तरुण भारत

मानवी चाचणीला जीवनरेखा हॉस्पिटलमध्ये प्रारंभ

पहिल्या चार स्वयंसेवकांना शुक्रवारी दिली लस : अद्याप त्यांना कोणतीही रिऍक्शन नसून प्रकृतींचा सकारात्मक प्रतिसाद

मनीषा सुभेदार/ बेळगाव

Advertisements

कोरोनावरील मानवी चाचणीला बेळगावच्या जीवनरेखा हॉस्पिटलमध्ये शुक्रवारपासून प्रारंभ झाला आहे. शुक्रवारी चार जणांना ही लस देण्यात आली. यामध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. हे चौघेही स्वेच्छेने आलेले स्वयंसेवक असून लस टोचल्यानंतर अद्याप त्यांना कोणतीही रिऍक्शन नसून या व्यक्तींची प्रकृती सकारात्मक प्रतिसाद देत आहे.

या प्रयोगासाठी आयसीएमआरने ज्या बारा हॉस्पिटल्सची निवड केली, त्यामध्ये बेळगावच्या जीवनरेखा हॉस्पिटलचा समावेश आहे. या हॉस्पिटलमध्ये डॉ. अमित भाते यांच्या नेतृत्वाखाली लस चाचणीचा प्रयोग होत असून शुक्रवारी चार स्वयंसेवकांना त्यांनीच ही लस टोचली आहे.

लस टोचण्यापूर्वी स्वयंसेवकांचे बीपी आणि ईसीजी यांची चाचणी जीवनरेखा हॉस्पिटलमध्येच पार पडली. मात्र, कोविड-19 च्या स्वॅबचा आणि रक्ताचा नमुना दिल्लीच्या सेंट्रल लॅबमध्ये पाठविला गेला. त्याचा अहवाल येण्यासाठी 24 ते 36 तासांचा अवधी लागला. या लॅबने स्वयंसेवकांची चाचणी घेण्यास हरकत नाही, असा निर्वाळा दिल्यानंतर शुक्रवारी त्यांना ही लस टोचण्यात आली.

कोणतीही प्रायोगिक लस मानवी शरीरावर टोचण्यापूर्वी ती टोचून घेणाऱया व्यक्तींची मान्यता महत्त्वाची असते. जीवनरेखामध्ये आलेल्या चारही स्वयंसेवकांना डॉ. अमित भाते यांनी सर्व प्रक्रिया समजावून सांगितली. ‘ही लस जर यशस्वी ठरली तर संपूर्ण मानवी समूहाला उपकारक ठरणाऱया प्रक्रियेमध्ये तुमचा सहभाग हा अनमोल ठरणारा असेल’, असेही त्यांनी स्पष्ट केले. चारही जणांची लेखी मान्यता स्वीकारून ही लस दिली गेली.

जीवनरेखा हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवरील हॉस्पिटल एक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आहे. बेळगावचे नामवंत डॉ. सुरेश भाते, डॉ. व्ही. एन. देसाई, डॉ. विजय एस. देसाई व डॉ. नितीन शेटय़े या तज्ञ डॉक्टरांनी 2006 मध्ये हे हॉस्पिटल सुरू केले. याच डॉक्टरांची पुढची पिढी आता हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून कार्यरत आहे.

संपूर्ण जगाला भीतीच्या छायेत टाकणाऱया कोरोनावर अद्याप कोणतीही लस उपलब्ध नाही. कित्येक शतकांतील ही सर्वात मोठी महामारी मानली जाते. या विषाणूला प्रतिबंध करू शकेल, अशी लस शोधण्याचे काम जगातील जवळजवळ 300 हून अधिक संस्था करत असल्या तरी केवळ पंधरा चाचण्या मानवी चाचणीपर्यंत पोहोचल्या आहेत.

भारत बायोटेक, आयसीएमआर व पुण्याच्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरोलॉजी म्हणजे एनआयव्हीने कोव्होक्सिनवर संयुक्तपणे काम केले आहे. मानवी लस चाचणी होण्यापूर्वी अनेक प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. त्याची क्लिनिकल चाचणीसुद्धा होणे आवश्यक आहे. आता या सर्व चाचण्या पूर्ण झाल्या असून मानवी चाचणीला प्रारंभ झाला आहे. देशातील बेळगावसह गोवा, विशाखापट्टणम, रोहतक, नवी दिल्ली, पाटणा, नागपूर, गोरखपूर, कट्टनकूल, हैदराबाद, कानपूर व आर्यानागपूर या बारा ठिकाणी ही चाचणी केली जावी, असे आदेश केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने दिले आहेत.

दुसऱया टप्प्यात साधारण 750 जणांना लस टोचली जाणार

लस टोचण्यासाठी 18 ते 55 वयोगटातील व्यक्ती सुदृढ असावी लागते. रक्तदाब, मधुमेह व तत्सम कोणतेही आजार असू नयेत, ही पहिली अट आहे. त्यानुसार हे चारही स्वयंसेवक सुदृढ असल्याने त्यांना लस दिली गेली. साधारण पंधरा दिवसांनी पुन्हा त्यांची रक्तचाचणी केली जाईल. संपूर्ण देशभरात पहिल्या टप्प्यात केंद्र सरकारने सुचविलेल्या हॉस्पिटल्समध्ये एकूण 375 जणांना ही लस टोचण्यात आली आहे. दुसऱया टप्प्यात साधारण 750 जणांना ती टोचली जाणार आहे.

जीवनरेखा आणि आयसीएमआर यांच्यामध्ये वैद्यकीय उपचार आणि लस याबाबत चर्चा आणि देवाणघेवाण सुरू असते. त्यामुळे भारत बायोटेक व आयसीएमआरने मानवी लसीच्या प्रयोगासाठी सदर हॉस्पिटल्सची निवड केली आहे.

‘तरुण भारत’ने जनतेच्या मनातील शंका दूर केली होती

हॉस्पिटलमध्ये रक्तचाचणीला सुरुवात झाली, त्यावेळी अनेक वृत्तपत्रे (तरुण भारत नव्हे) आणि वाहिन्यांनी ‘मानवी चाचणीला प्रारंभ’ असे वृत्त दिले होते. परंतु, चाचणी करण्यापूर्वीच्या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच चाचणी घेण्यात येते. चाचणी सुरू नसल्याचे वृत्त ‘तरुण भारत’ने प्रसिद्ध केले व जनतेच्या मनातील शंका दूर केली होती.

Related Stories

केएलई इंन्डिपेंडंट पीयू कॉलेजमध्ये कार्यक्रम

Amit Kulkarni

एस. पी. घाळी ज्युनियर लीग क्रिकेट स्पर्धा उद्यापासून

Amit Kulkarni

स्मार्टसिटी योजनेतील रूग्णालयाची इमारत सज्ज

Patil_p

बुधवारी जिल्हय़ात 78,732 कामगारांना काम

Amit Kulkarni

शिबिरांमुळे आरोग्य केंद्रांमध्ये कोरोना लसीचा तुटवडा

Amit Kulkarni

उचगाव प्राथमिक मराठी शाळेत स्मार्टरुमचे उद्घाटन

Amit Kulkarni
error: Content is protected !!