तरुण भारत

यजमान इंग्लंडने साकारला मालिकाविजय

दुसऱया वनडेत आयर्लंडवर 4 गडय़ांनी मात, बेअरस्टोचे जलद अर्धशतक, रशिदचे 3 बळी

वृत्तसंस्था/ साऊदम्प्टन

सामनावीर जॉनी बेअरस्टोने तडकावलेल्या 41 चेंडूतील 82 धावांच्या बळावर इंग्लंडने दुसऱया वनडे सामन्यात आयर्लंडवर 4 गडय़ांनी विजय मिळवित तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली.

आयर्लंडच्या 213 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची मधली फळी कोसळली होती. पण बेअरस्टोच्या जलद अर्धशतकी खेळी व बिलिंग्स-विली यांच्या उपयुक्त भागीदारीमुळे त्यांना अखेर 32.3 षटकांत विजय साकार करता आला. त्यांनी 6 बाद 216 धावा जमविल्या. आयर्लंडने प्रथम खेळताना 50 षटकांत 9 बाद 212 धावा जमविल्या होत्या. आदिल रशिदने 34 धावांत 3 बळी मिळविताना वनडेतील 150 बळींचा टप्पाही गाठला. बेअरस्टोने इंग्लंडतर्फे सर्वात वेगवान अर्धशतक झळकवण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली. त्याने केवळ 21 चेंडूत अर्धशतकी मजल मारली. बेअरस्टो, इयॉन मॉर्गन व मोईन अली झटपट बाद झाल्याने इंग्लंडची 3 बाद 131 वरून 6 बाद 137 अशी स्थिती झाली होती. सॅम बिलिंग्स व डेव्हिड विली यांनी आणखी पडझड होऊ न देता अभेद्य 79 धावांची भागीदारी करून इंग्लंडचा मालिकाविजयही साकार केला. गुरुवारी झालेल्या पहिल्या सामन्यातही याच जोडीने इंग्लंडला सावरले होते. येथे बिलिंग्सने नाबाद 46 तर विलीने नाबाद 47 धावा जमविल्या. विलीने त्याआधी गोलंदाजीही 48 धावांत 2 बळी मिळविले होते.

तत्पूर्वी, आयर्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली आणि लवकरच त्यांची स्थिती 6 बाद 91 अशी केविलवाणी झाली. कुर्टिस कॅम्फरने एकाकी किल्ला लढवित संघाला सुस्थिती प्राप्त करून दिली. त्याने 87 चेंडूत 8 चौकारांसह 68 धावा काढताना सातव्या गडय़ासाठी सिमी सिंगसमवेत 60 धावांची तर अँडी मॅकब्राईनसमवेत आठव्या गडय़ासाठी 56 धावांची भागीदारी केल्या. सिमी सिंगने 25, मॅकब्राईनने 24 धावा जमविल्या. साकिब मेहमूदने 45 धावांत 2 बळी टिपले. खेळाडूंनी गुडघे टेकवत पुन्हा एकदा ब्लॅक लाईव्ज मॅटरला पाठिंबा दर्शविला. प्रेक्षकांविना खेळविल्या जात असलेल्या या मालिकेने आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप सुपरलीगला सुरुवात झाली असून तिसरा सामना मंगळवारी खेळविला जाणार आहे.

संक्षिप्त धावफलक : आयर्लंड 50 षटकांत 9 बाद 212 (कॅम्फर 68, सिमी सिंग 25, मॅकब्राईन 24, रशिद 3-34, साकिब मेहमूद 2-45, विली 2-48), इंग्लंड 32.3 षटकांत 6 बाद 216 (बेअरस्टो 41 चेंडूत 14 चौकार, 2 षटकारांसह 82, बिलिंग्स नाबाद 46, विली नाबाद 47, जे. लिटल 3-60, कॅम्फर 2-60).

Related Stories

महिला तिरंगी मालिका, विश्वचषक स्पर्धेसाठी रविवारी संघ निवड

Patil_p

आयपीएल संघाच्या नेतृत्वासाठी डीव्हिलियर्सची धोनीला पसंती

Patil_p

इंग्लंड क्रिकेटपटूंवर सरावावेळी फुटबॉल खेळण्यास बंदी

Patil_p

भारतीय संघाला दंड

Patil_p

मायदेशातील मालिकेसाठी बीसीसीआयची बैठक

Patil_p

कर्नाटक क्रिकेट संघटनेची एक कोटीची मदत

tarunbharat
error: Content is protected !!