरम्यान केरळमध्ये 360 नवीन शहरे तयार केली गेली आहेत. केरळमधील बरेच लोक नोकरी-धंद्याच्या निमित्ताने परिवारापासून दूर विदेशात राहत असल्याने राज्यात आर्थिक समृद्धी गुण्यागोविंदाने नांदताना दिसते.

आखाती देशांशी जवळचे नाते…

केरळने गेल्या काही वर्षांमध्ये मोठय़ा प्रमाणावर स्थानिक लोकांचे स्थलांतर पाहिले आहे. कामाच्या निमित्ताने केरळमधून आखाती देशात कामासाठी जाण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. आखाती देशांमध्ये केरळमधील लोकांचे जाळे मजबूत आहे. प्रत्येकाचे नातलग तेथे आहेतच. संयुक्त अरब अमिरातीमध्ये केरळीयन मोठय़ा संख्येने राहतात. या केरळीयन लोकांची युएईच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण भूमिका आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या 2015 च्या आकडेवारीनुसार 7 लाख 81 हजार लोक कामानिमित्त परदेशात गेले होते. त्यातील 90 टक्केहून अधिक लोक सौदी अरेबिया, युएई, बहरेन, कुवैत, कतार आणि ओमान येथे गेले. इंडिया स्पेंडच्या अहवालानुसार भारतीयांनी विदेशातून पाठविलेल्या परकीय चलनात केरळचे सर्वाधिक योगदान आहे. यापैकी केरळचा वाटा जवळपास 40 टक्के आहे. तर पंजाब दुसऱया आणि तामिळनाडू तिसऱया क्रमांकावर आहे.

कृषी क्षेत्रामध्येही समृद्धी…

केरळातील अंदाजित 50 टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. नगदी पिके या राज्याचे प्रमुख वैशिष्टय़ समजले जाते. नारळ, रबर, काळी मिरी, वेलदोडे, आले, सुंठ, कोको, काजू, पोफळी (पाम), कॉफी व चहा या पिकांचे प्रमुख उत्पादक राज्य म्हणून ओळखले जाते. मसाल्याच्या वस्तूंच्या उत्पादनासाठीही केरळचे नाव घेतले जाते. चहाचे मळे उत्तम प्रतीचे असून ते पर्यटन सौंदर्यातही भर टाकतात.

चटकदार खाद्य संस्कृती…

पर्यटन विकासाच्या दृष्टीने केरळ राज्याला मोठी गती मिळाल्यामुळे येथील खाद्यसंस्कृती देखील वैशिष्टय़पूर्ण आहे. केरळात शाकाहारी व मांसाहारी दोन्ही अन्न प्रकारांचा समावेश होतो. मासे, कोंबडी आणि अन्य मांसप्रकार येथे खाल्ले जातात. मांसाहारी पदार्थांमध्येही येथे वैविध्य आढळते. मसाल्यांच्या पदार्थांचा वापर अन्न प्रक्रियेत मोठय़ा प्रमाणावर केला जातो. भात हा आहारातील महत्त्वाचा घटक आहे. येथे भोजनासाठी केळीच्या पानाचा वापर केला जातो. या जेवणाच्या शेवटी गोड खीर म्हणजे पायसम खाल्ली जाते. मधल्या वेळच्या खाण्याच्या चटकदार पदार्थात केळय़ाचे वेफर्सही आवडीने खालले जातात. चहासोबत केळीपासून तयार केलेली भजी आस्वादाने सेवन केली जातात.

सांस्कृतिक वारसा, सण-समारंभ…

केरळ हे विविध प्रकारच्या रंगीबेरंगी सण-उत्सवांचे माहेरघर आहे. ओणम हा केरळातील मुख्य सण असून धान कापणीच्या हंगामाशी या सणाचे नाते आहे. वल्लमकली किंवा होडय़ांची स्पर्धा हे केरळचे वैशिष्टय़ आहे. थ्रिसूर येथील वदक्कुमनाथ मंदिरातील विविध उत्सवही आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरतात. अतिभव्य हत्तीची मिरवणूक व अप्रतिम फटाका शो हे या सणाचे वैशिष्टय़ आहे. तिरूअनंतपुरमचे पद्मनाथस्वामी मंदिर हे दक्षिण भारतीय वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. भगवान अयप्पांचे सबरीमला मंदिर हे पथनामथिता जिल्हय़ातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. गुरूवायूर येथे वसलेले श्रीकृष्ण मंदिर तसेच श्रीराम मंदिर, विनायक मंदिर, शिव मंदिर, हनुमान मंदिर, अय्यप्पा मंदिर, मुरूगा मंदिर, भगवती मंदिर आदी मंदिरे केरळात पाहण्यासारखी आहेत. त्रिवेंद्रम जवळच्या हरिपाद गावाजवळ मन्नारसाला हे सर्प मंदिर असून इथे सर्प पूजा केली जाते. हा विधीही पाहण्याजोगा असतो.

अतिवृष्टी-महापुरावर यशस्वी मात…

भारतात सर्वात प्रथम केरळमध्ये मान्सून दाखल होता. त्यानंतर पुढे तो कर्नाटक-गोवा-महाराष्ट्रापासून काश्मीरपर्यंत दाखल होत असतो. ‘देवभूमी’ (God’s Own Country) नावाने प्रसिद्ध असलेल्या केरळला 2018 मध्ये अतिवृष्टीचा तडाखा बसला होता. महापुराच्या भीषण आपत्तीत 750 पेक्षा जास्त लोकांनी जीव गमावला आहे तर मालमत्तेचेही अतोनात नुकसान झाले होते. केरळमध्ये एकूण 41 मोठय़ा नद्या आहेत. या सर्व नद्या महापुराच्या काळात ओसंडून वाहत होत्या. अतिवृष्टीमुळे पूरस्थिती गंभीर होत असतानाच इडुक्की आणि इदमलयार अशा मोठय़ा धरणांतून विसर्ग वाढविल्यामुळे महापुराची स्थिती निर्माण झाली होती. या महापुरात राज्याच्या 20 हजार कोटी रुपयांहून अधिक नुकसानीचा अंदाज होता. शेती आणि शेतकऱयांचे नुकसानही प्रचंड होते. 45 हजार एकरहून अधिक क्षेत्रातील भातपीक पूर्णपणे मातीमोल झाले होते. शंभर टक्क्यांहून अधिक पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे दरवर्षीच केरळ अतिवृष्टी आणि महापुराच्या विळख्यात असते. मात्र, या नैसर्गिक आपत्तीवर लोक यशस्वीपणे मात करताना दिसतात.

Related Stories

मोदींचे मार्गदर्शन

Patil_p

व्यवस्थापनशास्त्रात मनोबल नेतृत्वावर अवलंबून

Patil_p

दिलासादायक घटना

Patil_p

कोविड रुग्णांना दिलासा मिळणार का?

Patil_p

निवडणुका अमेरिकेत, उत्सुकता भारतात

Patil_p

आर्सेलर मित्तल 2 हजार कोटी गुंतवणार

Patil_p
error: Content is protected !!