तरुण भारत

भूमिपूजनासाठी सजली अयोध्यानगरी

अयोध्या / वृत्तसंस्था

अयोध्येत रामजन्मभूमी मंदिराच्या भूमिपूजनाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. या कार्यक्रमातील अतिथींना आमंत्रणे पाठवली गेली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत 5 ऑगस्ट रोजी दुपारी भूमिपूजनाचा मुख्य सोहळा पार पडणार आहे. तत्पूर्वी भूमिपूजनाच्या आधी तीन दिवस चालणारे विधीही सुरू झाले आहेत.

Advertisements

अयोध्येत भूमिपूजनपूर्व विधींना सोमवारपासून ‘गौरी गणेश’ पूजनाने सुरुवात झाली. सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत विघ्नहर्ता गणेशाची पूजा करत शुभकार्याची सुरुवात करण्यात आली. या पूजेमध्ये 21 पुजारी सहभागी झाले होते. भगवान गणेशाच्या आशीर्वादामुळे आता मंदिर कोणत्याही अडथळय़ाशिवाय पूर्ण होईल असा विश्वास संत समितीचे महाराज कन्हैया दास यांनी व्यक्त केला आहे.   आता मंगळवारी रामर्चा पूजन होणार आहे. ही पूजा सकाळी 9 वाजता सुरु होऊन जवळपास 5 तास सुरु राहणार आहे.

बुधवारी दुपारी 12.30 वाजता मुख्य सोहळा

विशेष म्हणजे राम मंदिराचे भूमिपूजन बुधवारी 5 ऑगस्ट रोजी दुपारी 12.30 वाजता होईल. या कार्यक्रमात काही निवडक लोकांनाच आमंत्रण देण्यात आले आहे. श्री राम जन्मभूमी मंदिराचे भूमिपूजन आणि शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी कमळाच्या माध्यमातून सुरू करणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदी बेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेही रामजन्मभूमी मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमात उपस्थित असतील.

राममय झाली अयोध्या

अयोध्येत राम मंदिरासाठी भूमिपूजन सोहळय़ाच्या ऐतिहासिक प्रसंगासाठी भव्य तयारी सुरू आहे. रस्ते आणि इमारती सजवल्या जात आहेत. भूमिपूजनाचा पवित्र दिवस दीर्घ संघर्षानंतर प्रत्यक्षात येत असल्यामुळे अभूतपूर्व तयारी सुरू आहे. रामलल्लाच्या मंदिराचे भूमिपूजन होण्यापूर्वी अयोध्या राममय झाली आहे. मंदिराची रंग-रंगोटी पूर्ण झाली आहे. घरांवर भगवे ध्वज फडकत आहेत.

योगी आदित्यनाथांनी घेतला आढावा

भूमिपूजनासाठी 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान मोदी अयोध्येत येणार आहेत. त्यापूर्वी सोमवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अयोध्येत दाखल झाले होते. भूमिपूजन सोहळय़ाच्या तयारीचा आणि सुरक्षेचा आढावा त्यांनी घेतला. सुरक्षा, पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱयांच्या वेगवेगळय़ा बैठका घेत त्यांनी सर्वांकडून माहिती घेतली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी भूमिपूजनस्थळाव्यतिरिक्त हनुमानगढी मंदिरालाही भेट दिली. यादरम्यान पत्रकारांशी बोलताना त्यांनी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर घरी बसून ऐतिहासिक क्षण पाहण्याचे आवाहन जनतेला केले आहे. या सोहळय़ासाठी आमंत्रित करण्यात आलेल्या लोकांनीच प्रत्यक्ष हजेरी लावावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. तीन दिवसांच्या सोहळय़ादरम्यान कोणताही ढिसाळपणा आणि गोंधळ उडू नये यासाठी अयोध्या परिसर पूर्णपणे सील करण्यात आला आहे.

पंतप्रधानांची उपस्थिती तीन तास…

पंतप्रधानांचे अयोध्येमध्ये आगमन झाल्यानंतर सर्वप्रथम ते हनुमानगढी येथे दर्शन घेतील. येथे ते मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासमवेत पूजा करतील. त्यानंतर ठीक साडेबारा वाजता भूमिपूजनाचा मुख्य सोहळा होईल. हा सोहळा केवळ दहा मिनिटांचाच असला तरी अन्य विधी मात्र पुजाऱयांच्या साक्षीने सुरूच असतील. त्यानंतर पंतप्रधान शिलान्यास सोहळय़ात सहभागी होणार असून हा कार्यक्रम जवळपास सव्वातास निर्धारित करण्यात आला आहे. यादरम्यान पंतप्रधान मंदिर परिसरात एक पारिजातकाचे रोपटेही लावणार आहेत.

Related Stories

भारत-रशिया यांच्यात डिसेंबरमध्ये चर्चा

Patil_p

महाराष्ट्रात कोरोना चाचण्या वाढवा अन्यथा मृत्युदर वाढेल

datta jadhav

कर्नाटकात ’बंद’चा फज्जा

Patil_p

भाजपच्या दिल्ली प्रदेशाध्यक्षपदी आदेश गुप्ता

datta jadhav

पंजाबमध्ये काँग्रेसकडे शेवटची संधी

Patil_p

ऑगस्ट महिन्यातच तिसऱ्या लाटेची धडक

Patil_p
error: Content is protected !!