तरुण भारत

कोरोना काळात नात्याचे बंध पोस्टाने केले घट्ट

टाळेबंदीत पोस्टाने राख्या पाठविण्याकडे जास्त कल : वेगवान प्रक्रियेसाठी खास राख्या टपाल सेंटर सुरू

अजय कांडर / कणकवली:

Advertisements

कोरोनामुळे लॉकडाऊन पुकारले गेले आणि सणासुदीला एकत्र भेटणारी आपली माणसं आता कधी भेटतील, असं वाटत असतानाच दळणवळणाचाही प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे वाहतुकीच्या विविध आधुनिक सेवेतून बहिणीने भावाला राखी पाठविणेही कठीण होऊन बसले. मात्र कोरोनाच्या या काळात राखी बंधनाच्या नात्याचे बंध पोस्टामुळे घट्ट झाले. टाळेबंदीच्या काळात भावाला पोस्टाने राखी पाठविण्याकडे बहिणींचा वाढता कल दिसून आला. राखी टपालाच्या वेगवान प्रक्रियेसाठी मुंबई व नवी मुंबई येथे खास राखी टपाल सेंटर सुरू करण्यात आले आहे.

कोरोनाने गेली पाच महिने माणसांना जिथल्या तिथे जखडून ठेवले आहे. नागरिकांच्या फिरण्यावर निर्बंध आले. सणासुदीला एकमेकांना भेटणेही दूरापास्त झाले. रक्षाबंधनाच्या दिवसात भाऊ-बहिणींना भेटणे कठीण होऊन बसले आहे. अलिकडच्या काळात इतर आधुनिक पत्र वाहतुकीचा फायदा घेत राखी भावाला पाठविली जात होती. त्यामुळे पूर्वी पोस्टावर अवलंबून असणारी बहीण राखीसाठी इतर माध्यमांचाही वापर करू लागल्यामुळे भावाला खात्रीने राखी मिळणार, असा विश्वास असायचा. मात्र टाळेबंदीमुळे वाहतूक व्यवस्थेवर निर्बंध आले आणि हवी ती वेळेत पोहोचेलच, याची शाश्वती राहिली नाही. मात्र गेल्या काही दिवसात पोस्ट कार्यालयाने टाळेबंदीतही चांगली सेवा दिल्यामुळे राख्याही पोस्टामार्फत पाठविण्याकडे वाढता कल असल्याचे पोस्ट विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले.

पोस्ट विभागाशी संपर्क साधला असता असे सांगण्यात आले की, दरवर्षीपेक्षा यावर्षी 60 ते 70 टक्के राख्या पोस्टाने पाठवण्याकडे बहिणींचा कल दिसला. त्याचबरोबर दरवर्षी राख्या उशिरा पाठवल्या जात असायच्या. परंतु टाळेबंदीमुळे त्या लवकर भावाकडे पोचविण्याची दक्षता घेतली जात आहे. लॉकडाऊनमुळे यंदा रेल्वेससह इतर सार्वजनिक वाहतूक वाहनेही बंद आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष भावाकडे जाऊन रक्षाबंधन करणे बहिणींना कठीण जाणार असल्याचे लक्षात घेऊन अगदी पंधरा दिवसांपूर्वीच राख्या पोस्टाने पाठविण्यात येत आहेत. त्यामुळे पोस्ट कार्यालयातही मोठय़ा शहरापासून तालुका शहरापर्यंत ग्राहकांची गर्दी दिसत आहे.

पोस्टाकडून आकर्षक लिफाफा

भारतीय पोस्ट विभागाने यंदा रक्षाबंधनासाठी विशेष लिफाफा तयार केलेला आहे. आकर्षक रंगसंगतीचा वापर करून तयार करण्यात आलेल्या या लिफाप्याची किंमत दहा रुपये असून तो पोस्ट कार्यालयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे या लिफाप्याला ग्राहकांची चांगलीच मागणी आहे. तसेच कुरियर सेवेच्या तुलनेत स्पीड पोस्टची सुविधा स्वस्त असल्यामुळे ग्राहकांनी राख्या पाठविण्यासाठी पोस्टाला अधिक पसंती दिल्याचे लक्षात येत आहे.

बूकिंग, वितरणासाठी विशेष प्रक्रिया

दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील राख्यांचे टपाल पोस्ट ऑफिसवर बूक करावेत, यासाठी राखी टपालाची प्राधान्यक्रमानुसार बूकिंग, प्रक्रिया आणि वितरणाची विशेष व्यवस्था मोठय़ा पोस्ट ऑफिसमध्ये करण्यात आली आहे. तर राखी टपालाच्या वेगवान प्रक्रियेसाठी राखी टपाल सेंटर मुंबई व नवी मुंबई येथे सुरू करण्यात आले आहे.

लोकांच्या जीवनात होईल आनंद

यावर्षी कोविडची परिस्थिती लक्षात घेता टपाल विभागाने विशेष नियोजन केले आहे. त्याच शहरात राहणाऱया भावंडांना कोविड नियंत्रणासाठी असलेल्या व्यवस्थापनामुळे भेट घेणे जिकरीचे ठरेल. कंटेनमेंट झोन किंवा सीलबंद इमारतींमध्ये कोणाचे भाऊ-बहिणी राहत असतील, तर त्यांच्या भावनिक भावबंधचा विचार करून पोस्ट ऑफिसचे सर्व कर्मचारी सेवेसाठी तत्पर झाले आहेत. कोविड काळात, पोस्ट विभागाने राखी टपालाचे संकलन, प्रसार आणि वितरण यास सर्वात जास्त प्राधान्य दिले आहे. स्पीड पोस्ट राखीच्या वितरणामुळे या कठीण काळात ‘लोकांच्या जीवनात होईल आनंद’ अशी घोषणा घेऊन पोस्ट ऑफिस तत्पर असल्याचेही  पोस्ट विभागातर्फे सांगण्यात आले.

Related Stories

धामापूर तलावाच्या काठावर आढळले मगरीचे मृत पिल्लू

NIKHIL_N

सिंधुकन्या श्रावणी घारकर लीलावती रुग्णालयात कोरोना योद्धा

NIKHIL_N

”निवडणुकीसाठी टॅक्सी पुरविणाऱ्या महाराष्ट्राच्या कंपनीचे कंत्राट रद्द करा”

Sumit Tambekar

खेडमध्ये दोन वर्षानंतर जनावरांच्या कत्तलीची पुनरावृत्ती!

Patil_p

दीड दिवसांच्या बाप्पाला भक्तिभावाने निरोप !

Patil_p

भोगवेतील नवविवाहितेचा गोव्यात अपघातात मृत्यू

NIKHIL_N
error: Content is protected !!