22 C
Belgaum
April 18, 2021
तरुण भारत

संयमाची परीक्षा

कोविड-19 मुळे आपल्या देशासहित जगाची अर्थव्यवस्था डळमळीत झालेली असतानाही शेअरबाजार मात्र तेजीचे विक्रम करत आहेत. आज मूल्यांकनाच्या दृष्टीने पाहिले तर शेअर बाजारांतील टेडींग कोविड-19च्या फैलावापूर्वी ज्या स्तरावर होते, तिथपर्यंत पोचले आहे. तेही येत्या सहा ते 12 महिन्यांत आर्थिक आघाडीवर वाढीची कोणतीही चिन्हे दिसत नसताना, हे विशेष आहे.

आपल्याकडे मार्चमध्ये कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचे जे सत्र सुरू झाले ते आजतागायत सुरू आहे आणि ते कधी थांबेल याचा अंदाजही कुणाला बांधता येत नाही आहे. उद्योगजगत जणू थांबलेच आहे. अमेरिकेत आणखी काही काळासाठी तेथील केंद्रीय बँकेने शून्य व्याजदर कायम ठेवले आहेत, तेथील दुसऱया तिमाहीची जीडीपी आकडेवारीही निराशाजनक आहे आणि बेरोजगारीही कमालीची वाढली आहे. पण याचा शेअरबाजारांवर काहीही परिणाम झालेला नाही. दुसऱया तिमाहीपेक्षा तिसऱया तिमाहीची आकडेवारी अधिक चांगली असेल या अपेक्षेने अमेरिकेच्याच नाही तर आपल्या इथेही शेअरबाजारांत तेजीचा कल दिसून येतो. गेल्या आठवडय़ात शेवटच्या दिवशी शेअरबाजारांत किरकोळ घसरण दर्शवली. पण कोविड रूग्णांमध्ये सातत्याने होत असलेली वाढ चिंता वाढवणारी आहे. आता शेअरबाजारांतील तेजीवरही हे चिंतेचे सावट येऊ लागले आहे. ऑगस्टमध्ये जुलैतील तेजीचा कल तसाच राहील अशी अपेक्षा करणे म्हणूनच धाडसाचे ठरणार आहे.

आता हळूहळू सगळे व्यवहार सुरळीत करण्याकडे सरकारचा कल आहे. तशी घोषणाही करण्यात आली आहे. पण त्यामुळे शेअर बाजारात फारसा उत्साह संचारला नाही. याचे कारण एक तर वित्त क्षेत्राची स्थिती बिकट आहे. अनुत्पादक कर्जाचे प्रमाण लॉकडाऊनच्या काळात वाढले आहे. जुलैच्या शेवटच्या आठवडय़ात शेअरबाजारांत अस्थिरता जास्त दिसून आली.

बँकींग आणि नॉन-बँकींग वित्तीय कंपन्या या शेअरबाजाराला बऱयाच अंशी तारत असतात. पण हे क्षेत्रच आता डळमळीत झाले आहे. बँकांपुढे अनुत्पादक कर्जे म्हणजे एनपीएचे आव्हान आधीच होते, त्यात आता कोविड महामारीची भर पडली आहे. आता बँकांना अर्थव्यवस्था ठीक करण्याच्या दृष्टीने उद्योजक आणि व्यावसायिकांना सढळ हस्ते कर्जपुरवठा करण्याशिवाय पर्याय नाही. बँका हे करण्यात कितपत यशस्वी ठरतात यावर बँकांच्या शेअर्सच्या किमती चढतात की घसरतात हे अवलंबून आहे. बँकींग क्षेत्राच्या कामगिरीवर शेअरबाजाराचीही तेजी-मंदी अवलंबून आहे.

चालू वर्षात शेअरबाजार एकदम कोसळल्याने किरकोळ गुंतवणूकदारांचा खूप फायदा झाला. लॉकडाऊनच्या काळात अनेकांनी आपली बचत शेअरबाजारांत गुंतवून चांगला नफाही कमावला. 2008मध्ये आलेल्या आर्थिक मंदीच्या वेळीही शेअरबाजारांत मोठी पडझड झाली होती. त्यावेळी लोकांच्या गुंतवणुकीवर मोठा विपरीत परिणाम झाला होता. पण यावेळी तसे झाले नाही. यावेळी लोकांनी अतिशय पद्धतशीरपणे शेअरबाजारांत गुंतवणूक करून नफा मिळवला. हाच कल ऑगस्टमध्ये रहायला हरकत नाही. पण आता शेअरबाजारांत खरेदी प्रमाणापेक्षा जास्त झालेली आहे आणि त्याला ब्रेक लागण्याची वेळ आली आहे.

म्हणूनच ऑगस्टमध्ये शेअरबाजारांची कसोटी लागणार आहे. तिमाही आकडेवारी निराशा करणारी असणार आहे. चीनमुळे जगात अस्थिरता निर्माण झाली आहे. भारताबरोबर चीनने तणाव निर्माण केलेलाच आहे आणि त्याचबरोबर अमेरिका अन् चीनदरम्यानचे व्यापारयुद्ध अद्याप संपलेले नाही. चीनला घेरण्याचे डावपेच आता अनेक देश खेळत आहेत. हे सर्व नेमके कुठे जाईल हे सांगता येत नाही.

एका बाजूला बँकिंग क्षेत्रावर सावट असले तरी आयटी कंपन्यांची कामगिरी चांगली आहे. शेअरबाजारातील तेजीमागे आयटी आणि फार्मा कंपन्यांचा मोठा हात आहे. मात्र घसरणारा डॉलर आणि सोन्याचे गगनाला भिडणारे भाव यातून येत्या महिन्यांत धोका वाढल्याचे संकेत मिळत आहेत. म्हणूनच सावधगिरी बाळगूनच गुंतवणूक करणे योग्य ठरणार आहे. आयटी, फार्मा आणि एफएमसीजी कंपन्यांवरच लक्ष केंद्रीत करणे जास्त फायदेशीर ठरेल.

जुलैमध्ये जवळजवळ 100 कंपन्यांचे शेअर दर दहा ते ऐंशी टक्क्मयांनी वाढले आहेत. आयटी, एनर्जी आणि आरोग्याशी निगडीत क्षेत्रांतील कंपन्यांमध्ये जास्त गुंतवणूक दिसून आली. तर इन्फ्रा, युटीलिटीज, टेलिकॉम, पॉवर, कॅपिटल गुड्स आणि रियल्टी कंपन्यांचे शेअर्स घसरलेले दिसून आले.

ऑगस्टमध्ये शेअरबाजारांच्या तेजीला काहीसा ब्रेक लागण्याची शक्मयता आहे. म्हणूनच सावधानतेने आणि शांतपणे गुंतवणूक करा. कोणत्याही लाटेवर स्वार होण्याचे मनातही आणू नका. आयटी आणि फार्मा कंपन्यांचा वरचष्मा आणखी काही काळ राहणार आहे. किंबहुना दीर्घकाळाचा विचार करता या दोन क्षेत्रांतील कंपन्यांत गुंतवणूक करायला हरकत आही. जेट एयरवेज, डाबर इंडिया, सन फार्मा, टोरेंट फार्मा यासारख्या कंपन्यांचे शेअर सध्या तेजीत आहेत.

– संदीप पाटील

Related Stories

भारतात 23 पासून ऍपलच्या ऑनलाईन स्टोअरचा प्रारंभ

Patil_p

अन्न प्रक्रिया क्षेत्रातील 29 प्रकल्पांना मंजुरी

Patil_p

ऍक्सिस बँकेला 1,683 कोटींचा नफा

Patil_p

टीसीएसची उमेदवार भरतीसाठी टेस्ट

Patil_p

वाहन उद्योगाचा तारणहार ‘एसयूव्ही’!

Omkar B

अश्वनी भाटिया लवकरच एसबीआयच्या एमडीपदी

Patil_p
error: Content is protected !!